Advertisement Advertisement

Amar Prem Katha: प्रेमकथा की भुताची कहाणी?

‘अमर प्रेम कथा’च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता
२०२७ च्या व्हॅलेंटाइन डेला चित्रपटगृहात धडकणार

मुंबई : प्रेम म्हटलं की गुलाब, रोमँटिक क्षण आणि गोड आठवणी डोळ्यांसमोर येतात; पण या प्रेमकथेत जर भुताटकीचा हात आणि विनोदाची फोडणी असेल तर? असाच काहीसा भन्नाट अनुभव देण्यासाठी ‘अमर प्रेम कथा’ हा नवा मराठी चित्रपट सज्ज झाला आहे. लेखक-दिग्दर्शक समीर आशा पाटील यांच्या या रोमँटिक भयपट-विनोदी चित्रपटाचं पहिलं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं असून, त्याने चाहत्यांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे.

पोस्टरमध्ये एका बाजूला जिवंत हात, तर दुसऱ्या बाजूला भुताटकी हात दिसतो. या दोन्ही हातांच्या मध्ये काट्यांनी वेढलेलं लाल गुलाबाचं फूल आहे. त्यामुळे प्रेमाच्या या कथेला भयाचा नेमका कोणता ट्विस्ट मिळणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

चित्रपटात प्रथमेश परब, रितिका श्रोत्री, ओंकार भोजने, पार्थ भालेराव, रोहित माने, विनायक माळी आणि सयाजी शिंदे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. लेखन-दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केले आहे.

‘अमर प्रेम कथा’ (Amar Prem Katha) २०२७ च्या व्हॅलेंटाइन डेला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी प्रेमाचा दिवस प्रेक्षकांना प्रेम, भय आणि हास्याची अनोखी मेजवानी देणार आहे. आता चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर कधी येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.