Ad Advertisement Ad Advertisement

Ambad Mosambi Orchard Loss दुष्काळ, रोगराईच्या दुहेरी संकटात मोसंबी बागा उद्ध्वस्त

स्लग : बागांचे ५० ते ६० टक्के नुकसान, बागा तोडण्याकडे शेतकऱ्यांचा कल

Ambad Mosambi Orchard Loss अंबड : अंबड तालुक्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने निर्माण झालेली तीव्र पाणीटंचाई आणि मोसंबी बागांवर आलेल्या रोगराईच्या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. पाण्याअभावी बागा कोमेजत असतानाच फळगळती आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. या दुहेरी संकटामुळे मोसंबी उत्पादकांचे सुमारे ५० ते ६० टक्के नुकसान झाल्याचा अंदाज असून, आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने अनेक शेतकरी बागा तोडण्यास सुरुवात केली आहे.

यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने तालुक्यातील विहिरी आणि कुपनलिकांच्या पाणीपातळीत मोठी घट झाली आहे. परिणामी, फळबागांना पाणी देणे कठीण झाले असून, तरुण आणि जोमदार मोसंबीची झाडे डोळ्यांदेखत कोमेजत आहेत. पाण्याच्या टंचाईसोबतच हवामानातील प्रतिकूल बदलांचाही फटका बागांना बसला आहे. झाडांवरील फळांची मोठ्या प्रमाणात गळ होत असल्याने उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे.

‘काळा मँगू’ रोगाचा प्रादुर्भाव

फळगळतीतून वाचलेल्या मोसंबीच्या फळांवर ‘काळा मँगू’ रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. रोगाच्या नियंत्रणासाठी महागड्या औषधांची फवारणी करूनही अपेक्षित परिणाम मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पाणीटंचाई आणि रोगराईमुळे झाडांची वाढ खुंटली असून, फांद्या कोमेजण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, मोसंबी बागांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

भाव असूनही उत्पादन खर्च निघेना

सध्या बाजारात मोसंबीला प्रतिटन १२ ते १३ हजार रुपये दर मिळत असला, तरी उत्पादनात मोठी घट झाल्याने हा दर शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत नाही. बागांच्या देखभालीसाठी केलेला खर्च, औषधांची फवारणी आणि पाणी व्यवस्थापनाचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने बाधित मोसंबी बागांची तातडीने पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

मोसंबी उत्पादनाचे भवितव्यच संकटात

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठोस उपाययोजना न झाल्यास पुढील हंगामात अनेक शेतकरी मोसंबीच्या बागा काढून कमी पाण्यात येणाऱ्या पर्यायी पिकांकडे वळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुक्यातील मोसंबी उत्पादनाचे भवितव्यच संकटात आले आहे.

Read About : Husband Suicide After Wife Affair – पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची सासरवाडीतच आत्महत्या
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.