Ad Advertisement Ad Advertisement

डिलिमिटेशनवरून मविआत ठिणगी – Delimitation Bill controversy

काँग्रेस-ठाकरे गटाचे पवारांवर टीकास्त्र; पवार गटाचे प्रतिउत्तर

मुंबई : Delimitation Bill controversy संसदेच्या विशेष अधिवेशनात मांडल्या जाणाऱ्या मतदारसंघ फेररचना (डिलिमिटेशन) घटनादुरुस्ती विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून मिळणाऱ्या संभाव्य पाठिंब्यावरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. पवारांच्या पक्षातून सावध विधाने होत असताना, दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या नेत्यांनी शरद पवार व त्यांच्या पक्षावर जोरदार टीका करत ‘पाठीत खंजीर खुपसण्याचा’ आणि ‘देशाशी गद्दारी’ केल्याचा आरोप केला आहे. यामुळे आघाडीच्या एकजुटीवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.


आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले, तर खासदार सुप्रिया सुळे यांनी विधेयक समोर आल्यानंतर भूमिका घेऊ, असे म्हटले आहे. तसेच दिल्लीतील बैठकीलाही या पक्षाचे खासदार उपस्थित राहिले नाहीत. यावर बोलताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला. ”८६ वर्षीय शरद पवार यांचा इतिहास पाठीत खंजीर खुपसण्याचा आहे. त्यांचा पक्ष केवळ सत्तेसाठी बनला असून सत्तेशिवाय राहू शकत नाही. ८५ व्या वर्षी काँग्रेसने पाठिंबा देऊन त्यांना राज्यसभेवर पाठवले. मात्र, आता त्यांनीच शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार संपवण्याचे काम केले आहे,” अशी टीका त्यांनी केली.

काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनीही या संभाव्य पाठिंब्याला थेट ‘देशाशी आणि संविधानाशी गद्दारी’ म्हटले आहे. सध्याच्या ५४३ जागांमध्येच महिला आरक्षण लागू करण्याचे आव्हान देत, ५० टक्के खासदारांची संख्या वाढवण्यामागे भाजपचे कायमस्वरूपी सत्तेत राहण्याचे कारस्थान असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, दुसरीकडे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेसच्या विरोधापेक्षा वेगळी भूमिका मांडली. पक्ष वेगळा असला तरी वाढत्या लोकसंख्येनुसार प्रतिनिधित्व मिळण्यासाठी मतदारसंघ फेररचना होणे गरजेचे असल्याचे वैयक्तिक मत त्यांनी व्यक्त केले.

हा महाराष्ट्रद्रोह – संजय राऊत

भाजपशी हातमिळवणी करणे हा महाराष्ट्रद्रोह आहे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली. भाजपला पाठिंबा देण्यापूर्वी तुरुंगात गेलेल्या अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांची माफी मागावी. मविआच्या माध्यमातून निवडून आलेल्या ८ पैकी ५ खासदारांनी भाजपचा पराभव केला आहे. त्यामुळे सरकारच्या बाजूने उभे राहणाऱ्यांनी फुले-शाहू-आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाणांचे नाव घेऊ नये, असे सुनावत शरद पवार यांनी जाहीरपणे भूमिका मांडावी असे त्यांनी म्हटले आहे.

पवार सुरुवातीपासूनच महिला आरक्षणाच्या बाजूने : नवनाथ बन

शरद पवार सुरुवातीपासूनच महिला आरक्षणाच्या बाजूने असून, धोरणात्मकदृष्ट्या ते विधेयकाला पाठिंबा देत आहेत, असे भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा महिला आरक्षण लागू करणाऱ्या पवारांच्याच पाठिंब्यामुळे मविआ काळात काँग्रेस सत्तेत आली व विजय वडेट्टीवार मंत्री झाले. मात्र, आज तेच संविधानविरोधी भूमिका घेत पवारांवर टीका करत असल्याचा टोला बन यांनी लगावला. तसेच पत्राचाळच्या खोक्यांवरून निशाणा साधत, हिंमत असेल तर खासदार संजय राऊत यांनी २०२९ नंतर वाढणाऱ्या ७२ जागांपैकी एका जागेवरून जनतेतून निवडून दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले.

