Ad Advertisement Ad Advertisement

Why Are Children Becoming Violent? : मुलांमध्ये इतके क्रौर्य येते कुठून?

Why Are Children Becoming Violent? : कधी कधी लहानगी मुले इतके विचित्र वर्तन करतात, त्यांच्यात हिंसक स्वभावछटा आढळतात की त्या वर्तनामागील कार्यकारणभाव शोधणे वा असे का घडले असावे याची सुसंगत साखळी लावणेही अवघड होऊन बसते. पण, या मुलांमधील क्रौर्याच्या भयावह वर्तनछटा वेळीच ओळखल्या नाहीत, त्यांना आवर घातला नाही, सुधारले नाही, त्यांच्याकडे योग्य प्रकारे लक्ष दिले नाही तर काय होते ते हरयाणात नुकत्याच घडलेल्या घटनेतून भीषणपणे समोर आले आहे. आठ वर्षांच्या या मुलाने केजीतील एका चिमुरडीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तिचे डोके बेंचवर वारंवार आदळले, इतक्यावरच त्याचा राग न शमल्यामुळे त्याने कुंडीही आणून तिच्या डोक्यात घातली. आता ही लहानगी बिचारी मृत्यूशी झुंज घेत आहे. विशेष म्हणजे गंभीर जखमी अवस्थेत पडलेल्या या मुलीकडे तिच्या आई-वडिलांना हाच मुलगा घेऊन गेला. हे कसले क्रौर्य आहे, हे या मुलांच्या मनात जन्मते तरी कसे; अशा चिंतित करणाऱ्या प्रश्नांचे आव्हान आजच्या मानसशास्त्रज्ञांपुढे आणि आजच्या पिढीतील पालकांसमोर उभे ठाकले आहे.

पंचकुला येथील एका शाळेतील या सहा वर्षांच्या चिमुरमुडीवर झालेल्या या अमानुष हल्ल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. तो पाहिला तर अंगावर शहारे येतात, त्या मुलाचा उद्रेक पाहून संवेदनशील मनेही हेलावतील, हळहळतील अशी अस्वस्थ करणारी ही चित्रफित आहे. या अत्यंत निर्घृण हल्ला करणाऱ्या आठ वर्षांच्या मुलाला पब्जी आणि इतर हिंसक व्हिडीओ गेम्स खेळण्याची सवय होती, यामुळेच त्याच्या मनोवस्थेवर इतका टोकाचा परिणाम झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. या मुलाला बाल निरीक्षणगृहात पाठवण्यात आले आहे. एक चांगली गोष्ट म्हणजे गंभीर जखमी झालेल्या या चिमुरडीची प्रकृती सुधारत आहे. तरीही हा मुलगा तिला एका रिकाम्या वर्गखोलीत घेऊन जातो, तिला इतकी अमानुष मारहाण करतो हे भयानक वास्तव हादरवणारे आहे. या हिंसाचाराच्या मुळाशी नेमके काय आहे? पहिले कारण आहे घरातील वातावरण. अनेक घरांत आज रागवलेल्या मुलांना समजावून शांत करण्याऐवजी दुर्लक्ष केले जाते.

आई-वडिलांचे वाद, प्रसंगी जोडीदारावर हात उचलणे, घरातील तणाव, मुलावर सतत ओरडणे, मारणे, यातून राग व्यक्त करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हिंसा असे काहीसे या मुलांच्या मनावर नकळत बिंबवले जात असते. ज्या मुलाला घरात मार खावा लागतो, ती बाहेर इतरांना मारतात. दुसरे आणि त्याहून मोठे कारण म्हणजे मोबाईल आणि व्हिडीओ गेम्सचे व्यसन. हिंसक गेम्स, रील्स, वेब सीरिजमधील मारामारी, खून, रक्तपात पाहणारे मूल हळूहळू या गोष्टींना सर्वसाधारण मानू लागते. त्याला वाटते, राग आला की मारणे म्हणजे शौर्य. तिसरे कारण म्हणजे सहानुभूतीचा अभाव. आजची बरीचशी मुले एकटीच वाढत असतात. कुटुंबे छोटी झाली, शेजारीपाजारी फारसे आस्थेचे संबंध राहिले नाहीत, मैदानावरचे खेळ, समूह सहभागाचे उपक्रम नाहिसे झाले, त्यामुळे त्यांच्यात माणुसकी, दया, समजून घेण्याची भावना विकसितच होत नाही. चौथे कारण म्हणजे शाळेतील दबाव. गुणांची शर्यत, तुलनात्मक वागणूक, शिक्षकांचे अपमानास्पद बोलणे, मित्रांकडून होणारी चिडवाचिडवी; यातून मुलांच्या मनात साचणाऱ्या असुरक्षितता आणि रागाचा योग्य प्रकारे निचरा होत नाही तेव्हा अशा नकारात्मक भावनांचा हिंसक उद्रेक होतो.

