Ad Advertisement Ad Advertisement

Cristiano Ronaldo Retirement – रोनाल्डो युगाचा अंत!

आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा; प्रशिक्षकांसोबतचा वाद-मतभेद कारणीभूत, आता क्लब स्तरावर खेळताना दिसणार

Cristiano Ronaldo Retirement लिस्बन : आंतरराष्ट्रीय फुटबॉल विश्वातील एका सुवर्णयुगाचा अखेर अत्यंत भावनिक आणि अनपेक्षित अंत झाला आहे. कारण, पोर्तुगालचा महान फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने आंतरराष्ट्रीय फुटबॉलला कायमचा रामराम ठोकल्याची घोषणा केली आहे. ‘सीआर ७’ या टोपण नावाने प्रसिद्ध असलेल्या रोनाल्डोने या पुढे आपण देशाची जर्सी परिधान करून मैदानात उतरणार नसल्याची घोषणा गुरुवारी समाज माध्यमावरून केली. पोर्तुगाल संघाचे मुख्य प्रशिक्षक जॉर्ज जीझस यांच्याशी झालेला वाद आणि मतभेद या ४१ वर्षीय दिग्गजाच्या निवृत्तीमागचे मुख्य कारण ठरले आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे, तो क्लब स्तरावरील फुटबॉल खेळणे यापुढेही सुरूच ठेवणार आहे.

पोर्तुगालसाठी रोनाल्डोचा शेवटचा सामना २४ सप्टेंबर रोजी वेल्सविरुद्ध होता. पोर्तुगालने हा नेशन्स लीग सामना १-० ने जिंकला. यानंतर, मुख्य प्रशिक्षक जॉर्ज जीझस यांनी पुढच्या सामन्यात रोनाल्डोला सुरुवातीच्या अकरा खेळाडूंमध्ये स्थान दिले नाही. यावर स्पष्टीकरण देताना जीझस म्हणाले की, ‘पुढच्या सामन्यात रोनाल्डोला सुरुवातीपासून खेळवण्याची त्यांची योजना नव्हती.’ डावलण्यात आल्यानंतर रोनाल्डोने संघ शिबीर सोडण्याचा निर्णय घेतला. तथापि, जीझस यांनी नंतर सारवासारव करताना सांगितले की, रोनाल्डोचे संघात स्वागत आहे आणि परतण्याचा निर्णय त्यांचा होता. मात्र, रोनाल्डो त्यानंतर संघात परतला नाही आणि अखेरीस त्याची निवृत्ती जाहीर केली.

रोनाल्डो समाज माध्यमावरील लांबलचक व्हिडीओत म्हणतो, ‘पोर्तुगालच्या लोकांनो, तो दिवस आला आहे जेव्हा मी माझ्या राष्ट्रीय संघाची सात क्रमांकाची जर्सी परत करत आहे.’ तो पुढे म्हणाला, ‘ही जर्सी केवळ माझीच आहे, असे मला कधीच वाटले नाही; पण २३ वर्षे ती परिधान करण्याचा, तिचा सन्मान जपण्याचा आणि जगभरातील स्टेडियममध्ये माझ्या सोबत घेऊन जाण्याचा मान आणि जबाबदारी प्राप्त झाली.’ आपल्या भावना व्यक्त करताना तो पुढे म्हणतो की, ‘आज पुढच्या पिढीकडे सूत्रे सोपवण्याची वेळ आली आहे. नक्कीच हा निर्णय सोपा नव्हता, कारण काही निर्णय केवळ मनाने घेतले जात नाहीत, तर त्यात हृदयाचीही भूमिका असते. ऑगस्ट २००३ मध्ये सुरू झालेला आणि माझे आयुष्य कायमचे बदलून टाकणारा प्रवास आता संपला आहे. रोनाल्डो सध्या सौदी अरेबियाच्या अल-नसर क्लबसोबत करारबद्ध आहे. वर्तमान हंगामाच्या अखेरीस तो आपल्या क्लब कारकीर्दीचा शेवट करेल, अशी अपेक्षा आहे.

तरुण खेळाडूंच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा

पोर्तुगीज फुटबॉल फेडरेशनने रोनाल्डोच्या देशसेवेबद्दल ‘कृतज्ञता आणि प्रचंड आदर’ व्यक्त करणारे निवेदन जारी केले. फेडरेशनने म्हणते की, ‘ख्रिस्तियानो रोनाल्डोने पोर्तुगालची ओळख आणि प्रतिष्ठा नव्या उंचीवर पोहोचवली. त्याने तरुण खेळाडूंच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. विशेष म्हणजे युवा खेळाडू त्याच्या पावलावर पाऊल ठेवण्याचे स्वप्न पाहतात. आमच्यापैकी अनेकांसाठी, तो आतापर्यंतचा सर्वश्रेष्ठ खेळाडू आहे.’ फेडरेशनने असेही म्हटले आहे की, ‘रोनाल्डोच्या सन्मानार्थ एका विशेष समारंभाचे आयोजन करण्याची त्यांची योजना आहे. यामुळे चाहत्यांना आणि संपूर्ण देशाला खूप काही देणाऱ्या या खेळाडूचे पुन्हा एकदा कौतुक करण्याची आणि त्याचा उत्सव साजरा करण्याची संधी मिळेल.

सहा फिफा विश्वचषकांमध्ये सहभाग
  • रोनाल्डो दीर्घकाळचा समकालीन विश्वविजेता अर्जेंटिना संघाचा तत्कालीन कर्णधार लिओनेल मेस्सीला राष्ट्रीय संघाकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर निरोपाचा सामना खेळण्याची संधी गत महिन्यात मिळाली होती. मात्र, रोनाल्डोच्या नशिबी तसे सुख नव्हते.
  • रोनाल्डोने तब्बल सहा फिफा विश्वचषकांमध्ये सहभाग घेतला, युरोपियन चॅम्पियनशिप (२०१६) जिंकली आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पुरुष खेळाडूने सर्वाधिक गोल (१४६) करण्याचा जागतिक विक्रम त्याच्या नावावर आहे. मेस्सी त्याच्यानंतर १२६ गोलने द्वितीय क्रमांकावर येतो.
  • रोनाल्डो सध्या आपल्या कारकीर्दीत १,००० गोल करण्याचे ध्येय गाठण्याचा प्रयत्नात आहे. आंतरराष्ट्रीय आणि क्लब स्तरावर त्याने आतापर्यंत ९८५ गोल केले आहेत, त्यापैकी पोर्तुगालकडून २३४ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये विक्रमी १४६ गोलचा समावेश आहे.

Read About : India vs New Zealand 1st ODI 2026- भारताचा न्यूझीलंडवर 5 गडी राखून विजय

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.