सर्वांना सोबत घेऊन सर्वांगीण विकासाला प्राधान्य द्या, नगराध्यक्षांच्या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांची सूचना
मुंबई : Shiv Sena Meeting – शासन आपल्या दारीच्या धर्तीवर शिवसेना नगराध्यक्ष आपल्या दारी उपक्रम राबविणार आहे. त्यानुसार नगराध्यक्षांनी घरोघरी जाऊन लोकांच्या समस्या दूर कराव्यात, असे निर्देश शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच नगरसेवकांबाबत पक्षीय मतभेद न ठेवता नगराध्यक्षांनी सगळ्यांना सोबत घेऊन नगराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य द्यावे, असेही ते म्हणाले.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सोमवारी शिवसेना नगराध्यक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत नगर परिषदेतील विकास कामे, प्रशासनातील अडचणी आणि स्थानिक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. कमी बोला आणि जास्त काम करा, असा सल्ला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पक्षाच्या नगराध्यक्षांना दिला.
शिवसेनेच्या इतिहासातील मोठे यश
या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, नगर परिषदांच्या निवडणुकीत शिवसेनेचे 63 नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि हजारो नगरसेवक निवडून आले. हे शिवसेनेच्या इतिहासातील मोठे यश आहे.
खेळांच्या मैदानांसाठी एक कोटी रुपये
आजच्या शिबीरामुळे नगर परिषदांमधील वस्तुस्थिती समोर आली, त्यानुसार नगरविकास विभाग सहकार्य करेल, अशी ग्वाही शिंदे यांनी उपस्थित नगराध्यक्षांना दिली. युवकांसाठी अभ्यासिका, खेळाची मैदाने आणि त्यांना व्यासपीठ देण्यासाठी आवश्यक प्रकल्प हाती घेण्याच्या सूचना त्यांनी नगराध्यक्षांना केल्या. नमो उद्यानाप्रमाणेच नगर परिषदांच्या क्षेत्रात खेळांच्या मैदानांसाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
गडकोटांवर संविधान दिन साजरा करणार
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून गडकोटांवर स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात ज्या उपाययोजना केल्या, त्याप्रमाणे गडकोटांवर संविधान दिन साजरा केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
कीर्तनकारांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कौन्सिलिंग
राज्यातील दुष्काळाची दाहकता पाहता दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जोमाने काम करा, असे निर्देश देतानाच, बळीराजाला सावरण्यासाठी लाखो हात पुढे आले पाहिजेत, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. कीर्तनकारांच्या माध्यमातून चिंताक्रांत शेतकऱ्यांचे कौन्सिलिंग करावे, असे आवाहन त्यांनी केले.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाची जबाबदारी
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलीबाळींची लग्न ठरलेली आहेत, मात्र दुष्काळामुळे ती थांबलेली आहेत. शेतकरी चिंतेत आहे, मात्र, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाची जबाबदारी शिवसेनेने घेतली आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
Read About : Maharashtra Suspends Microfinance Loan – मायक्रो फायनान्सच्या कर्जवसुलीला आठ महिने स्थगिती : बावनकुळे
E-paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.