तडजोडीच्या बहाण्याने पार्किंगमध्ये बोलावून हल्ला
Aurangpura Stabbing Case छत्रपती संभाजीनगर : जुना वाद आणि बहिणीसोबत बोलत असल्याच्या रागातून एका तरुणाने २६ वर्षीय तरुणावर चाकूहल्ला केला. ही घटना २९ सप्टेंबरला रात्री औरंगपुरा भागात घडली. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आर्यन भोसले (रा. अंबरहिल, हर्सूल), असे आरोपीचे नाव आहे. दिनेश राजू खरात (वय २६, रा. किलेअर्क) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत.
अधिक माहितीनुसार, पवन खरात आणि त्याचा मोठा भाऊ दिनेश खरात हे त्यांच्या कुटुंबासह सध्या किलेअर्क येथे राहतात. दिनेश हा बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात साफसफाईचे काम करतो. पूर्वी हे कुटुंब हर्सूल परिसरातील अंबरहिल येथे राहत होते. तेथे आर्यन भोसले त्यांचा शेजारी होता. त्यांच्यात नेहमी वाद व्हायचे. वेगवेगळ्या कारणावरून खटके उडायचे. मंगळवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास आर्यनने दिनेशला फोन करून वादावर तडजोड करायची असल्याचे सांगून औरंगपुऱ्यात बोलावले. दिनेशचा भाऊ पवन आणि त्याचा एक नातेवाईक पाठक फोटो स्टुडिओजवळ पोहोचले, मात्र दिनेश तिथे नव्हता.
- त्यानंतर आर्यनने शिवसेना भवनजवळील पुस्तकालयाच्या पार्किंगमध्ये बोलावले.
- पवन आणि त्याचा नातेवाइक तिथे पोहोचले तेव्हा आर्यन भोसले आणि इतर दोन-तीन मुले तिथे होती. दिनेश तिथे येताच आर्यनने दिनेशला एकट्यात बोलायचे असल्याचे सांगून बाजूला नेले.
- तिकडेच दिनेशच्या पाठीत उजव्या बाजूला चाकू खुपसला. हल्ला होताच दिनेश जीव वाचवण्यासाठी औरंगपुरा पोलीस चौकीच्या दिशेने पळाला, तर आरोपी आर्यन घटनास्थळावरून पसार झाला.
रक्तबंबाळ दिनेशवर शस्त्रक्रिया
रक्तबंबाळ अवस्थेतील दिनेशला आधी सिटी चौक पोलिसांकडे व तेथून तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. पाठीत गंभीर जखम झाल्याने दिनेशवर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याला ट्रॉमा आयसीयूत दाखल करण्यात आले आहे. आरोपी आर्यन भोसले पसार झाला असून सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी चौरे तपास करीत आहेत.
Read About : बायको आणि मेहुणी, दोघीजणी वैरिणी
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.