एक तिकीट, ५६ दिवस प्रवास, ना दंड ना एक्स्ट्रा चार्ज!
Indian Railways Circular Journey Ticket छत्रपती संभाजीनगर : जर तुम्ही एकाच प्रवासादरम्यान अनेक धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे किंवा शहरांना भेट देण्याची योजना आखत असाल, तर भारतीय रेल्वेचे सर्क्युलर जर्नी तिकीट तुमचे पैसे आणि वेळ दोन्ही वाचवू शकते. सहसा वारंवार वेगवेगळ्या स्टेशनसाठी तिकिटे खरेदी केल्यास जास्त भाडे लागते आणि वेळही वाया जातो, परंतु सर्क्युलर जर्नी तिकीट हा या समस्येवर उत्तम उपाय आहे.
सर्क्युलर जर्नी तिकीट ही भारतीय रेल्वेद्वारे दिली जाणारी एक विशेष सुविधा आहे. हे तिकीट अशा प्रवाशांसाठी डिझाइन केलेले आहे जे एका मुख्य स्टेशनवरून आपला प्रवास सुरू करतात, मार्गात अनेक वेगवेगळ्या स्टेशनवर किंवा शहरांमध्ये थांबतात आणि शेवटी परत त्याच स्टेशनवर (किंवा प्रवासाच्या शेवटच्या बिंदूवर) परत येतात. सोप्या शब्दात सांगायचे तर, जर तुमचा प्रवास वर्तुळाकार असेल, जिथे तुमचे सुरुवातीचे स्टेशन आणि शेवटचे स्टेशन एकच किंवा जवळजवळ असेल, तर तुम्ही प्रत्येक टप्प्यासाठी वेगळे तिकीट घेण्याऐवजी एकच सर्क्युलर जर्नी तिकीट घेऊ शकता.
सर्क्युलर जर्नी तिकिटाचे मुख्य नियम आणि वैशिष्ट्ये
तुम्ही या प्रवासादरम्यान कमाल ८ स्टेशनवर राहू किंवा थांबू शकता. या तिकिटाची वैधता तुमच्या एकूण प्रवासाच्या अंतरावर आधारित असते (ही वैधता कमाल ५६ दिवसांपर्यंत असू शकते). या तिकिटाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तिकीटाची गणना ‘टेलिस्कोपिक दराने’ केली जाते. त्यामुळे वेगवेगळ्या टप्प्यांची स्वतंत्र तिकिटे खरेदी करण्याच्या तुलनेत एकूण भाडे खूप स्वस्त पडते.
मुख्य फायदे
वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये तिकीट बुक करण्याऐवजी एकत्र सर्क्युलर तिकीट घेतल्यास एकूण भाड्यात मोठी बचत होते. प्रत्येक स्टेशनवर उतरून नवीन तिकिटासाठी लांब रांगेत उभे राहण्याचा त्रास वाचतो. हे तिकीट तीर्थयात्री, पर्यटक आणि लांबच्या सुट्टीवर जाणाऱ्या कुटुंबांसाठी अत्यंत फायदेशीर आहे.
तिकीट कसे बुक करावे?
- सर्क्युलर जर्नी तिकिटाचे बुकिंग आयआरसीटी ॲपवरून थेट सामान्य तिकिटासारखे होत नाही, त्यासाठी तुम्हाला खालील प्रक्रियेचा अवलंब करावा लागतो. सर्वप्रथम तुमचे सुरुवातीचे स्टेशन, मधे थांबणारे स्टेशन (कमाल ८) आणि शेवटचे स्टेशन यांची यादी तयार करा.
- डिव्हिजनल कमर्शियल मॅनेजरशी संपर्क साधा. रेल्वे अधिकारी तुमच्या अंतरानुसार तिकिटाचे एकूण भाडे ठरवतील आणि रूट फॉर्म, मंजुरी पत्र जारी करतील. मंजूर झालेला फॉर्म घेऊन स्टेशनच्या पॅसिनजर रिर्जेवेशन काउंटरवर जा.
- तिथे ठरलेली रक्कम भरून तुमचे सर्क्युलर जर्नी तिकीट मिळवा. तिकीट मिळाल्यानंतर तुम्ही प्रत्येक टप्प्यासाठी ट्रेनमध्ये तुमची सीट, बर्थ आरक्षित करू शकता.
Read About : Human-wildlife conflict in Marathwada मराठवाड्यात वाढला मानव-वन्यजीव संघर्ष
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.