एमसीए अंडर-१४ क्रिकेट स्पर्धा, कर्णधार तन्मय औराडेची अष्टपैलू चमक; नाबाद ८७ धावांसह गोलंदाजीतही तीन बळी
छत्रपती संभाजीनगर : Chhatrapati Sambhajinagar Beat Jalna – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) वतीने आयोजित १४ वर्षांखालील मुलांच्या निमंत्रित साखळी क्रिकेट स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या युवा खेळाडूंनी दमदार कामगिरी करत जालन्यावर विजय मिळवला. सामना अनिर्णित राहिला असला, तरी पहिल्या डावात मिळवलेल्या ४५ धावांच्या महत्त्वपूर्ण आघाडीच्या जोरावर छत्रपती संभाजीनगरने बाजी मारली. या विजयाचा शिल्पकार कर्णधार तन्मय औराडे ठरला. फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर चमक दाखवत त्याने संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
पुण्यातील लोणी फुरसुंगी येथील एसएनएस क्रिकप्लस जिमखाना मैदानावर हा सामना पार पडला. छत्रपती संभाजीनगरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना जालना संघाने ६९.५ षटकांत सर्वबाद २६० धावा उभारल्या. जालन्याकडून अथर्व घणगावने १३६ चेंडूंत १७ चौकारांच्या मदतीने शानदार १०१ धावांची शतकी खेळी साकारली. कर्णधार साईश व्यासने ४५, तर कृष्णराज पाटीलने २१ धावा करत त्याला साथ दिली. छत्रपती संभाजीनगरकडून आरुष बेदमुथाने २३ धावांत ३ बळी घेत भेदक गोलंदाजी केली. कर्णधार तन्मय औराडेनेही ५९ धावांत ३ गडी बाद करत प्रतिस्पर्धी फलंदाजांना रोखले. दिपेश बोर्डेने दोन बळी मिळवत गोलंदाजीत योगदान दिले.
तन्मयची संयमी खेळी; संभाजीनगरला ४५ धावांची आघाडी
जालन्याच्या २६० धावांना प्रत्युत्तर देताना छत्रपती संभाजीनगरच्या फलंदाजांनी संयमी आणि जबाबदार खेळाचे प्रदर्शन केले. संघाने ९० षटकांत ९ बाद ३०५ धावा उभारत पहिल्या डावात ४५ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली. या डावात कर्णधार तन्मय औराडेने नेतृत्वाला साजेशी खेळी केली. त्याने तब्बल २०० चेंडूंचा सामना करत ११ चौकारांच्या मदतीने नाबाद ८७ धावा फटकावल्या. त्याची ही संयमी खेळी संघासाठी निर्णायक ठरली. तन्मयला सलामीवीर अर्जुन शेळकेने ८७ चेंडूंत ११ चौकार आणि एका षटकारासह केलेल्या ६५ धावांची मोलाची साथ दिली. दर्शील लोखंडेनेही ८८ चेंडूंत ८ चौकारांसह ५५ धावांची अर्धशतकी खेळी साकारली. आदर्शराजे घोलपने १९ धावांचे योगदान दिले. जालन्याकडून पृथ्वी पलानेने प्रभावी गोलंदाजी करत ४८ धावांत ५ बळी टिपले, तर अथर्व घणगावने दोन गडी बाद केले. मात्र, संभाजीनगरच्या फलंदाजांनी उभारलेल्या धावसंख्येमुळे संघाला पहिल्या डावात आघाडी मिळवण्यात यश आले.
दुसरा डाव अनिर्णित; पहिल्या डावातील आघाडी ठरली निर्णायक
दुसऱ्या डावात जालना संघाने २५ षटकांत एका गड्याच्या मोबदल्यात ९९ धावा केल्या. अरमानने नाबाद ४६, तर अथर्व घणगावने नाबाद ३३ धावा करत संघाचा डाव सावरला. मात्र, निर्धारित वेळ संपल्याने सामना अनिर्णित घोषित करण्यात आला. सामना अनिर्णित राहिला असला, तरी पहिल्या डावातील ४५ धावांची आघाडी छत्रपती संभाजीनगरसाठी निर्णायक ठरली. फलंदाजी आणि गोलंदाजीतील सांघिक कामगिरीच्या जोरावर संभाजीनगरच्या संघाने विजयाचे गुण आपल्या नावावर केले.
Read About : Historic Educational Institutions Fund – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक वारशाचे जतन होणार
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.