पोलिसांच्या नाकाबंदीचे बॅरिकेड्स तोडून पळण्याचा प्रयत्न; रस्त्यात अनेक वाहनांना धडक, अखेर नगावमध्ये पोलिसांनी पकडले
दिफू (आसाम) : Assam Police Chase आसामच्या कार्बी आंगलोंग जिल्ह्यात वाहन चोरीनंतर पोलिसांनी केलेल्या पाठलागाचा थरारक प्रकार समोर आला आहे. डोबोका येथून स्कॉर्पिओ वाहन चोरून पळणाऱ्या दोन व्यक्तींचा पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी पाठलाग केला. या पाठलागादरम्यान वाहनाचे दोन टायर फुटल्यानंतरही त्यांनी गाडी न थांबवता तब्बल ४२ किलोमीटर अंतर रिमवरून पार केल्याची माहिती समोर आली आहे. अखेर नगाव जिल्ह्यात पोलिसांनी वाहन अडवून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
टायर फुटल्यानंतरही वेग कायम
मिळालेल्या माहितीनुसार, स्कॉर्पिओ चोरीला गेल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने वाहनाचा माग काढण्यास सुरुवात केली. पोलिसांकडून पाठलाग सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतर वाहनातील व्यक्तींनी गाडीचा वेग वाढवला.
याचदरम्यान स्कॉर्पिओचे दोन टायर फुटले. मात्र, वाहन थांबवण्याऐवजी त्यांनी पुढे जाणे सुरूच ठेवले. टायर नसल्याने रस्त्यावर चाकांच्या रिम घासत असतानाही वाहन तब्बल ४२ किलोमीटर चालवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
अनेक वाहनांना धडक
पाठलागादरम्यान भरधाव स्कॉर्पिओने रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनांना धडक दिल्याची माहिती आहे. या घटनांमध्ये काही वाहनांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
चोरांना रोखण्यासाठी पोलिसांनी आकाशी गंगा पोलीस चौकीजवळ नाकाबंदी केली होती. मात्र, वाहनातील व्यक्तींनी बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला.
नगावमध्ये पोलिसांनी घातला सापळा
बॅरिकेड्स तोडून वाहन पुढे गेल्यानंतर पोलिसांनी तत्काळ पुढील भागातील पथकांना सतर्क केले. त्यानंतर नगाव जिल्ह्याच्या हद्दीत पोलिसांनी वाहनाची नाकाबंदी करत स्कॉर्पिओ अडवली.
अखेर वाहनातील दोन्ही व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले. वाहन चोरी, पोलिसांचा पाठलाग, बॅरिकेड्स तोडणे आणि इतर वाहनांना धडक देण्याच्या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.
Read About : Marine Drive Police Attack 2026 – ऑन-ड्युटी पोलिस कर्मचाऱ्याशी वाद; हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.