सायबरसह उस्मानपुरा पोलिसांनी केली कारवाई
छत्रपती संभाजीनगर Cyber Fraud Bank Accounts : शेअर मार्केटवर ट्रेडिंग करतो, जास्त जीएसटी असल्याने जीएसटीसाठी खाते घेण्याची थाप मारून, सायबर फसवणुकीतून आलेली रक्कम विविध खात्यांवर जमा करण्यासाठी सर्वसामान्यांचे खाते कमीशनवर घेणाऱ्या टोळीच्या चार सदस्यांना उस्मानपुरा आणि सायबर पोलिसांनी ताब्यात घेतले. अभिषेक भाऊसाहेब गलधर, रोहित विजय खंडाळगळे, आदित्य सुनील तांबे आणि यश अनिल जीवनलाल अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणात टोळीच्या प्रमुखाचा शोध सुरू आहे.
या प्रकरणात संदीप नानासाहेब भालेराव (वय २६, रा. मु. पो. गोकुळवाडी, शेंद्रा एमआयडीसी) यांनी तक्रार दिली. चिकलठाणा येथे एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेला असता, या ठिकाणी आदित्य व अभिषेक गलधर यांनी ओळख सांगितली. यानंतर टेलिग्रामवर कॉल करून शहानुर मिया दर्गा येथे डी मार्टवर भेटण्यासाठी बोलावून घेतले. या ठिकाणी अभिषेक गलधार व ऋषीकेश नावाच्या दोघांनी आम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो. आम्हाला जास्त जीएसटी लागते. तू मला तुझे बँक खाते दे. आम्ही रक्कम प्राप्त करून तुला त्या बदल्यात पाच ते दहा हजार रुपये देऊ असा प्रस्ताव दिला.
खूप आग्रह केल्याने बँक खाते दिले
संदीप भालेराव याने सुरुवातीला खाते देण्यास टाळाटाळ केली. मात्र खूप आग्रह केल्यानंतर त्याने त्याचे खाते दिले. संदीपचे खाते घेतल्यानंतर एकाने माझे होणार नाही. आणखी खाते, एटीएम कार्ड आणि सीम कार्ड दे असा संबंधितांनी तगादा लावला. संदीपने त्याच्या बहिणीचे खाते त्यांच्याकडे दिले. हे खाते दिल्यानंतर संबंधितांनी दहा हजार रुपये संदीपला दिले. यानंतर आदित्य याने पुन्हा बोलाविले. संदीपने मावस भावाचे खातेही युवकांना दिले. बदल्यात पुन्हा दहा हजार रुपये घेतले. यानंतर पुन्हा एका खात्यासह एटीएम कार्ड आणि सीम कार्ड ही संदीपने दिली.
बहिणीचे खाते केले होल्ड
२३ नोव्हेंबर रोजी संदीप हा बँकेत गेला असता त्याच्या बहिणीचे खाते गोठविल्याची माहिती मिळाली. बँकेच्या अधिकाऱ्यांनी सायबर पोलीस ठाण्यात जाण्याबाबत सांगितले. संदीप भालेराव याने ग्रामीण सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अशोक मुदीराज हे करीत आहेत.
चार जणांना घेतले ताब्यात
सदर प्रकरणात गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक अशोक मुदीराज व त्याच्यासोबत प्रमोद चव्हाण, पुरी, यांच्या पथकासह सायबर पथकाने अभिषेक गलधार, रोहित विजय खंडाळगळे, आदित्य सुनील तांबे आणि यश अनिल जीवनलाल या चार जणांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात आदित्य याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणात चारही आरोपींना ताब्यात घेऊन कोर्टात हजर केले असता, न्यायालयाने चारही आरोपींना सोमवारपर्यंत पोलिस कोठडीचे आदेश दिले.
सायबर फसवणुकीसाठी खात्यांचा वापर
सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये ज्यात डिजिटल अरेस्ट किंवा अन्य प्रकरणांमध्ये सायबर चोरांकडून फसवणुकीची रक्कम सर्वसामान्य व्यक्तीच्या नावावर टाकण्यात येते. ही रक्कम आल्यास, सदर रक्कम एजंट एटीएम कार्डाद्वारे काढून घेत असतात. या प्रकारासाठी हे खाते वापरण्यात येत असावे, अशी माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अशोक मुदीराज यांनी दिली.
विनाक्रमांक वाहनासह टेलिग्रामचा कॉलिंगसाठी उपयोग
सदर प्रकरणात फसवणुकीच्या टोळीच्या सदस्यांकडून संदीप भालेराव याची भेट घेण्यासाठी विना क्रमांकाची दुचाकी घेऊन येत होते. तसेच कॉलिंगसाठी टेलिग्रामचा वापर करीत होते. अशी माहितीही तक्रारीत देण्यात आली आहे.
Read About : फवाद-माहिराच्या सीरिजला भारतात विरोध! – Jo Bache Hain Samet Lo Controversy
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.