आम्हाला ज्ञान शिकवू नका; वडेट्टीवारांनी पवारांची माफी मागावी : शशिकांत शिंदे

शरद पवार यांच्यावरील टीकेनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी विजय वडेट्टीवार यांचा चांगलाच समाचार घेतला. ”तुम्ही आम्हाला ज्ञान शिकवू नका, पक्षाची भूमिका ठरवण्याचा अधिकार आम्हाला आहे. सोमवारी आमची भूमिका पाहून टीका करायला हवी होती. शरद पवार रुग्णालयात असताना गल्लीतील नेत्यांनी बोलण्याची घाई केली. पवारांबद्दल बोलताना त्यांनी दहा वेळा विचार करायला हवा होता, आता त्यांनी शरद पवार यांची माफी मागावी,” असे शशिकांत शिंदे यांनी सुनावले.


दर २० वर्षांनंतर होणाऱ्या डिलिमिटेशनला दक्षिण भारतातही पाठिंबा मिळाला असून, सभागृहात विधेयक आल्यानंतर त्यावर चर्चा करून सुधारणा सुचवल्या जातात. तसेच काँग्रेस याला नेमका कशासाठी विरोध करत आहे, याची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी, असे आवाहनही शिंदे यांनी केले.

नेत्यांचे दावे

”भाजपला स्वत:च्या विजयासाठी मतदारसंघांची रचना बदलायची आहे. देशात ८५० किंवा १,००० जागा वाढवल्या तरी जनता भाजपला स्वीकारणार नाही. पुनर्रचनेवर खर्च करण्याऐवजी आमदार-खासदारांचा ५ कोटींचा विकासनिधी दुप्पट करावा.”
– आदित्य ठाकरे (आमदार)

या विधेयकामुळे हिंदीभाषिक राज्यांचे वर्चस्व वाढून महाराष्ट्राचे महत्त्व कमी होईल. महाराष्ट्राच्या जागा ४८ वरून ७२ झाल्या तरी उत्तर भारतातील वाढ अधिक असेल. शरद पवार भाजपच्या डावात अडकणार नाहीत, अशी अपेक्षा आहे.
– हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

विधेयकाला शिवसेनेचा एकमुखी पाठिंबा

मुंबई : संसदेच्या विशेष अधिवेशनात मांडण्यात येणाऱ्या महिला आरक्षणाशी संबंधित परिसीमन विधेयकाला एकमुखी पाठिंबा देण्याचा ठराव शिवसेनेच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नंदनवन निवासस्थानी झालेल्या बैठकीत पक्षाच्या लोकसभेतील १३ आणि राज्यसभेतील २ अशा सर्व १५ खासदारांनी विधेयकाच्या बाजूने मतदान करण्याचा निर्णय घेतला. यासाठी सर्व खासदारांनी रविवारीच दिल्लीत दाखल व्हावे, असे निर्देश शिंदे यांनी दिले. बैठकीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, संदिपान भुमरे, नरेश म्हस्के, रवींद्र वायकर, धैर्यशील माने, ओमराजे निंबाळकर, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे आणि डॉ. ज्योती वाघमारे उपस्थित होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रहिताच्या विचारांनुसार ‘नेशन फर्स्ट’ ही शिवसेनेची भूमिका असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला बळ देण्यासाठी पक्ष दोन्ही सभागृहांत विधेयकांच्या बाजूने उभा राहील, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्राचा आवाज संसदेत बुलंद होणार

लोकसभेचे ३० नोव्हेंबर, तर राज्यसभेचे २ डिसेंबर रोजी विशेष अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात घटनादुरुस्ती आणि परिसीमन विधेयक मांडले जाणार असून महिलांना ३३ टक्के आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल. लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ वरून ८१५ पर्यंत वाढणार असून महाराष्ट्रातील जागा ४८ वरून ७२ होतील. यामुळे लोकशाही अधिक बळकट होऊन संसदेत महाराष्ट्राचा आवाज बुलंद होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

Read About : मतदारसंघ फेररचनेची लढाई आता संसदेत – Delimitation Bill 2026

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.