न्यूडिफाय ॲप्स आणि डीपफेक तंत्रज्ञानाचा गैरवापर; बनावट छायाचित्रांच्या आधारे मुलांना ब्लॅकमेल करण्याचे प्रकार वाढले
लंडन / एडिनबर्ग : AI-Generated Child Sexual Abuse Material कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून लहान मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या सामग्रीच्या (सीएसएएम) तक्रारींमध्ये गेल्या दोन वर्षांत तब्बल ८,४०० टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याची धक्कादायक माहिती एका नवीन संशोधनातून समोर आली आहे. एडिनबर्ग येथील ‘चाइल्डलाईट – ग्लोबल चाइल्ड सेफ्टी इन्स्टट्यिूट’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही गंभीर आकडेवारी मांडण्यात आली आहे. ‘न्युडिफाय ॲप्स’ सारख्या साधनांचा वापर करून तयार केलेल्या डीपफेक छायाचित्रांच्या तक्रारी २०२३ मधील सुमारे ४,७०० वरून २०२५ मध्ये ४,००,००० हून अधिक झाल्या आहेत. ही छायाचित्रे बनावट असली तरी त्यांचा वापर करून मुलांना ब्लॅकमेल करणे, पैशांची मागणी करणे किंवा आणखी छायाचित्रे मागवणे असे प्रकार घडत आहेत.
अहवालातील चिंताजनक निष्कर्ष
अमेरिकेतील ‘नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्सप्लॉयटेड चिल्ड्रन’कडे (एनसीएमईसी) टेक कंपन्यांनी नोंदवलेल्या तक्रारींच्या आधारे हे संशोधन करण्यात आले आहे. चाइल्डलाईटच्या अंदाजानुसार, जगभरात दरवर्षी ३० कोटींहून अधिक मुले तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होणाऱ्या कोणत्या ना कोणत्या लैंगिक शोषणाला बळी पडतात, तर प्रत्येक चारपैकी एका मुलाला वयाची १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी अशा अत्याचाराला सामोरे जावे लागते.
ब्रिटनमधील ‘इंटरनेट वॉच फाउंडेशन’ने (आयडब्ल्यूएफ) गेल्या महिन्यात प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, २०२६ च्या पहिल्या सहा महिन्यांतच २०२५ च्या संपूर्ण वर्षापेक्षा जास्त ‘फोटोरिॲलिस्टिक’ (अत्यंत खऱ्या वाटणाऱ्या) एआय-निर्मित बाल शोषण प्रतिमा आढळून आल्या आहेत. संस्थेने कायदेशीर निकषांत बसणाऱ्या ६,३१० एआय प्रतिमांची तपासणी केली असून, हे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत ४० टक्क्यांनी जास्त आहे.
ऑफलाइन अत्याचारांची आकडेवारी
या संशोधनात प्रत्यक्ष (ऑफलाइन) लैंगिक अत्याचारांचाही अभ्यास करण्यात आला आहे. उत्तर अमेरिकेत लहानपणी जवळपास एक तृतीयांश मुली आणि १० पैकी एकापेक्षा जास्त मुले प्रत्यक्ष लैंगिक अत्याचाराचे बळी ठरल्याचे आढळले आहे. २०२४ ते २०२५ दरम्यान अमेरिकेत अशा तक्रारींच्या दरात ६३ टक्क्यांनी, तर कॅनडामध्ये १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्याची मागणी
बाल लैंगिक शोषणाचे स्वरूप एआयमुळे अत्यंत वेगाने बदलत असून ही एक अत्यंत चिंतेची बाब आहे, असे चाइल्डलाईटच्या डेटा संचालक प्रा. डेबी फ्राय यांनी सांगितले. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पॉल स्टॅनफिल्ड यांनी जगभरातील सरकारांना या समस्येला ‘प्रतिबंधित करता येण्याजोगी सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ म्हणून जाहीर करण्याचे आवाहन केले आहे.
Reab About: May 2024 Solar Storm : सौरवादळाने पृथ्वीचे अभेद्य किरणोत्सार विरोधी कवच भेदले!; किलर इलेक्ट्रॉन्सच्या संख्येत तब्बल ५,००० पट वाढ!
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.