कार, सव्वातीन लाख रोकड लुटली : १२ गुंडांवर गुन्हा
Industrial contractor robbed over 12 crore commission छत्रपती संभाजीनगर : एका इंडस्ट्रियल कंत्राटदारावर १२ कोटींच्या कमिशनसाठी भरदिवसा दरोडा टाकण्यात आला. त्यांची १५ लाख रुपयांची कार आणि कारमधील सव्वातीन लाख रुपये रोकड लुटली. ३० सप्टेंबरला दुपारी अडीच वाजता चिकलठाणा एमआयडीसीत महिंद्रा शोरूमच्या मागील गल्लीत हा थरार घडला. याप्रकरणी कुख्यात गुंड राहुल चाबुकस्वार याच्यासह १२ गुंडांवर थेट दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुधीर गोरखनाथ कातकडे (वय ४०, रा. अमृत साई गोल्ड सिटी, पैठण रोड) आणि राहुल साहेबराव चाबुकस्वार (वय ४५, रा. पुंडलिकनगर) यांच्यासह १० ते १२ गुंडांचा आरोपींमध्ये समावेश आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी दिली. ज्ञानेश्वर दादासाहेब बारे (वय ३४, रा. शाश्वत रेसिडेन्सी, ईटखेडा) हे फिर्यादी आहेत. ते इंडस्ट्रियल कंत्राटदार आहेत. ३० सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर बारे हे चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील महिंद्रा शोरूमच्या मागील गल्लीत होते.
ते कार्यालयात असताना त्यांच्या ताब्यात असलेली इनोव्हा कार (एमएच २०, एफयू ७०००) पार्किंगमध्ये उभी होती. कारमध्ये चालक बसला होता. नेमके त्याचवेळी १० ते १२ गुंड आले. त्यांनी चालकाला धमकावून खाली उतरविले आणि कार घेऊन निघून गेले. त्यात कारमधील सव्वातीन लाख रुपये रोकडही गुंड घेऊन गेले. काही वेळातच हा थरार घडला. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
कमिशनसाठी टाकत होते दबाव
फिर्यादी बारे यांच्या तक्रारीनुसार, आरोपी राहुल चाबुकस्वार हा त्यांच्याकडे तब्बल १२ कोटी रुपये कमिशन मागत होता. हे कमिशन द्यावे आणि बारे यांनी घाबरून आपल्या सांगण्याप्रमाणे वागावे, या उद्देशाने सुधीर कातकडे आणि राहुल चाबुकस्वार यांनीच या गुंडांना पाठवून ही घटना घडवून आणल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच गुंडांनी लुटलेली इनोव्हा कार आणि सव्वातीन लाखांची रोकड ही राहुल चाबुकस्वार यानेच लपवून ठेवल्याचा संशय बारे यांनी तक्रारीत व्यक्त केला आहे.
गुन्हा आणि कलम
कलम ३१०(२) दरोडा, कलम ६१(२) गुन्हेगारी कट रचणे, कलम ११५ दुखापत करणे, कलम ३५१(२) व (३) धमकी, कलम ३५२ शिवीगाळ करणे, कलम ३५६(२) बदनामी करणे आदीप्रमाणे एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक पचलोरे अधिक तपास करीत आहेत.
Read About : https://epunyanagari.com/mobile-tower-scam-5g-tower-fraud/
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.