Ad Advertisement Ad Advertisement

Congress leaders booked over donkey use during protest – आंदोलनात गाढवाचा वापर करणे पडले महागात

काँग्रेस पदाधिकारी गोत्यात : प्राण्याचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Congress leaders booked over donkey use during protest छत्रपती संभाजीनगर : आंदोलनात गाढव घेऊन येऊन त्यास रखरखत्या उन्हात बिना चारा-पाण्याचे आखूड दोरीने बांधून ठेवल्याप्रकरणी सिटी चौक पोलिसांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांविरोधात प्राण्याच्या छळ अधिनियमांतर्गत तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहराध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम यांच्यासह मोईन कुरेशी, आमेर अब्दुल सलीम, मो.जाकीर दुर्गेश वैद्य व इतर २०-२५ जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. काँग्रेसच्या वतीने २८ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन करण्यात आले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी एक गाढव आणून त्यावर निवडणूक आयुक्तांचा फोटोही लावला होता. एक अनोळखी इसम या आंदोलनामध्ये मोईन कुरेशी व दुर्गेश वैद्य हे एक गाढव घेऊन आले. त्यास रखरखत्या उन्हात बिना चारा-पाण्याचे आखूड दोरीने बांधून तासभर सार्वजनिक रस्त्यावर उभे केले.

यावेळी जोरदार घोषणाबाजी करत, निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. गाढवाला अनावश्यक त्रास देऊन त्याला आगीपाशी उभे करून क्रूर वागणूक दिली. तसेच पुतळा जाळून सार्वजनिक रहदारीस अडथळा निर्माण करून लोकांच्या जिवितास धोका निर्माण होईल, असे कृत्य केले. याप्रकरणी प्राण्याचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० च्या कलम ११ तसेच भारतीय पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १३५, भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्यवे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक मुठाळ हे या प्रकरणाचा तपास करीत आहे.

आंदोलनानंतर पडले दोन गट

गुन्हा दाखल केल्यानंतर स्थानिक काँग्रेस पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये काँग्रेसची विचारसरणी आणि आक्रमक आंदोलन यावरून दोन गट पडले आहेत. लोकशाही मार्गाने, म.गांधीच्या सत्याग्रहाप्रमाणे आंदोलन करून आपली भूमिका व मागण्या शांतपणे मांडणे, हीच काँग्रेसची ओळख आहे. आमच्या काळात असे होत नव्हते. आक्रमक आंदोलन करणे ही काँग्रेसची पद्धत नाही, असे अनेक मुद्दे उपस्थित केले जात आहेत. तर दुसरीकडे अशाच पद्धतीने आक्रमकपणे आंदोलन करावे लागेल, अशी बाजू काही जण मांडत आहे. त्यावरून पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्येच आता दोन गट पडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read About : https://epunyanagari.com/tmc-symbol-row-supreme-court-eci-decision/
E-Paper: https://epaper.punyanagari.in/

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.