Bihar women atrocities : गुन्हेगारी वाढली, नेतेही तसलेच निघाले. त्यातून बिहार मागे जात राहिला. आजही आयएएस, आयपीएस परीक्षेत बिहारमधील तरुणच मोठ्या संख्येने उत्तीर्णही होतात. मात्र तिथं इतर तरुणांना कुटुंब तिथं ठेवून रोजगारासाठी मुंबई व महाराष्ट्रात वा दक्षिणेकडील राज्यांत यावं लागतं.
एकेकाळी बिहार राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक चळवळीचं केंद्र होतं. राजेंद्र प्रसाद, जयप्रकाश नारायण, डॉ. राममनोहर लोहिया, कर्पुरी ठाकूर, बाबू जगजीवन राम आदी राष्ट्रीय नेते बिहारने दिले आहेत. देशात १९७४-७५ च्या काळात संपूर्ण क्रांतीच्या आंदोलनाची सुरुवात बिहारमधूनच झाली. प्राचीन काळी बिहार शिक्षणाचं महत्त्वाचं केंद्र होतं. नालंदा, विक्रमशीला, ओदंतपुरी, मिथिला या शैक्षणिक केंद्रात परदेशी विद्यार्थीही शिकायला येत. अनेक साहित्यिक, कवी, पत्रकार बिहारने दिले. भगवान गौतम बुद्ध यांना बिहारमधील ज्या वटवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली ते बोधगया देशा-परदेशातील लोकांसाठी धार्मिक पर्यटनाचं महत्त्वाचं स्थान आहे. पण नंतर येथील राजकारण पार बिघडून गेलं. कोणताही राजकीय पक्ष असो, त्यांच्या नेत्यांनी राज्याच्या विकासाकडे गांभीर्याने पाहिलं नाही. गुन्हेगारी वाढली, नेतेही तसलेच निघाले. त्यातून बिहार मागे जात राहिला. आजही आयएएस, आयपीएस परीक्षेत बिहारमधील तरुणच मोठ्या संख्येने उत्तीर्णही होतात. मात्र तिथं इतर तरुणांना कुटुंब तिथं ठेवून रोजगारासाठी मुंबई व महाराष्ट्रात वा दक्षिणेकडील राज्यांत यावं लागतं.
या बेरोजगारीमुळे आणि उद्योगधंदे नसल्याने तेथील तरुणांमध्ये नैराश्य आहे. कोणताही पक्ष सत्तेवर आला तरी काही करत नाही, ही भावना आहे. राजकीय पक्ष, नेते, प्रशासन आणि पोलीस यंत्रणा कमालीची भ्रष्ट आणि लाचखोर असल्याचं समोर आलं आहे. कोणताही पक्ष त्याला अपवाद नाही आणि या राजकीय व्यवस्थेमुळे लोकांना कसलाच धाक राहिलेला नाही. त्यातून तिथं गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. खूण, दरोडे, अपहरण, महिला अत्याचार, हल्ले या प्रकारात वाढ होत आहे आणि राज्यकर्ते हे चालवून घेणार नाही, अशा वल्गना करताना एकमेकांवर नाकर्तेपणाचे व भ्रष्टाचाराचे आरोप करत राहतात.
बिहार विधानसभेच्या २४३ पैकी १०२ आमदारांची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे. सुमारे चाळीस आमदारांवर हत्या, हत्येचा प्रयत्न, महिला अत्याचार वा दरोडा असे आरोप आहेत. भाजप, राष्ट्रीय जनता दल व युनायटेड जनता दल या तिन्ही पक्षांच्या आमदारांवर हे आरोप आहेत. राजकीय व्यवस्था अशी असेल तर तेथील कायदा व सुव्यवस्था कशी असेल, हे समजू शकतं.
