नवे तंत्रज्ञान : ‘व्हाईब कोडिंग’च्या पुढचे एक पाऊल
मेलबर्न : AI Reverse Engineering – आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) वापर आता केवळ मेसेज टाईप करणे किंवा चॅट करण्यापुरता उरलेला नाही. एआयने आता थेट तंत्रज्ञान जगताच्या मूळालाच हात घातला आहे. मायक्रोसॉफ्ट ऑफिस असो वा अॅडोबसारख्या कंपन्यांची महागडी सॉफ्टवेअर्स लोक आता एआयच्या जोरावर ती मोफत मिळवण्याच्या मार्गावर आहेत. याला ‘रिव्हर्स इंजिनिअरिंग’ म्हटले जात असून, या नवीन तंत्रज्ञानामुळे येत्या काळात तंत्रज्ञान जगताचे चित्र बदलू शकते, अशी चर्चा रंगली आहे. आरएमआयटी युनिव्हर्सिटीच्या दाना मॅकके यांनी यावर प्रकाश टाकला.
आजकाल बाजारात ‘व्हाईब कोडिंग’ची बरीच चर्चा असते, ज्यामध्ये युजर एआयला एखादे नवीन सॉफ्टवेअर बनवायला सांगतो आणि एआय ते तयार करते. मात्र, जेव्हा एखादे मोठे आणि गुंतागुंतीचे सॉफ्टवेअर बनवायचे असते, तेव्हा ‘रिव्हर्स इंजिनिअरिंग’ अधिक प्रभावी ठरते. यात आधीपासून बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही महागड्या सॉफ्टवेअरचे विविध भाग एआयच्या मदतीने वेगळे केले जातात. त्यानंतर एआय अगदी तसाच कोड तयार करून तीच प्रणाली किंवा सॉफ्टवेअर पुन्हा नव्याने उभे करते. नुकताच याचा एक मोठा नमुना पाहायला मिळाला, जेव्हा एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने मायक्रोसॉफ्ट ऑफिस आणि अॅडोब फोटोशॉपच्या मोफत आवृत्त्या तयार केल्या. एवढेच नव्हे तर, ‘रिव्हर्स इंजिनिअरिंग एनीथिंग’ नावाचे एक विनामूल्य एआय टूल सध्या कोडिंगच्या वर्तुळात वाऱ्यासारखे व्हायरल होत आहे.
९० च्या दशकात जेव्हा इंटरनेट बाल्यावस्थेत होते, तेव्हा बरीच सॉफ्टवेअर्स मोफत किंवा ‘ओपन सोर्स’ स्वरूपात मिळायची. लोकांना एखादे फिचर आवडले नाही, तर ते स्वत: सोर्स कोड डाऊनलोड करून त्यात हवा तसा बदल करू शकत असत. परंतु, काळ बदलला आणि मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांनी पैसे कमावण्यासाठी सशुल्क सॉफ्टवेअर्स आणली. १९९८ मध्ये आलेल्या ‘डिजिटल मिलेनियम कॉपीराइट कायदा’मुळे अशा सॉफ्टवेअर्सच्या सुरक्षेला कायद्याचे मजबूत कवच मिळाले. त्यानंतर कोणालाही सॉफ्टवेअरचे ‘लॉक’ तोडणे किंवा त्यात फेरफार करणे बेकायदेशीर ठरले. या कायद्यामुळेच गुगल, अॅपल, अॅमेझॉन आणि फेसबुक यांसारख्या बलाढ्य ‘बिग टेक’ कंपन्यांच्या उदयासाठी पोषक वातावरण निर्माण झाले.
नवीन ‘एआय युटोपिया’पुढील आव्हाने
एआयमुळे महागडी सॉफ्टवेअर्स मोफत मिळण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली असली, तरी या प्रवासात काही मोठे अडथळे आणि अडचणी देखील आहेत. एआयने झटपट तयार केलेल्या कोडिंगमध्ये अनेकदा अत्यंत गुंतागुंतीचे बग (तांत्रिक बिघाड) निर्माण होतात, जे शोधणे आणि सुधारणे मोठी डोकेदुखी ठरू शकते. समजा, प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार सॉफ्टवेअरमध्ये बदल करून स्वत:ची आवृत्ती बनवली, तर एका युजरने तयार केलेली फाईल दुसऱ्याच्या सॉफ्टवेअरमध्ये उघडेलच याची कोणतीही खात्री देता येणार नाही. तुम्ही फोटोशॉपचे अगदी हुबेहूब क्लोन बनवले, तरी अॅडोबचे स्वत:चे एआय टूल्स किंवा फेसबुकचा मूळ युजर डेटा तुमच्याकडे असणार नाही. त्यामुळे केवळ सॉफ्टवेअर मोफत मिळाले तरी डेटाशिवाय त्याचा वापर मर्यादितच राहील.
भविष्यात काय घडणार?
हे नवीन एआय तंत्रज्ञान आपल्याला थेट नव्वदच्या दशकातील पूर्णपणे मोफत इंटरनेटच्या काळात घेऊन जाईलच असे नाही, परंतु यामुळे व्यावसायिक सॉफ्टवेअर्सच्या कमाईचे जुने मार्ग मात्र पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकतात. भविष्यात सॉफ्टवेअर तयार करणारे आणि ते वापरणारे ग्राहक यांच्यातील अधिकारांचे पारडे नेमके कोणाच्या बाजूने झुकते, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.
Read About : AI Global Trade Growth : टॅरिफ आणि युद्धाच्या तणावातही जागतिक व्यापाराला विक्रमी गती
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.