Manthan Film : आज एखादा चित्रपट बनवायचा म्हटला की सर्वप्रथम चर्चा होते कोट्यवधी रुपयांच्या बजेटची. नंतर स्टारकास्ट, नामांकित दिग्दर्शक, कॉर्पोरेट फायनान्सर, ओटीटीचे हक्क, मार्केटिंगचा खर्च, प्रमोशनचे दौरे -अशी एक मोठी यादी आणि नंतर चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे अंदाज. चित्रपट बनण्यापूर्वीच त्याच्या कमाईची चिंता सुरू होते.
पण १९७६ साली भारतात एक असा चित्रपट बनला, ज्याच्या निर्मितीची कथा ऐकली की आजच्या फिल्म फायनान्सर्सना पण शांत बसून विचार करावा लागेल. या चित्रपटाचे नाव होते ‘मंथन’ आणि त्याचे निर्माते होते सुमारे पाच लाख दूध उत्पादक शेतकरी! प्रत्येक शेतकऱ्याने दोन रुपये दिले. पाच लाख शेतकरी म्हणजे दहा लाख रुपये. आजच्या काळात एखाद्या मोठ्या चित्रपटाच्या पोस्टर आणि ट्रेलरच्या प्रमोशनवरही कदाचित एवढा खर्च होईल. पण, त्या काळात दहा लाख रुपये एकत्र करून या शेतकऱ्यांनी चित्रपट निर्मितीचा एक अनोखा इतिहास घडवला.
एका चित्रपटाला निर्माता मिळाला नाही म्हणून कलाकारांनी स्वत: पैसे जमवले, अशी गोष्ट आपण ऐकली असेल. एखाद्या मित्राने, नातेवाईकाने किंवा उद्योगपतीने चित्रपटासाठी पैसे दिले असेही ऐकले असेल. पण, लाखो शेतकऱ्यांनी स्वत:च्या खिशातून पैसे काढून चित्रपट बनवणे हा प्रकारच वेगळा होता. इथे निर्माता एखाद्या ऑफिसमध्ये बसलेला नव्हता. तो गुजरातच्या गावागावांत होता.
Manthan Film आता चित्रपटाचा विषय आणि निर्मितीचा प्रयोग यावर नजर टाकूयात. ‘मंथन’ची कल्पना आली ती डॉ. वर्गीस कुरियन यांच्या दूध सहकारी चळवळीमधून. गुजरातमध्ये दूध उत्पादक शेतकरी एकत्र येऊन सहकारी संस्था उभारत होते. मध्यस्थ, व्यापारी आणि स्थानिक सत्ताकेंद्रांच्या पाशातून बाहेर पडण्याचा हा प्रयत्न होता. दूध उत्पादकाला त्याच्या श्रमाचा योग्य मोबदला मिळावा, त्याने स्वत:च्या आर्थिक भवितव्याचा निर्णय घ्यावा, ही या चळवळीची मूलभूत कल्पना होती. डॉ. कुरियन यांना वाटले की ही कथा फक्त दूध व्यवसायाची नाही, ती ग्रामीण भारताच्या बदलाची कथा आहे, ती लोकांना समजली पाहिजे; चित्रपट हे त्यासाठी प्रभावी माध्यम ठरू शकते.
दिग्दर्शक श्याम बेनेगल यांना ही कल्पना आवडली. पण, चित्रपट बनवायचा म्हटल्यावर पैशांचा प्रश्न उभा राहिला. पारंपरिक निर्मात्यांकडे धाव घेण्याऐवजी कुरियन यांनी एक वेगळीच कल्पना सुचवली. दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रत्येकी दोन रुपये घ्यायचे आणि त्यांना चित्रपटाचे निर्माते बनवायचे! कल्पना साधी होती, पण तिच्यामागचा विचार अफाट होता.
