Jhansi woman shot dead by husband : घाबरून ती जिन्यावरून वरच्या दिशेने धावू लागली, पण काही पायऱ्या चढते न चढते तोवर मिथुनने तिच्यावर गोळी झाडली. ती तिच्या पाठीत शिरली. पोखन एक किंकाळी फोडून कोसळली.
उत्तर प्रदेशच्या झाशी जिल्ह्यातलीच ही आणखीन एक क्रूर कहाणी आहे. दिनांक ४ जून २०२६ ची संध्याकाळ होती. मथुरा शहरातल्या एका स्पा सेंटरमधून मालकीण रागिणी आणि तिची मैत्रीण पोखन गप्पा मारत बाहेर पडल्या. पोखनने चेहऱ्यावर स्कार्फ बांधला होता, पण तरी तिचा चेहरा आणि अंगयष्टी लपत नव्हती. एक व्यक्ती दोघींचा पाठलाग करीत होती. दोघी चालत सूर्यनगर वसाहतीत रागिणीच्या घरी पोचल्या आणि निवांत बसणार होत्या, तेवढ्यात पाठलाग करणारी व्यक्ती आत शिरू लागली. तिला पाहून पोखन दचकली. तिने दार लावून घेण्याचा प्रयास केला, पण तिला लीलया मागे ढकलून तो पाठलाग करणारा इसम घरात शिरला.
हा इसम दुसरा तिसरा कोणी नसून मिथुन विश्वकर्मा होता. मिथुन पोखनचा मामे भाऊ होता आणि नवरादेखील होता. आतेबहिणीशी लग्न समाजात मान्य होत नाही, पण कोणे एके काळी मिथुन आणि पोखन एकमेकांच्या प्रेमात इतके पागल झाले होते की सारे सामाजिक संकेत आणि पालकांचे विरोध धुडकावून त्यांनी लग्न केले होते. अर्थातच लग्न टिकले नव्हते, सध्या दोलायमान स्थितीत होते. ‘इथं का आलास मिथुन? मला तुझं थोबाडदेखील बघायची इच्छा नाही. आलास तसा चालायला लाग,’ पोखन ओरडली.
रागिणीने तिला शांत करायचा प्रयत्न केला, ‘पोखन, झालं गेलं विसरून का जात नाहीस? राग-रुसवा सोड. निदान दाजी काय म्हणतात ते नुसतं ऐकून तरी घे.’ रागिणी असं बोलल्यावर मिथुनची भीड चेपली. तो गयावया करीत बोलू लागला, ‘पोखन, माझं तुझ्यावर जिवापाड प्रेम आहे. खरं खरं प्रेम आहे, ही गोष्ट तुला मी खूप वेळा सांगितली आहे, पुन्हा सांगतो. मधल्या काळात माझ्याकडून एकच चूक झाली, त्याबद्दल मला पस्तावा होतो आहे. मी तुझी त्याबद्दल पुन्हा एकदा माफी मागतो. तू म्हणशील त्याची शपथ घेतो, अशी चूक परत होणार नाही.’ पण, पोखनचा राग शांत व्हायला तयार नव्हता. ‘मी तुला आयुष्यभर सुखी ठेवीन.’ ‘एकदा जे झालं ते झालं. मला तुझ्याशी पुन्हा संबंध ठेवायचेच नाहीत. तोंड काळं कर आणि चालता हो.’
दोघे वाद घालत राहिले, शब्दाने शब्द वाढत राहिला. रागिणी दोघांना शांत करायचा प्रयास करीत होती, पण दोघे तिला जुमानत नव्हते. अखेर मिथुनने तिला निर्वाणीचा म्हणून सवाल केला, ‘तुला फायनल विचारतोय, मला माफ करून तू माझ्याबरोबर येणार आहेस की नाही?’ पोखनदेखील त्वेषाने उत्तरली, ‘नाही, नाही, नाही, त्रिवार नाही.’
यानंतर जे घडलं ते अनपेक्षित होतं. मिथुनने कंबरेशी लपवलेले पिस्तूल काढले आणि पोखनवर रोखले. पिस्तूल पाहून पोखनच्या तोंडचे पाणी पळाले. घाबरून ती जिन्यावरून वरच्या दिशेने धावू लागली, पण काही पायऱ्या चढते न चढते तोवर मिथुनने तिच्यावर गोळी झाडली. ती तिच्या पाठीत शिरली. पोखन एक किंकाळी फोडून कोसळली आणि पायऱ्यांवरच रक्ताच्या थारोळ्यात पडली. ती जागीच मरण पावली होती. यानंतर मिथुनने तेच पिस्तूल स्वत:च्या कानशिलावर ठेवले आणि स्वत:ला गोळी घालून घेत तो देखील तिच्या जवळ कोसळला. त्याच्या खिशातला मोबाईल उडून बाजूला पडला.
