Ad Advertisement Ad Advertisement

BJP AIMIM Face-Off Over Handcarts – ‘स्थायी’च्या सभेत हातगाड्या सोडण्यावरून भाजप-एमआयएम आमनेसामने

जप्त केलेल्या हातगाड्या सोडा : एमआयएम, का सोडायच्या, चुकीच्या कामाचे समर्थन नाही : भाजप

छत्रपती संभाजीनगर : BJP AIMIM Face-Off Over Handcarts महापालिकेत मंगळवारी (दि.३) झालेल्या स्थायी समितीच्या सभेत हातगाड्यावरील कारवाईच्या मुद्द्यावरून भाजप विरुद्ध एमआयएम असा सामना रंगला. मुख्य बाजारपेठ, प्रमुख रस्त्यावर हातगाड्या लावून वाहतूकीस अडथळा निर्माण करणाऱ्या विक्रेत्यांच्या हातगाड्या मनपाकडून जप्त केल्या जातात, या हातगाड्या सोडाव्यात, अशी मागणी करत, मागील सभेत तुम्हीच आदेश दिले होते, अशी आठवणही एमआयएम नगरसेवकांनी सभापतींना करून दिली. त्यावर हातगाड्या का सोडायच्या, असे म्हणत चुकीच्या कामाचे समर्थन कदापि केले जाणार नाही, अशी भूमिका भाजप नगरसेवकांनी घेतली. यावरून भाजप-एमआयएम सदस्यांनी आवाज वाढवित आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या. त्यामुळे शांततेत सुरू असलेल्या सभेचे वातावरण काही वेळेसाठी चांगलेच तापले होते.

दोन-दोन महिन्यापासून मनपा अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या हातगाड्या सोडल्या नाहीत, हातगाड्यावर व्यवसाय करणारे गोरगरिब लोक आहेत, सणासुदीचा काळ असून, त्यांना व्यवसाय करू द्यावा, अशी असे म्हणत एमआयएम नगरसेवकांनी हातगाड्या सोडण्याची मागणी केली. त्याच्या या मागणीला नगरसेवक राजगौरव वानखेडे यांनी तीव्र विरोध केला. अनधिकृत काम करणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. परवाना नसताना, हे लोक कुठेही हातगाड्या लावतात, वाहतूकीला अडथळा निर्माण करतात, त्याचा नागरिकांना, वाहनधरकांना नाहक त्रास सहन करावा लागतो., याकडे वानखेडे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी भाजपचे इतर नगरसेवकही वानखेडे यांच्यासोबत उभे राहिले. अधिकृत हातगाड्यांनाच परवानगी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. त्यावर हॉकर्स झोन जाहीर करा, नंतर कारवाई करावी, अशी मागणी करत एमआयएमचे नगरसेवक उभे राहून बाजू मांडू लागले.

कुणाची जहागीर नाही : वानखेडे

शहरात मनमानी चालणार नाही. तुम्ही अनधिकृत कामे कराल, त्यावर मनपाने कारवाई करू नये, असे चालणार नाही, ‘संभाजीनगर किसी के बाप की जहागीर नही’, अशा शब्दांत नगरसेवक राजगौरव वानखेडे यांनी एमआयएम नगरसेवकांना सुनावले. महापालिकेकडे ज्यांची नोंदणी आहे, त्यांच्याच हातगाडया दंड लावून परत द्याव्यात, अशी भूमिका ठाकरे सेनेचे नगरसेवक सचिन खैरे यांनी मांडली.

सभा तहकूब करण्याचा सभापतींचा इशारा

हातगाडीच्या विषयावरून सुरू असलेला गदारोळ पाहता, सभापती मकरिये यांनीही आपला आवाज चढविला. ऐकून घ्या, एक-एकाने बोला, ज्याला सांगितले जाईल, त्यानेच बोलावे, नाहीतर सभा तहकूब करेन, असा इशारा त्यांनी दिला. सणासुदीच्या काळात लहान विक्रेत्यांवर कारवाई करू नका. मोठ्याचा आला गाडा..ग़रिबाचा झोपडा उडाला….अशी आमची भूमिका नाही. दिवाळीनंतर कारवाई करण्यात येईल., असे आदेशही त्यांनी दिले.

Read About : Cyber fraud in Chhatrapati Sambhajinagar – सायबर भामट्यांचा डल्ला! मोबाईल हॅक करून ज्येष्ठाचे ७.३० लाख लंपास
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.