ही घटना बिहारची राजधानी पाटणापासून काही अंतरावरील लाखोचक नावाच्या गावातली. अगदी अलीकडची म्हणजे १९ सप्टेंबरची. त्या गावातली एक दहा वर्षांची मुलगी अचानक हरवली. आई-वडिलांनी तिचा गावात, जवळच्या शेतात शोध सुरू केला. त्यांना एका शेतापाशी या अल्पवयीन मुलीचा रक्तबंबाळ मृतदेह आढळून आला. गळ्यातून खूप रक्त वाहत होतं. ते पाहून गर्दी जमली, पोलिसांना कळवण्यात आलं. ते पोहोचले. तिच्यावर अत्याचार झाल्याचं आणि तिची गळ्यात विळा खुपसून हत्या केल्याचं उघडकीस आलं. गर्दी वाढत असताना एक इसम दुरून हे सारं पाहत होता. त्यानेच या मुलीवर अत्याचार करून नंतर तिने आरडाओरड करून नये म्हणून तिची हत्या केल्याचं पोलीस तपासात आढळून आलं आहे. नंतर दोनच दिवसांनी बिहारच्याच जमुईमध्ये भर रस्त्यात काही तरुणांनी एका १७ वर्षांच्या तरुणीला जबरदस्तीने धरून तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. ती आणि सोबतचा मुलगा यांना त्यांनी मारहाण केली. हे सारं रस्त्यात अनेक लोकांच्या समोर घडलं; पण कोणीही त्या गुंडांना अडवायला वा रोखायला पुढं आलं नाही. या प्रकाराची कोणीतरी मोबाइलवर व्हिडिओ क्लिप तयार केली आणि सव्वाशे ते दीडशे व्हॉट्सॲप ग्रूपवर व्हायरल केली. त्या प्रकाराला माध्यमातून प्रसिद्धी मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपींची शोधाशोध सुरू केली. काहींना अटक झाली.
ओरड झाल्यावर तरी अशा प्रकारांना वचक बसेल असं वाटत असतानाच दोन दिवसांनी समस्तीपूरच्या गावात पुन्हा असा प्रकार घडला. एक तरुण व तरुणी जात असताना गावगुंडांनी तिला अडवून लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला आणि तिला मारहाणही केली. मला सोडा, नाही तर मी भावाला बोलवेन, असं ती ओरडत असताना, बोलव, तुझ्या भावाला असं म्हणत त्यातील एका गुंडाने तिला खाली पाडलं. ती व आधीच्या प्रकारातील तरुणी अत्याचारातून कशाबशा वाचल्या. या बातम्यामुळे देशभर खळबळ माजली आहे. बिहारमधील कायदा व सुव्यवस्था रसातळाला गेली आहे, कायद्याचा, पोलिसांचा आणि राज्य सरकारचा धाक राहिलेला नाही, अशी टीका तेथील विरोध पक्षांनी केली आहे. पण लैंगिक अत्याचारांचे प्रकार सुरूच आहेत. मुझफ्फरपूरच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णासोबत असलेल्या एका लहान मुलीला तरुणाने फूस लावून मोतिहारी इथं नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला. तिथून कसंबसं बाहेर पडून मुलीने प्रकार वडिलांना सांगितल्यावर पोलिसांनी आरोपीला अटक केली.
दोनच दिवस आधी परीक्षेला निघालेल्या दोन विद्यार्थिनींवरही गुंडांनी लैंगिक हल्ला केला. त्या दोघींनी आरडाओरड करताच लोक धावून आले आणि गुंड पळून गेले. कोचिंग क्लासला निघालेल्या एका मुलीवरही लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न काही तरुणांनी केला. कटिहार जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर ॲसिड फेकण्यात आलं. तिची प्रकृती चिंताजनक आहे. बिहारमध्ये रोज किमान ३ बलात्कार होतात. लैंगिक व अन्य महिला अत्याचार वेगळेच. ही नोंद झालेली माहिती. नव्वद टक्के अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद भीती व लाजेपोटी होतच नाही, असं सांगण्यात येतं. सत्ताधारी व विरोधक तात्पुरते जागे होतात आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या. मागास म्हणवून केंद्राकडून अधिकाधिक निधी मिळवायचा प्रयत्न बिहारच्या सरकारांनी सतत केला. निधी मिळाला, तरीही राज्य मागेच आहे. तिथले पूल कोसळत आहे, नव्या रस्त्यांना खड्डे पडत आहेत आणि शाळा, रुग्णालयाच्या भिंती गळत आहेत. हा पैसा कुठं जातो, हे स्पष्ट आहे. अशा व्यवस्थेत गुन्हेगारी, महिला अत्याचार वाढत जातात. हे दु:ख केवळ बिहारमधील सामान्य जनतेचं नसून देशाचं आहे आणि त्याच्या मागास असण्याचा आर्थिक भार इतर राज्यांनी किती काळ सोसत राहायचा, हा प्रश्नही आहे.
संजीव साबडे
संपर्क : ८८८८८४३३७१
Read About : Moradabad Murder Case : बायको आणि मेहुणी, दोघीजणी वैरिणी
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.