Brahmaputra River : भारतात सर्वच नद्यांना देवी किंवा माता मानले जात असले तरी ब्रम्हपुत्रा हा एकच असा मोठा ‘नद’ (पुरुष रुपातील नदी) आहे, ज्याला पुराणात ‘ब्रम्हाचा पुत्र’ म्हटले गेले आहे.
महाविद्यालयीन जीवनात नद्यांवरील एक रंजक पुस्तक वाचण्यात आले. बहुदा ते नॅशनल बुक ट्रस्ट या नामांकित प्रकाशनाचे असावे. त्यातील ब्रम्हपुत्रा नदीवरील लेख खूपच माहितीपूर्ण होता. तिच्या भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक व नैसर्गिक वैभवाची या पुस्तकाने ओळख करून दिली. त्यातील एक माहिती तर तरुण-साहसी मनाला खूपच भावली. स्वातंत्र्यपूर्व काळापासून एक अलिशान क्रुझ (मोठी प्रवासी बोट) कलकत्त्याहून निघायची. पुढे गंगेच्या पात्रातून बंगालच्या उपसागरात शिरायची. मग ब्रम्हपुत्रा नदीच्या मुखातून उलटा प्रवास सुरू करायची. हौशी प्रवाश्यांना ती बोट थेट आसाममधील दिब्रुगडपर्यंत घेवून जायची. किती स्वारस्यपूर्ण व साहसी असेल तो प्रवास…? असे हे नदीतील प्रवासाचे आकर्षण आजही कायम आहे. असो, मध्यंतरी वाराणसी ते दिब्रुगडपर्यंत जाणाऱ्या अवाढव्य प्रवासी क्रुझची माहिती मिळाली. एम. व्ही. गंगा-विलास कंपनीचे हे क्रुझ जगातील सर्वांत लांब जलप्रवास करणारे क्रुझ आहे. ही बोट गंगा, भागीरथी, हुगळी, ब्रम्हपुत्रा यांसारख्या सत्तावीस नदीप्रणालींमधून जाते. गंगा-ब्रम्हपुत्रेच्या पात्रातून एकावन्न दिवसांत ही बोट पाच राज्यांतून तीन हजार दोनशे किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते.
पुढे स्थानीय इतिहासाची गोडी निर्माण झाली व अव्याहत प्रवास सुरू झाला. एकदा आसामचा इतिहास धुंडाळत होतो. ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ दिवंगत निनादजी बेडेकर यांचे सदैव मार्गदर्शन असायचे. त्यांनी कामाख्या देवीचे माहात्म्य सांगितले, अहोम साम्राज्याचा सेनापती लचित बडफुकनच्या पराक्रमाची कहाणी सांगितली. शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेवून हा योद्धा मुघलांच्या विरोधात कसा लढला. सराई घाटाचे युद्ध म्हणून ते प्रसिद्ध आहे. १६७१ मध्ये ब्रम्हपुत्रा नदीच्या आधारे हे नाविकयुद्ध लढले गेले. स्वराज्य निर्मितीत सह्याद्रीच्या दुर्गमतेचा शिवाजी राजांनी उत्तम उपयोग केला. तशी लचित बोडफुकनच्या विजयात ब्रम्हपुत्र नामक नदाचा (नदी नव्हे..!) मोठा वाटा होता. यातून समुद्र, नदी, पर्वत, वाळवंट या नैसर्गिक घटकांचे सामरिक व भूराजकीय महत्त्व नव्याने समजले, मग ब्रम्हपुत्रेच्या प्रेमात पडलो.
दोन वर्षांपूर्वी पुण्यात सरिता संमेलन झाले. रा. चिं. ढेरे संशोधन केंद्राने या संमेलनाचे आयोजन केले होते. विविध नामवंत अभ्यासक देशभरातील नद्यांवर बोलले. या संमेलनाने अत्यंत मौलिक असे सरिता-भान व ज्ञान दिले. त्यात ‘नदी-रजोदोष’ ही संकल्पना नव्याने कळली. नद्यांच्या रजोदोष किंवा रजस्वला होण्याच्या संकल्पनेचा उल्लेख पुराणांमध्ये मिळतो. नदी-रजोकाळ हा पावसाळ्यातील चार महिने असतो. त्या काळात विंध्य पर्वताच्या दक्षिणेला सर्वच नद्यांचे पाणी लाल असते. याउलट हिमालयातील नद्यांना रजोधर्म नाही. स्कंद पुराणानुसार सिंधू, शरयू, नर्मदा, यमुना, सरस्वती, गंगा, ब्रम्हपुत्रा आदी नद्या या रजोमुक्त मानल्या जातात आणि त्यांचे जल सदासर्वकाळ पवित्र असते.
