Ad Advertisement Ad Advertisement

Australia Renewable Energy Opposition – ‘क्लायमेट डिले’चा डाव? अक्षय ऊर्जा प्रकल्पांविरोधातील प्रचारामागे कोणाचे हितसंबंध?

क्वीन्सलँड विद्यापीठाच्या संशोधकांच्या विश्लेषणात आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे, जीवाश्म इंधन क्षेत्र आणि छुप्या राजकीय मोहिमांच्या भूमिकेचा आढावा

ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) : Australia Renewable Energy Opposition ऑस्ट्रेलियातील ग्रामीण आणि प्रादेशिक भागांमध्ये अक्षय ऊर्जा (रिनेवबल एनर्जी) प्रकल्पांवरून राजकीय वाद पेटला आहे. जमीन वापर, पर्यावरणावरील परिणाम आणि स्थानिक समुदायांशी संवादाचा अभाव याविषयीचे प्रश्न रास्त असले, तरी या विरोधामागे केवळ स्थानिक असंतोष नसून, आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यम समूह आणि जीवाश्म इंधन क्षेत्रातील हितसंबंधांचा मोठा हात असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे.

क्वीन्सलँड विद्यापीठाचे संशोधक क्लॉस ग्रॉब्नर आणि डॅनियल अँगस यांच्या विश्लेषणावर आधारित हा अहवाल ‘३६० इन्फो’ नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. पूर्वी हवामान बदलाचे अस्तित्वच नाकारले जायचे. मात्र, आता हवामान बदलाचे पुरावे स्पष्ट झाल्याने विरोधकांनी आपली रणनीती बदलली आहे. आता थेट हवामान बदल नाकारण्याऐवजी, त्यावर शोधल्या जाणाऱ्या उपायांवर प्रश्न उपस्थित केले जातात.
अक्षय ऊर्जेकडे वळणे अत्यंत महागडे आणि आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक आहे असा प्रचार केला जातो. जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कायम ठेवण्यासाठी काल्पनिक किंवा अपूर्ण तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला जातो, धोरणात्मक निर्णयांना उशीर कसा होईल यावर भर दिला जातो. याला ‘क्यायमेट डिले’ धोरण म्हटले जाते.

आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे

रूपरर्ट मर्डोक यांच्या ‘न्यूज कॉर्प’चा भाग असलेले ‘न्यूज २४’ (पूर्वीचे स्काय न्यूज ऑस्ट्रेलिया) यांसारखे माध्यम समूह राजकीय वादांना अति पक्षपाती (हायपर-पार्टिसन) चष्म्यातून दाखवतात. संशोधनानुसार, स्काय न्यूज ऑस्ट्रेलियाच्या युट्यूब चॅनेलवर कमेंट करणाऱ्या ५६% हून अधिक युझर्सनी अमेरिकेच्या ‘फॉक्स न्यूज’ वरही कमेंट्स केल्या होत्या. अमेरिकेत निर्माण केले जाणारे राजकीय व सामाजिक वाद ऑस्ट्रेलियातील स्थानिक मुद्द्यांशी जोडले जातात. यामुळे पवन ऊर्जा किंवा पॉवर लाईन्सवरील स्थानिक वाद सरकारी हस्तक्षेप आणि महानगरीय उचभ्रू (मेट्रोपॉलिटन एलिट्स) यांच्यातील लढा म्हणून रंगवला जातो.

‘ॲस्ट्रोटर्फिंग’ आणि छुप्या राजकीय जाहिराती

मोठ्या कंपन्या, विचार गट आणि राजकीय लॉबिंग करणाऱ्या संस्था मिळून असा आभास निर्माण करतात की, हा विरोध सामान्य नागरिकांचा किंवा शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त लढा आहे. या प्रक्रियेला ‘ॲस्ट्रोटर्फिंग’ (कृत्रिम रीतीने तयार केलेला लोकविरोध) म्हटले जाते. २०२५ च्या ऑस्ट्रेलियन निवडणुकीतील अभ्यासावरून दिसून आले की, अनेक छुप्या राजकीय मोहिमा आणि जाहिरातींमागे जीवाश्म इंधन क्षेत्रातील हितसंबंध लपलेले होते.

ग्रामीण ऑस्ट्रेलियासमोरील आव्हान

स्थानिक पातळीवर जमीन आणि पर्यावरणाविषयी असलेल्या रास्त चिंतेचा गैरफायदा आंतरराष्ट्रीय माहिती प्रणालीकडून घेतला जात आहे. यामुळे अक्षय ऊर्जेकडे होणारे संक्रमण मंदावत आहे. स्थानिक पातळीवरील वाद हे व्यापक राजकीय आणि सामाजिक संघर्षाचे रूप घेत आहेत.

Read About : NVIDIA AI Chip Dominance – एनव्हिडिया इतकी शक्तिशाली का? जेन्सेन हुआंग प्रकरणामुळे कंपनीसमोर नवे संकट
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.