यात जागतिक पातळीवर एकच सूत्र दिसते – जिथे मुलांना भावनिक आधार मिळत नाही, जिथे त्यांच्या रागाचा निचरा योग्य प्रकारे पालकांकडून होत नाही, तिथे तो राग हिंसेत रूपांतरित होतो. जगविख्यात मनोविश्लेषक सिग्मंड फ्रॉईडच्या मते, मुलांमध्ये जन्मत:च ‘थॅनाटोस’ म्हणजे विध्वंसक प्रवृत्ती असते. ती दडपली गेली की नैराश्य वाढते आणि अनियंत्रित झाली की हिंसेतून व्यक्त होते. आधुनिक मनोविश्लेषक एरिक एरिक्सन यांच्या मते, लहान वयात मूल स्वत:ची ओळख शोधत असते, त्याला समाजात मान हवा असतो. तो मान, दरारा हिंसेतून मिळत असेल तर मूल हिंसक होते. बाल मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मीना प्रभू यांच्या मते, आजची मुले ‘भावनिक दुष्काळात’ वाढत आहेत. आई-वडील नोकरीसाठी बाहेर, आजी-आजोबांपासून दूर, घरात फक्त टीव्ही आणि मोबाईल, त्यामुळे त्यांच्या भावनिक गरजा पूर्ण होत नाहीत. डॉ. विदुला कुलकर्णी म्हणतात की, हिंसक व्हिडीओ गेम्स आणि रील्स पाहणाऱ्या मुलांच्या मेंदूत आक्रमकतेचे हार्मोन्स वाढतात आणि सहानुभूती कमी होते, त्यामुळे ते समोरच्याच्या वेदना समजूनच घेत नाहीत.

या समस्येकडे केवळ ‘मूल बिघडले’ म्हणून पाहणे चुकीचे आहे. मूल बिघडत नाही, मूल बिघडवले जाते. घरोघरी छोट्या पडद्यावर चॅनेलवर मुले हिंसेचा अतिरेक पाहत असतात, रक्तपात पाहत असतात, तेच त्यांच्या मनात रुजत जाते आणि जेव्हा हे मूल हिंसा करते तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटते; ही आपलीही चूक आहे. यावर उपायांची सुरुवात घरापासूनच करावी लागेल. घरातील मोठ्यांचे नकारात्मक वर्तन थांबवावे लागेल, मुलावर हात उचलणे, त्याचा अपमान करणे थांबवावे लागेल. रागावलेल्या मुलांना बोलते करावे लागेल. टीव्ही, मोबाईलवर मुलांनी काय पाहायचे, कोणते गेम खेळायचे, कोणते व्हिडीओ पाहायचे यावर पालकांनी लक्ष ठेवले पाहिजे. सरकारनेही हिंसक कंटेंटवर मर्यादा आणायला हव्यात. मुलांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे ही शाळांचीही तितकीच जबाबदारी आहे. त्यासाठी शाळेत समुपदेशक नेमावा लागेल, मुलांना राग नियंत्रणाचे धडे शिकवावे लागतील, मुलांना भावना व्यक्त करायला शिकवावे लागेल. रडणे म्हणजे कमजोरी नाही, माफी मागणे म्हणजे हार नाही हे शिकवावे लागेल; समाज म्हणूनही आपल्याला जागे व्हावे लागेल.

Read About : Bank Liability in Digital Arrest Scams : उपकार नव्हे, जबाबदारी!
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.