ब्रम्हपुत्र नद हा आशिया खंडातील एक मोठा जलस्रोत आहे. तिबेट, चीन, नेपाळ, भारत व बांगलादेश अशा अनेक देशांच्या सीमांना सामावून घेणारा भव्यदिव्य नद आहे. तिबेटमधील कैलास पर्वतशृंखलेतील अंगसी हिमनद (स्थानिक नाव चेमायुंगडुंग) येथे ब्रम्हपुत्रा उगम पावते. तिबेटमधून पूर्वेकडे वाहत जावून ती अरुणाचल प्रदेशात उतरते. मग आसाममध्ये प्रवेश करते व पुढे बांगलादेशात ती जमुना नावाने गंगेला मिळते. तिच्या प्रवाहाची लांबी सुमारे २९०० किलोमीटर इतकी आहे.
ब्रम्हपुत्रेच्या खोऱ्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ५,८०,००० चौरस किलोमीटर आहे. ब्रम्हपुत्रेच्या खोऱ्यात मेघालयातील चेरापुंजी-मावसिनराम येथे जगातील सर्वाधिक पाऊस पडतो. या नदीला दरवर्षी पावसाळ्यात मोठे पूर येतात, त्यामुळे आसाम आणि बांगलादेशमध्ये प्रचंड नुकसान होते.
ब्रह्मपुत्रेला विविध नावांनी ओळखतात. तिबेटमध्ये यारलुंग त्सांगपो म्हणतात. अरुणाचल प्रदेशात सियांग किंवा दिहांग तर आसाममध्ये ब्रम्हपुत्रा होते. बांगलादेशात ती जमुना होते. सुबनसिरी, तिस्ता, लोहित, बराक, मानस आणि कामेग या तिच्या प्रमुख उपनद्या आहेत.
माजुली हे आसाम राज्यातील ब्रम्हपुत्रा नदीच्या मध्यभागी वसलेले जगातील सर्वांत मोठे नदी-बेट आहे. सप्टेंबर २०१६ मध्ये माजुलीला भारतातील पहिले बेट जिल्हा घोषित करण्यात आले. ब्रम्हपुत्रा नदीच्या पुरामुळे धूप होऊन या बेटाचे क्षेत्रफळ कमी होत आहे. सध्या ते अंदाजे ४०० ते ८८० चौरस किलोमीटरच्या दरम्यान मानले जाते. हे बेट आसामी नव-वैष्णव संस्कृतीचे प्रमुख केंद्र आहे. येथे अनेक प्राचीन सत्रे (मठ) आहेत, ज्यांची स्थापना पंधराव्या शतकात संत श्रीमंत शंकरदेव यांनी केली. या बेटावर प्रामुख्याने मिसिंग, देवरी आणि सोनोवाल कचारी या जमातीचे लोक राहतात. अली-आय-लिगांग हा येथील प्रसिद्ध उत्सव फेब्रुवारी महिन्यात साजरा होतो. येथील मुख्य व्यवसाय शेती आहे.
येथील शेतकरी शंभरहून अधिक प्रकारच्या पारंपरिक भाताची लागवड करतात. याशिवाय हातमाग, विणकाम, मासेमारी आणि मातीची भांडी बनवणे हे उद्योग या बेटावर चालतात. भारतात सर्वच नद्यांना देवी किंवा माता मानले जात असले तरी ब्रम्हपुत्रा हा एकच असा मोठा ‘नद’ (पुरुष रुपातील नदी) आहे. ज्याला पुराणात ‘ब्रम्हाचा पुत्र’ म्हटले गेले आहे. संस्कृत काव्यात ब्रम्हपुत्रेला ‘लोहित’ किंवा ‘लौहित्य’ असे म्हटले आहे. याचा अर्थ तांबड्या रंगाचे पाणी असा होतो. आसाममध्ये आजही ब्रम्हपुत्रेला ‘लाल नदी’ नावाने ओळखतात. ब्रम्हपुत्रेने अनेक संस्कतींना जन्म दिला, अहोम सारखे अनेक पराक्रमी राजवंश हिच्या आश्रयाने विकसित झाले. आजघडीला आपला भारत देश व शेजारी देश यांच्यात सीमांवरून सुप्त संघर्ष सुरु आहे. त्यात ईशान्येकडील राज्ये (सेव्हन सिस्टर्स) व ब्रम्हपुत्रेला मोठे भू-राजकीय महत्त्व आहे हे आपण विसरता कामा नये.
विजय सांबरे
vijaysambare@gmail.com
Read About: Caves and Rock Art : लेणी आणि कातळशिल्पे
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.