१९ वर्षीय तरुणाला गावठी कट्ट्यासह पकडले : शक्षिक आईची धडपड व्यर्थ
छत्रपती संभाजीनगर : Chhatrapati Sambhajinagar Weapon कुख्यात आरोपींच्या संपर्कात राहणाऱ्या मुलाला गुन्हेगारीच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी खासगी शिक्षिका असलेल्या आईने मुकुंदवाडी सोडून पिसादेवी भागात खोली केली, मात्र तरीही हा १९ वर्षीय तरुण गुन्हेगारांच्याच संपर्कात राहिला. मुकुंदवाडी पोलिसांनी या तरुणाला गावठी कट्ट्यासह बेड्या ठोकल्या आहेत. तो कट्टा जुलैमध्ये जिन्सी हद्दीत झालेल्या खुनातील कुख्यात आरोपी मुकेश ऊर्फ मुक्या साळवे याचाच असल्याची माहिती आता तपासात समोर आली आहे.
प्रियांशु सतीश खोमणे (वय १९, रा. मुकुंदवाडी), असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विवेक सोनवणे यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाईचे आदेश दिले होते. १० ऑक्टोबर रोजी संतोषीमातानगर येथील दोन एकर मैदानाच्या भिंतीलगत प्रियांशुने कट्टा लपवून ठेवल्याची पक्की टीप अंमलदार संतोष भानुशे यांना मिळाली. त्यानुसार सहायक निरीक्षक रोहित गांगुर्डे, उपनिरीक्षक नरसिंग पवार, हवालदार विक्रमसिंग राऊळ, संदीप वैद्य, भिमा पवार, अनिल थोरे, शाम आढे, विकास गुरुखेल, रवींद्र बेंडे, राहुल राठोड, दीपक इंगळे यांच्या पथकाने छापा मारून प्रियांशुला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने लपवून ठेवलेला कट्टा व मॅगझीन काढून दिले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
कट्ट्यापायी अडकला खोमणे
आरोपी प्रियांशु खोमणे हा कुख्यात मुकेश ऊर्फ मुक्या साळवे (२९, रा. मुकुंदवाडी) याच्या संपर्कात होता. साळवे आणि त्याचा साथीदार विक्की ऊर्फ सोनू पाचवणे (२२, रा. अंबिकानगर) यांनी जुलैमध्ये स्क्रॅप व्यावसायिक अब्दुल बासित हकीम खान यांचा निर्घृण खून केला होता. या खुनाच्या गुन्ह्यात जिन्सी पोलिसांनी त्यांना अटक केली असून ते सध्या जेलमध्ये आहेत. मुक्या साळवे याने हा गावठी कट्टा जालन्याहून मागवला होता. मात्र, खुनाच्या गुन्ह्यात जेलमध्ये जाण्यापूर्वी त्याने हा कट्टा प्रियांशुकडे सांभाळण्यासाठी दिला होता. तेव्हापासून तो प्रियांशुच सांभाळत होता.
आई शिक्षिका, पण मुलाने फिरवले पाणी
प्रियांशु विवेकानंद कॉलेजमध्ये बीएस्सीचे शिक्षण घेतो. त्याची आई खासगी शिक्षिका आहे. आपला मुलगा मुकुंदवाडीत सराईत गुन्हेगारांच्या संगतीत बिघडत असल्याचे पाहून त्यांनी त्याला सुधारण्यासाठी पिसादेवीत खोली भाड्याने घेतली होती. मात्र, आईच्या या धडपडीवर प्रियांशुने पाणी फेरले. दुसरीकडे राहायला जाऊनही तो मुक्या साळवेसारख्या गुन्हेगाराच्याच संपर्कात राहिला आणि थेट हत्यार बाळगल्याप्रकरणी पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
Read About : MCOCA Against Rahul Chabukswar संभाजीनगरातील कुख्यात राहुल चाबुकस्वारसह टोळीवर मकोका
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.