Daniel Camargo Barbosa : दक्षिण अमेरिकेच्या पर्वतांमध्ये आणि मँग्रोव्हच्या दाट सावल्यांमध्ये डॅनियल कामार्गो बार्बोसाच्या नावाची अजूनही दहशत आहे. ‘मॉन्स्टर ऑफ द मँग्रोव्हज’ या टोपणनावाने ओळखला जाणारा हा कोलंबियन पुरुष सत्तर-ऐंशीच्या दशकात कोलंबिया आणि इक्वाडोरमध्ये डझनभर तरुण मुलींचे बलात्कार आणि खून करणारा सीरियल किलिंगचा केंद्रबिंदू ठरला. त्याने कबूल केलेल्या किमान सत्तर हत्यांपासून ते अन्य व्यक्तींनी दिलेल्या माहितीप्रमाणे त्याने केलेल्या दीडशेहून अधिक हत्यांची कहाणी केवळ खुनाच्या गुन्ह्यांपुरती सीमित नाही. त्याच्या बालपणीच्या वेदना, सामाजिक दुर्लक्ष, स्त्री-द्वेषाची विकृती आणि न्यायव्यवस्थेच्या मर्यादांची टोकदार कहाणी या हत्यांमध्ये दडलीय.
डॅनियल बार्बोसाचा जन्म २२ जानेवारी १९३० रोजी कोलंबियातील कुंडिनमार्का प्रांतातील अनोलाइमा या छोट्या गावात झाला. बालपणी तो देखील अन्य समवयीन मुलांसारखा सामान्य खेळकर मुलगा होता. त्याच्यात असभ्यतेची कोणतीही लक्षणे नव्हती. त्याचं शैशव आनंदी होतं, मात्र हे सुख फार कमी काळ टिकले. त्याच्या आईचे अकाली निधन झाले तेव्हा तो एक वर्षाचाही नव्हता. त्याचे वडील भावनिकदृष्ट्या दृढनिश्चयी होते. त्यांचा स्वभाव कठोर होता. प्रापंचिक आणि शारीरिक गरजांपायी त्यांनी दुसरे लग्न केले. डॅनियलची सावत्र आई डायोसेलिना फर्नांडेज ही बाळंतपणाच्या समस्यांनी ग्रस्त होती आणि तिला मुलगी हवी होती. या मनोव्याधीतून छोट्या डॅनियलवर तिने राग काढला. सावत्र आईने त्याचा शारीरिक, मानसिक छळ केला. त्याला मुलींचे कपडे घालून शाळेत पाठवले जायचे; वर्गमित्र त्याची चेष्टा करत. सावत्र आईकडून त्याला अनेकदा चाबकाने मारहाण केली जायची, अपमानित केले जायचे. या अपमानाने आणि नाकारलेपणाने त्याच्यात स्त्रियांबद्दल खोलवर द्वेष निर्माण झाला. त्यातून एक वेगळीच विकृतेच्छा प्रसवली; त्याला अटक केल्यानंतर त्याच्या ज्या मानसशास्त्रीय चाचण्या घेतल्या, त्यातून हे सत्य समोर आलेलं. हुशार विद्यार्थी म्हणून तो ओळखला जाई. घरातील त्रासापायी तसेच आर्थिक अडचणींमुळे त्याला शिक्षण अर्धवट सोडावे लागले; लहानपणापासूनच कामाला लागावे लागले.
तरुणपणी तो फिरस्ता विक्रेता म्हणून काम करायचा. १९५८ मध्ये बोगोटामध्ये छोट्या चोरीच्या गुन्ह्यात त्याला पहिल्यांदा अटक झाली. अटकेत असताना त्याला आणखी हीन वागणूक मिळाली. परिणामी सुधारणा होण्याच्या त्याच्या सर्व आशा मावळल्या. यानंतर त्याचे आयुष्य कायमचे गुन्हेगारीकडे झुकले. १९६० च्या दशकात त्याने अल्सिरा कॅस्टिलोशी हिच्याशी विवाह केला, त्यांची ओळख जुनी होती. काही नोंदींनुसार त्यांना दोन मुले झाली, पण नातेसंबंध टिकला नाही. आपली पत्नी अल्सिरा हिने दुसऱ्याशी संबंध ठेवल्याचे त्याला कळले, तेव्हा तो संतापाने लालबुंद झाला. स्त्रियांविरोधात त्याच्या मनात पूर्वीपासूनच लाव्हा धुमसत होता त्यात अधिकच वाढ झाली. त्याने नंतर कबुली दिली की, समस्त स्त्री जातीलाच तो आपल्या सर्व दु:खांचे कारण समजत असे.
