Ad Advertisement Ad Advertisement

Birth Death Certificate Online – जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी ऑनलाइनचे सोंग कशासाठी?

AMC कर्मचाऱ्यांकडून हार्ड कॉपीची मागणी

Birth Death Certificate Online छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने विविध सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. जन्म-मृत्यू प्रमाणपत्र काढण्यासाठी नागरिकांनी ऑनलाईन अर्ज करून, त्यासोबतच आवश्यक कागदपत्रे व पुरावे अपलोड केल्यानंतर त्यांना थेट प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे, मात्र ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्यांचा क्रमांक टाकून हार्ड कॉपी व झेरॉक्स कागदपत्रे जमा करण्याची मागणी झोन कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून होत आहे. हस्तलिखित अर्ज व कागदपत्रांची झेरॉक्स जमा करायची असेल तर ऑनलाइनचे सोंग कशासाठी असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

शहरातील नागरिकांना जन्म-मृत्यू प्रमाणपत्र काढण्यासाठी महापालिकेच्या झोन कार्यालयात जावे लागते. अर्जासोबत कागदपत्रे दिल्यानंतरही प्रमाणपत्र मिळत नाही. त्यासाठी वारंवार चकरा माराव्या लागतात. एजंटांमार्फत अर्ज केल्यावर मात्र सहज प्रमाणपत्र मिळते, असा अनुभव नागरिकांचा आहे. नागरिकांच्या तक्रारींचा ओघ वाढला. महापालिकेने स्मार्ट वर्कचा अवलंब करत, नागरिकांना विविध सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. एका क्लिकवर सहज व सोपी प्रक्रिया दिलेली आहे.

ऑनलाइन सुविधेचा वापर करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. मात्र त्यानंतरही नागरिकांकडून लेखी अर्ज व कागदपत्रांच्या झेरॉक्स जमा करण्याचा मोह काही कर्मचाऱ्यांनी सोडला नाही. त्यासाठी नागरिकांना कार्यालयात चकरा मारण्याची वेळ आली आहे. दोन-तीन आठवड्यापूर्वी मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी झोन कार्यालयांची तपासणी केली. यावेळी जन्म-मृत्यू विभागातील कामकाजाचा व प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेतला. प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन शुल्क भरण्याची अडचणही दूर केली. मात्र त्यानंतरही कार्यालयात चकरा मारण्याचा नागरिकांचा त्रास काही कमी झालेला नाही.

यासंदर्भात मनपा आयुक्त यांनी सांगितले की, जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी नागरिकांनी ऑनलाइन अर्ज करून संबंधित कागदपत्रे अपलोड केल्यास, त्यांना शुल्क भरण्यासाठी ऑनलाइन लिंक पाठविली जाते. या लिंकद्वारे त्यांनी शुल्क जमा केल्यानंतर प्रमाणपत्र मिळते. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड केलेली असल्यास नागरिकांना प्रमाणपत्र मिळाले पाहिजे. ऑनलाइन अर्ज केलेल्या नागरिकांकडून पुन्हा लेखी अर्ज व कागदपत्रांचे झेरॉक्स घेण्याची गरज नाही. याबाबत सर्व झोन अधिकारी, कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या जातील.

Digital Arrest Scam : डिजिटल अरेस्टच्या नावाने फसवणूक; सायबर भामट्यांच्या 3 सापळ्यांपासून सावध राहा
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.