रागिणी हतबद्ध होऊन काही क्षण उभी राहिली. मग भानावर आली आणि अतिशय घाबरली. तिने आधी घरमालक शर्मांना फोन करून बोलावून घेतले. तोवर गोळीबाराचे आवाज ऐकून शेजारीदेखील जमा झाले होते. शर्मांनी परिस्थिती पाहिली आणि ताबडतोब पोलिसांना फोन करून येण्याची विनंती केली. थोड्याच वेळात पोलीस पथक हजर झाले. तेथील दृश्य भयानक होते. रक्ताच्या थारोळ्यात दोन व्यक्ती पडल्या होत्या. वरच्या पायरीवर तरुणीचे आणि खालच्या पायरीवर तिला बिलगलेल्या तरुणाचे प्रेत होते. मृत तरुणी पोखन २५ वर्षांची आणि मिथुन २८ वर्षांचा होता. दोघे पती-पत्नी असल्याचे रागिणीने पोलिसांना सांगितले. दरम्यान, मिथुनचा बाजूला पडलेला फोन वाजू लागला. पोलिसांनी तो उचलला. पलीकडून मिथुनचा धाकटा भाऊ बोलत होता. मिथुन सकाळी घरातून निघालेला घरी का आला नाही म्हणून चिंतेत होता. पोलिसांनी त्याला सत्य हकीकत सांगून तात्काळ पाचारण केले. यानंतर नेहमीची कारवाई पूर्ण करून त्यांनी दोन्ही मृतदेह पोस्ट मार्टेमसाठी रवाना केले. मिथुनचा भाऊ आणि पोखनचे नातलग येऊन दाखल झाल्यावर सर्वांचे जबाब घेण्यात आले आणि त्यातून उलगडली एका विचित्र लग्नगाठीची कहाणी…
मिथुन विश्वकर्मा झाशीचा रहिवासी होता. त्याची आत्या कुसुम जवळच्याच दतिया गावात रहायला होती. मिथुन अधूनमधून तिच्या घरी जायचा. कुसुमची एकुलती एक मुलगी पोखन मुळातच देखणी होती. वयात आल्यावर ती आणखीनच सुंदर दिसू लागली. मिथुनची नजर तिच्यावर पडली आणि जीव जडला. आतेबहीण असूनही तो तिच्या प्रेमात पडला. तिनेही त्याला रिस्पॉन्स दिल्यामुळे प्रेमप्रकरण गहिरे होत गेले. दोघांच्या घरातल्यांना ही नात्यातल्या नात्यातली आणि अनुचित सोयरीक मान्य नव्हती. पण, मिथुन आणि पोखन कोणाचं ऐकण्याच्या पलीकडे गेले होते.
वडीलधाऱ्यांचा विरोध जुमानला नाही, दोघांनी विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला. दिनांक २२ नोव्हेंबर २०२० रोजी दोघांनी लग्न केले आणि दिल्लीला रहायला आले. मिथुन कॅब चालवू लागला. त्याला उत्तम पैसे मिळू लागले, त्यामुळे दोघे सुखात होते. दोघांना पालकांची अजिबात आठवण येत नसे.
पोखनला नट्टापट्टा करून हिंडायचा शौक होता. मिथुन तिला कॅबमध्ये दूर दूर फिरायला न्यायचा. पोखनने इस्टाग्रामवर ‘महाकाल की लाडली’ नावाने खाते काढले होते आणि त्यावर ती दोघांचे बोल्ड फोटो टाकायची. त्यांना भरपूर व्ह्यूज मिळायचे. जानेवारी २०२६ मध्ये एक अघटीत घडले. मिथुनच्या आईचा अपघात झाला. तिने मुलाला बोलावले. मिथुनने आल्यावर आईच्या शुश्रूषेसाठी अंजू यादव नावाच्या सुंदर परिचारिकेला नेमले. पण, चारच दिवसांत तो तिच्या प्रेमात पडला. तिला घेऊन थेट दिल्लीला गेला आणि पहिल्या पत्नीची पर्वा न करता तिच्याशी लग्न लावले. हे पाहून पोखन भडकली. मिथुनने तिला घटस्फोटाची कल्पना सुचवली, पण घटस्फोट अमान्य करून पोखन रागाने माहेरी निघून आली.
इकडे अंजूच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार गुदरली. पोलिसांनी तात्काळ मिथुन आणि अंजूला अटक केली. अंजूला समजावून सांगून बापाच्या स्वाधीन केले आणि मिथुनला हाकलून दिले. यानंतर मिथुनला पश्चात्ताप झाला आणि तो पोखनला पुन्हा बोलावू लागला. पण, पोखनचा पतीवरचा विश्वास उडाला होता. तिने त्याला रिस्पॉन्स देणे बंद केले. त्याचा फोन नंबर ब्लॉक केला. काही महिने पोखनची आर्जवे केल्यावर मिथुन कंटाळला. त्याने मे २०२६ मध्ये एक पिस्तूल खरेदी केले आणि पोखनचा पाठलाग करू लागला. अखेर एके दिवशी संध्याकाळी, म्हणजेच दिनांक ४ जून रोजी त्याला संधी मिळाली. कदाचित तिचा खून करावा असा त्याचा इरादा नसेल. तिला पिस्तूल दाखवून घाबरवावे आणि नांदायला राजी करावे असे मनात असेल. पण, प्रत्यक्ष वेळ आली तेव्हा त्या आवेशात मिथुनकडून एका अमानुष खुनाचे कृत्य तर घडलेच, शिवाय त्याने दुसऱ्या क्षणी स्वत:वरदेखील गोळी झाडून जीव दिला. त्याने अशारीतीने आपले प्रेम व्यक्त केले असले तरी त्याच्या कृत्याचे समर्थन कदापि शक्य नाही.
विजय तरवडे
Read About : Assam Crime : आसामचा अमानुष असामी
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.