अल्सिरा कॅस्टिलोसोबर काडीमोड घेतल्यानंतर त्याने एस्पेरान्झा नावाच्या स्त्रीसोबत संधान बांधले. एस्पेरान्झाच्या मदतीने तो मुलींना फसवून घरी आणू लागला. खाद्यपदार्थात औषध घालून त्यांना बेशुद्ध करून अत्याचार केला जाई. चार मुलींच्या आयुष्याचे त्याने वाटोळे केले, मात्र पाचव्या मुलीच्या अब्रूवर घाला घालण्याआधीच त्या मुलीला शुद्ध आली. तिने कशीबशी सुटका करून घेतली. बाहेर पडताच त्याच्या विरोधात तक्रार केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. १९६४ मध्ये दोघांनाही अटक झाली. डॅनियलला लैंगिक अत्याचारासाठी सुरुवातीला तीन वर्षे, नंतर अपीलमध्ये आठ वर्षांची शिक्षा झाली.
आपली शिक्षा कमी व्हावी म्हणून त्याने पश्चात्ताप करण्याचे वचन दिले होते, पण शिक्षेतील वाढीमुळे त्याच्या मनातला कडवटपणा वाढला. ही शिक्षा भोगल्यानंतर तो आणखी क्रूर झाला. शिक्षा होण्यापूर्वी तो फक्त लैंगिक अत्याचार करायचा, आता मात्र त्याने पीडित मुलींना जीवे मारण्यास सुरुवात केली. सत्तरच्या प्रारंभी कोलंबियात त्याने अनेक मुलींवर अत्याचार करून गळा दाबून हत्या केली. ३ मे १९७४ रोजी बॅरँक्विला येथे नऊ वर्षीय मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावत असताना तो पकडला गेला. पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. जवळपास ऐंशी मुलींचे लैंगिक शोषण करून त्यांची निर्घृण हत्या त्याने केल्या होत्या. या सर्व हत्यांची कबुली देऊनही त्यातील एका खुनाकरिता त्याला पंचवीस वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. १९७७ साली, गोर्गोना बेटावरच्या कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली. तिथेही त्याने फार काळ काढला नाही.
नोव्हेंबर १९८४ मध्ये त्याने तराफ्यासारख्या बोटीच्या साहाय्याने पलायन केले. कोलंबियाच्या सीमा ओलांडून तो इक्वाडोरमध्ये शिरला. तिथे गेल्यावर त्याने अक्षरश: हैदोस माजवला. ऐंशीच्या दशकाच्या मध्यावर त्याने किमान ऐंशी मुलींवर अत्याचार करून गळा दाबून हत्या केली. या सर्व मुली बहुत करून ९ ते १४ वर्षे वयाच्या होत्या, बऱ्याचदा त्याने व्हर्जिन मुलींना आपले सावज बनवले होते. इक्वाडोरमधील ग्वायाकिल, क्वेवेदो, क्विटो, मचाला, अंबाटो आणि इतर शहरांमध्ये त्याच्या बळींचा सुगावा लागला. आपल्या कह्यात आलेल्या सावजाला कसलीही दयामाया न दाखवता तो अमानुषपणे खलास करे. त्याने बहुतांश बळींना एकांतातल्या जागी नेऊन अत्याचार केल्यानंतर गळा दाबून ठार केले. त्यांचे मृतदेह जंगलात किंवा मॅंग्रोव्जमध्ये नेऊन टाकले. काही प्रकरणांत त्याने बळींच्या वस्तू लुटल्या आणि विकल्या.
२६ फेब्रुवारी १९८६ रोजी क्विटोमध्ये पोलिसांनी त्याला संशयास्पद वागणुकीमुळे थांबवले. त्याच्या बॅगमध्ये रक्ताळलेले कपडे, शेवटची बळी ९ वर्षीय एलिझाबेथ टेलपेस हिच्या संबंधातले पुरावे, दोस्तोयेव्स्कीचे ‘क्राइम अँड पनिशमेंट’ हे पुस्तक सापडले. त्याने ७१ खुनांची कबुली दिली, त्यांचे तपशील दिले, मृतदेहांच्या विल्हेवाटीची ठिकाणे दाखवली. त्याची निर्दयता आणि पश्चात्तापाचा अभाव पोलिसांनाही धक्कादायक वाटला. इक्वाडोरमध्ये त्या काळात हत्येसाठी कमाल शिक्षा १६ वर्षे होती. १९८९ च्या आसपास त्याला ती शिक्षा सुनावली गेली. गार्सिया मोरेनो कारागृहात तो इतर कैद्यांसोबत राहिला. १३ नोव्हेंबर १९९४ रोजी एका बळीच्या नातलगाने चाकूने अनेक वार करून त्याला ठार केले.
समीर गायकवाड
Read About : Pune First Marriage Mystery : कोर्टात सिद्ध न झालेल्या पहिल्या लग्नाचे गूढ!
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.