नियमित व प्रशासकीय कामांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रभावी; माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे मत
नवी दिल्ली : AI cannot replace judges न्यायालयीन कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर प्रशासकीय आणि नियमित कामांसाठी निश्चितच उपयुक्त ठरू शकतो. मात्र, न्यायदान आणि निकाल देण्याची प्रक्रिया पूर्णपणे मानवी नियंत्रणाखालीच राहिली पाहिजे, असे स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केले.
‘एआय फॉर ऑल : एआय गव्हर्नन्स अँड ट्रस्ट, द केस फॉर ज्युडिशियल ॲक्सेस अँड एम्पॉवर्ड इंडिया’ या विषयावरील कार्यक्रमात ते बोलत होते. न्यायालयांमधील कामकाजाचा वेग वाढविण्यासाठी एआयचा प्रभावी वापर करता येऊ शकतो. विशेषतः सुनावणीचे प्रतिलेखन, भाषांतर, खटल्यांचे सूचीकरण आणि कागदपत्रांमधील प्रक्रियात्मक त्रुटी शोधणे यांसारखी वेळखाऊ कामे तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक वेगाने करता येतील, असे त्यांनी सांगितले.
भारतीय न्यायव्यवस्थेची शोकांतिका म्हणजे न्यायाधीशांचा बराचसा वेळ अशा कामांमध्ये खर्च होतो, ज्यांना त्यांनी प्राधान्य देण्याची आवश्यकता नाही. त्यांचा अधिकाधिक वेळ प्रत्यक्ष न्यायदान आणि निर्णय घेण्यासाठी वापरला गेला पाहिजे, असे चंद्रचूड म्हणाले.
न्यायालयात एआयचा सर्वाधिक चांगला उपयोग हा नियमित आणि कंटाळवाण्या स्वरूपाच्या कामांसाठीच आहे. मात्र, तंत्रज्ञानाकडून अधिक गुंतागुंतीची आणि महत्त्वाची कामे करून घेण्याचा प्रयत्न सुरू होतो, तेव्हा अडचणी निर्माण होतात, असेही त्यांनी नमूद केले.
तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार करण्यात आलेले बनावट कायदेशीर संदर्भ न्यायालयीन प्रक्रियेत सादर झाल्याच्या काही घटनांचाही त्यांनी उल्लेख केला. अस्तित्वात नसलेल्या न्यायनिर्णयांचे संदर्भ तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या वास्तविक निकालांमध्ये नसलेली विधाने न्यायालयासमोर मांडण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे एआयने तयार केलेले कायदेशीर संदर्भ, भाषांतरे आणि संशोधनाची माहिती यांची मानवी स्तरावर पडताळणी करणे अत्यावश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
न्यायाधीशांची जबाबदारी एआय घेऊ शकत नाही
निर्णय देणारा आणि त्यावर स्वाक्षरी करणारा माणूसच असला पाहिजे. निर्णय आणि त्यामागील कारणमीमांसा ही न्यायाधीशांचीच जबाबदारी आहे. एखाद्या भाषिक मॉडेलला अपील प्रक्रियेत जबाबदार धरता येत नाही. तसेच न्यायाधीशांवर असलेली घटनात्मक जबाबदारीही एआय पार पाडू शकत नाही, असे चंद्रचूड यांनी ठामपणे सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाच्या एआय समितीने यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला देशातील न्यायालये आणि न्यायाधिकरणांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराचे नियमन करण्यासाठी नियमांचा मसुदा प्रसिद्ध केल्याची माहितीही त्यांनी दिली.
न्यायव्यवस्थेतील एआयच्या वापरासाठी त्यांनी पाच प्रमुख तत्त्वे मांडली. त्यामध्ये प्रत्येक निर्णयावर मानवी देखरेख, व्यक्तिस्वातंत्र्याचे संरक्षण, एआयच्या वापराबाबत पारदर्शकता, न्याय मिळविण्याची व्यापक उपलब्धता आणि माहितीची सुरक्षितता या बाबींचा समावेश आहे.
भारतीय न्यायव्यवस्थेला स्वदेशी कायदेशीर माहितीचे सुरक्षित डेटाबेस आणि भारतात विकसित केलेल्या एआय मॉडेल्सची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.
५.६ कोटींहून अधिक खटले प्रलंबित
देशातील न्यायालयांमध्ये ५.६ कोटींहून अधिक खटले प्रलंबित आहेत. त्यातच न्यायाधीशांची मोठी कमतरता आहे. अशा परिस्थितीत न्यायप्रक्रिया गतिमान करण्यासाठी आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावू शकते. मात्र, एआयने न्यायाधीशांची जागा घेण्याऐवजी त्यांना सहाय्य करणारे साधन म्हणूनच काम केले पाहिजे, असे चंद्रचूड यांनी स्पष्ट केले.
Read About : चंद्रपुरात वाघाच्या अवयवांची नातेवाईकांत वाटणी – Chandrapur tiger poaching case
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.