Ad Advertisement Ad Advertisement

Ambergris Seized : 4.35 किलो व्हेलची उलटी जप्त; किंमत तब्बल 4.35 कोटी, दोघे ताब्यात

गुजरातच्या बावळा परिसरात स्टेट मॉनिटरिंग सेलची कारवाई; वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार पुढील तपास

अहमदाबाद – Ambergris Seized गुजरात पोलिसांच्या स्टेट मॉनिटरिंग सेल ने अहमदाबाद ग्रामीणमधील बावला परिसरात एका मोठ्या कारवाईदरम्यान ४.३५४ किलो वजनाचे अंबरग्रीस म्हणजेच व्हेल माशाची उलटी) जप्त केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या जप्त केलेल्या पदार्थाची किंमत तब्बल ४ कोटी ३५ लाख रुपये आहे.

राज्यातील बेकायदेशीर कारवायांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिस महासंचालक जी. एस. मलिक यांनी दिले होते. या आदेशानुसार पोलिसांनी राजकोट-अहमदाबाद हायवेवरील आकृती आर्केड कॉम्प्लेक्स च्या पार्किंग एरियामध्ये छापा टाकून ही जप्तीची कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी अजय चावडा (आनंद जिल्हा) आणि हितेश चौहान (अहमदाबाद जिल्हा) या दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

फॉरेन्सिक लॅब आणि वन विभागाकडून तपासणी

पोलिस उपनिरीक्षक व्ही. के. राठोड यांच्या नेतृत्वाखाली हा छापा टाकण्यात आला. पोलिसांना पांढऱ्या, क्रीम, सोनेरी आणि तपकिरी रंगाचे कडक व ठोस अंबरग्रीसचे विविध आकाराचे तुकडे आढळले. त्यानंतर वन विभाग आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन या पदार्थाची तपासणी केली आणि तो अंबरग्रीस असल्याचे स्पष्ट केले.

जप्त केलेल्या अंबरग्रीसचे एकूण वजन ४ किलो ३५४ ग्रॅम असून त्याची अचूक किंमत ४,३५,४०,००० रुपये आहे. कारवाईदरम्यान जप्त केलेल्या मोबाईल आणि इतर साहित्यासह एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ४,३८,१७,७७० रुपये झाली आहे. पोलिसांनी या दोन्ही आरोपींना ‘वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत’ पुढील कारवाईसाठी बावला पोलिस ठाण्याकडे सुपूर्द केले आहे.

अंबरग्रीसला एवढी मागणी का असते?

वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार, स्पर्म व्हेल या माशाला शेड्यूल-१ अंतर्गत संरक्षण देण्यात आले आहे. अंबरग्रीसचा वापर प्रामुख्याने उच्च दर्जाच्या आणि महागड्या परफ्युम (सुगंधी अत्तर) उद्योगात फिक्सेटिव्ह म्हणून केला जातो, ज्यामुळे परफ्युमचा सुवास दीर्घकाळ टिकून राहतो. याशिवाय अगरबत्ती, सुगंधी तेल, काही पारंपारिक औषधे आणि कामोत्तेजक पदार्थ तयार करण्यासाठी याचा वापर केला जात असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात याला सोन्यासारखी किंमत मिळते.

Read About : Marine Drive Police Attack 2026 – ऑन-ड्युटी पोलिस कर्मचाऱ्याशी वाद; हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.