चित्रपटाची पटकथा विजय तेंडुलकर यांनी लिहिली. गिरीश कर्नाड, स्मिता पाटील, नसीरुद्दीन शाह, अमरीश पुरी, अनंत नाग, कुलभूषण खरबंदा आणि मोहन आगाशे अशा कलाकारांनी चित्रपटाला आकार दिला. हा चित्रपट केवळ सहकारी दूध संस्थेची जाहिरात नव्हता. गावातील सामाजिक विषमता, जातीय उतरंड, आर्थिक शोषण, स्थानिक राजकारण आणि बदलाला होणारा विरोध यांचा वास्तववादी वेध त्यात घेतला गेला.
शेतकऱ्यांनी पैसे दिले म्हणून चित्रपटात शेतकऱ्यांचे गुणगान करणारी चार गाणी, दोन भाषणे आणि शेवटी सहकारी संस्थेचा लोगो दाखवून चित्रपट संपवला नाही. उलट, गावातील बदलाची प्रक्रिया किती संघर्षमय असते हे चित्रपटाने दाखवले.
निर्मातेच प्रेक्षक आणि प्रचारक!
‘मंथन’च्या निर्मितीची गंमत इथेच संपत नाही. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्याच्या प्रचारासाठी मोठ्या जाहिरात मोहिमा, महागडे होर्डिंग्ज किंवा सेलिब्रिटींचे दौरे नव्हते. ज्यांनी पैसे दिले होते, तेच चित्रपटाचे प्रेक्षक बनले. गावागावांतून शेतकरी चित्रपट पाहण्यासाठी आले. अनेक ठिकाणी चित्रपटाचा उपयोग सहकारी चळवळीचा संदेश पोहोचवण्यासाठीही करण्यात आला. चित्रपट हा केवळ मनोरंजन नव्हता; तो ग्रामीण समाजाच्या परिवर्तनासाठी संवादाचे माध्यम बनला.
आज आपण ज्याला ‘क्राउडफंडिंग’ म्हणतो; इंटरनेटवर एखाद्या कल्पनेसाठी हजारो लोकांकडून छोटी छोटी रक्कम गोळा केली जाते. त्यासाठी वेबसाइट असते, डिजिटल पेमेंट असते, व्हिडीओ असतो, सोशल मीडिया असतो, इन्फ्लुएन्सर असतात आणि अनेकदा पैसे देणाऱ्यांना धन्यवाद म्हणून टी-शर्ट, मग, पोस्टर किंवा खास भेटवस्तूही मिळतात. पण, १९७६ मध्ये गुजरातच्या शेतकऱ्यांनी क्राउडफंडिंग केले तेव्हा इंटरनेट नव्हते, सोशल मीडिया नव्हता, ऑनलाईन पेमेंट नव्हते. होते दूध संकलन केंद्र, सहकारी संस्थेचे जाळे आणि दोन रुपयांची ताकद!
‘मंथन’ला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला. त्याच्या यशाने हे सिद्ध केले की चित्रपटाची ताकद फक्त स्टारच्या चेहऱ्यात, बजेटच्या आकारात किंवा बॉक्स ऑफिसच्या आकड्यात नसते. चित्रपटाच्या विषयाशी प्रेक्षकांचे नाते किती खोल आहे यावरही त्याचे यश ठरते.
आज एखादा निर्माता चित्रपटासाठी शंभर कोटी रुपये उभे करतो आणि मग प्रेक्षकांनी चित्रपट पाहावा म्हणून हजारो कोटींच्या उद्योगाचा प्रचार करतो. ‘मंथन’मध्ये मात्र पाच लाख लोक आधीच चित्रपटाशी जोडले गेले होते. त्यांना चित्रपट पाहण्यासाठी पटवून देण्याची गरज नव्हती, तो त्यांचा चित्रपट होता.
पाच लाख शेतकऱ्यांनी दोन रुपये दिले आणि एक चित्रपट बनला. मंथनच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी त्यांच्या स्वत:च्या सामूहिक शक्तीची कथा पडद्यावर आणली होती.
गेल्या अनेक वर्षांत सहकारी संस्था प्रचंड मोठ्या झाल्यात, पण मंथन नंतर एकाही सहकारी संस्थेने स्वत:चा चित्रपट बनवला नाही.
रामदास
संपर्क : ८७७९६९७९७०
read about : पर्यटनाची नवी लाट – One Day Trips Maharashtra
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.