Ad Advertisement Ad Advertisement

El Nino 2026 – ‘एल निनो’ ची तीव्रता डिसेंबरमध्ये सर्वोच्च पातळीवर जाणार

‘डब्ल्यूएमओ’ च्या अंदाजाला तज्ज्ञांचा दुजोरा

छत्रपती संभाजीनगर : El Nino 2026 ‘एल निनो’शी संबंधित उष्णतेचे नवे विक्रम नोंदवले जाण्याचा अंदाज हवामानतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. काही भागांमध्ये ‘एल निनो’ चा प्रभाव आतापासूनच प्रकर्षाने जाणवू लागला आहे. ‘एल निनो’ची सध्या असलेली स्थिती तीव्रतेच्या बाबतीत अभूतपूर्व असू शकते, असा इशारा जागतिक हवामान संघटनेने (डब्ल्यूएमओ) आपल्या नव्या अंदाजात दिला आहे.
तज्ज्ञांकडून प्राप्त माहितीनुसार नोव्हेंबर २०२६ ते जानेवारी २०२७ या कालावधीत उष्ण कटिबंधीय, प्रशांत सागरी प्रदेशात तापमान ३.८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढू शकते, असे डब्ल्यूएमओने म्हटले आहे.


तापमान सर्वोच्च पातळीवर?

डिसेंबरमध्ये ‘एल निनो’ ची तीव्रता सर्वोच्च पातळीवर पोहोचण्याची अपेक्षा असताना, त्याच्या काही आठवडे आधीच त्याची तीव्रता वाढत चालली आहे. ‘एल निनो’ शी संबंधित अनेक महत्त्वाचे मापदंड आता विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाने ताज्या अहवालात म्हटले आहे की, मध्य प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील पाण्याचे सरासरी साप्ताहिक तापमान आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे.


विक्रमी प्रभाव काय?

याआधी, सप्टेंबरमध्ये शास्त्रज्ञांनी मध्य-पूर्व प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागावरील दैनंदिन तापमानाने नवा विक्रम नोंदवल्याचे जाहीर केले होते. २०१५ मध्ये अत्यंत तीव्र ‘एल निनो’च्या काळात नोंदवलेला विक्रम यावेळी मोडला आहे. उष्ण कटिबंधीय प्रशांत महासागराच्या काही भागांमध्य प्रथमच पाण्याचे तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवले गेले आहे.


तापमानवाढ किती ?

‘एल निनो’ ही नैसर्गिक हवामान प्रक्रिया आहे. साधारणपणे दर दोन ते सात वर्षांनी ती घडते आणि तिचा प्रभाव सुमारे एक वर्ष टिकतो. मात्र, मानवी कृतींमुळे होणाऱ्या हवामान बदलामुळे प्रशांत महासागराचे तापमानही वाढत आहे. त्यामुळे ‘एल निनो’च्या काळात नैसर्गिकरीत्या होणाऱ्या तापमानवाढीची तीव्रता नेमकी किती आहे, हे समजणे कठीण होत आहे.


तापमानवाढीची व्याप्ती

प्रशांत महासागरातील तापमानवाढ आता ‘एल निनो’वर लक्ष ठेवण्यासाठी सामान्यत: वापरल्या जाणाऱ्या उष्णकटिबंधीय प्रदेशाच्या पलीकडे पसरली आहे. १९७२-७३, १९८२-८३, १९९७-९८ आणि २०१५-१६ या काळात आलेल्या मोठ्या ‘एल निनो’ घटनांशी सध्याच्या परिस्थितीची तुलना केली असता प्रशांत महासागराच्या अधिक विस्तृत भागात तसेच मेक्सिकोच्या आखातापर्यंत पाण्याचे तापमान वाढल्याचे दिसून येते.


‘एल निनो’ चे परिणाम

पुढील वर्षीच्या सुरुवातीपर्यंत याचा प्रभाव जाणवेल. त्यामुळे उष्णतेचे नवे विक्रम नोंदवले जाण्याचा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत. त्यामुळे यंदाचा हिवाळा आव्हानात्मक असेल, अशी शक्यता आहे. ‘एल निनो’ मुळे काही भागांत भीषण दुष्काळ पडू शकतो, तर इतर काही भागांत मुसळधार पाऊस आणि पूर येऊ शकतो, तर काही भागांत उष्णतेचे प्रमाण वाढू शकते.


पुढच्या वर्षी काय?

जागतिक हवामान संघटनेच्या (डब्ल्यूएमओ) मते, हवामान बदलामुळे ‘एल निनो’ च्या घटना अधिक तीव्र किंवा अधिक वारंवार घडत आहेत, याचा सध्या कोणताही पुरावा नाही. मात्र, हा विषय अद्याप वैज्ञानिक संशोधनाचा महत्त्वाचा भाग आहे. ऐतिहासिक नोंदींनुसार, ‘एल निनो’ असलेल्या वर्षांतील जागतिक तापमान सामान्यत: ‘एल निनो’ नसलेल्या म्हणजेच तटस्थ परिस्थिती असलेल्या वर्षांपेक्षा अधिक असते. त्यामुळ २०२६ हे वर्ष आतापर्यंतच्या सर्वाधिक उष्ण वर्षांपैकी एक ठरण्याची शक्यता आहे.


भीषण दुष्काळाची चिन्हे!

१९९७-९८ मधील ‘एल निनो’ मुळे आग्नेय आशियातील अनेक भागांमध्ये भीषण दुष्काळ पडला. त्यामुळे दलदलीच्या जमिनींसह जंगलांमध्ये वणवे लागले. त्याच वेळी, पूर्व आफ्रिकेतील काही भागांमध्ये विनाशकारी पूर आले. तर दक्षिण आफ्रिकेच्या प्रदेशातील देशांना अनेक दशकांतील सर्वांत भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला. उष्णकटिबंधीय चक्रीवादळांची स्थिती हा आणखी एक वारंवार दिसणारा परिणाम आहे. ‘एल निनो’च्या तीव्र घटनांमुळे सामान्यत: अटलांटिक महासागरातील चक्रीवादळांची संख्या किंवा हालचाल कमी होते, तर प्रशांत महासागराच्या काही भागांमध्ये चक्रीवादळांची सक्रियता वाढते. २०२६ मध्येही असेच चित्र दिसून आले आहे.
डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ.

Read About : Antarctica Glacier Melting : नासाच्या उपग्रह छायाचित्रांत दिसली कवटीसारखी रचना
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.