गरज ५०० मजुरांची, कामावर आहेत केवळ १५० मजूर : कामाची गती मंदावली
छत्रपती संभाजीनगर : No Network Water Supply Delayed Labour Shortage: नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती देण्यासाठी बैठकांवर बैठका होत आहे, मात्र कामाची गती काही वाढत नसल्याचे चित्र आहे. शहरातील नो नेटवर्क भागात वितरण व्यवस्थेअंतर्गत जलवाहिन्या टाकण्यासाठी ५०० मजूरांची गरज आहे, मात्र या कामावर केवळ १५० मजूर काम करत आहेत. त्यामुळे कामाची गती मंदावली असून, उन्हाळ्यापूर्वी ‘नो नेटवर्क’ भागातील नागरिकांना पाणी देण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नावर पाणी फेरले जात आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत (एमजेपी) जीव्हीपीआर कंत्राटदार कंपनी पाणी योजनेचे काम करत आहे. मुख्य जलवाहिन्यांची कामे झाल्यानंतर शहरातील विविध ठिकाणच्या जलकुंभ उभारणी, अंतर्गत वितरण जलवाहिन्या टाकणे, मुख्य जलवाहिन्यांना अंतर्गत जलवाहिन्यांची जोडणी करणे, जलवाहिन्यांची टेस्टिंग व स्वच्छता करणे आदी कामांवर भर दिला जात आहे. सध्या शहर परिसरातील सातारा-देवळाई, हर्सूल, पडेगाव-मिटमिटा आदी नो नेटवर्क भागातील नागरिकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे टँकर व्यावसायिकांकडून दर वाढविण्यात आले असून, आगामी काळात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे जलवाहिनीची कामे पूर्ण करून लवकरात लवकर नळाचे पाणी देण्यासाठी लोकप्रतिनिधीकडून मागणी केली जात आहे. पाणी देण्यासाठी आतापर्यंत प्रशासनाने जाहीर केलेले मुहूर्त हुकले आहेत.
नळ कनेक्शनसाठी ७ हजार अर्ज
महापालिकेने नळ नो नेटवर्क भागातील नागरिकांना नळ कनेक्शन देण्यासाठी एसओपी तयार केली आहे, नळ कनेक्शनसाठीचे दरही निश्चित केले आहे. अर्जासोबत मालमत्ता कर भरणा केल्याची पावती जोडणे बंधनकारक केले आहे. आतापर्यंत सुमारे ७ हजार नागरिकांनी नळ कनेक्शनसाठी अर्ज केले आहेत. कागदपत्रांची पडताळची करून कनेक्शन देण्याचे काम प्लंबर असोसिएशनमार्फत सुरू करण्यात आलेले आहे.
कंत्राटदाराला मजूर वाढविण्याचे आदेश : आयुक्त
शहराअंतर्गत १९०० किलोमीटर अंतर्गत जलवाहिन्या टाकायच्या आहेत, त्यापैकी १३०० किलोमीटर अंतरावर जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. दिवाळीपूर्वी ३५० मजूर कामावर होते, हे मजूर दिवाळीनिमित्त गावी गेल्यामुळे काही दिवस हे काम बंद होते. सध्या १५० मजूर कामावर आलेले आहेत, अंतर्गत पाइपलाइन, गॅप जोडणीची कामे त्यांच्याकडून करून घेण्यात येत आहेत. २५ नोव्हेंबरपर्यंत मजुरांची संख्या वाढवून ३५० पर्यंत न्यावी, कामाची गती वाढविण्यासाठी या कामांवर किमान ५०० मजुर लावा, असे आदेश कंत्राटदार कंपनीला दिले आहेत. : अमोल येडगे, आयुक्त.
Read About : EPFO New PF Withdrawal Rules 2026 -पीएफधारकांना मोठा दिलासा
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.