दहशतवाद्यांना फंडींग केल्याची भीती दाखवत ठेवले ओलीस : ३२ लाख रुपये पोलिसांनी गोठविले
छत्रपती संभाजीनगर : Digital Arrest : तुमच्या नावावर उघडलेल्या बँक खात्यातून दहशतवाद्यांना फंडींग झाले आहे, अशी बतावणी करत सायबर गुन्हेगारांनी ७५ वर्षीय आजींना १२ दिवस डिजिटल अरेस्ट (Digital Arrest) केले. धक्कादायक म्हणजे, अख्ख्या परिवाराला अटकेची भीती दाखवून या कालावधीत त्यांच्याकडून सुमारे ३ कोटी ८० हजार रुपये उकळले. १८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत हा धक्कादायक प्रकार घडला. आजींनी पाच एफडी मोडून गुन्हेगारांना पैसे दिले. त्यानंतर ही फसवणूक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान, सायबर पोलिसांनी ३२ लाख रुपये गोठविले आहेत.
जिन्सी ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, शहरातील जालना रोडवरील व्यंकटेशनगर परिसरात ७५ वर्षीय आजी एकट्याच राहतात. त्यांचा मुलगा जामनगर येथे मोठ्या कंपनीत नोकरीला आहे, तर मुलगी अमेरिकेत असते. आजींच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांनी त्यांना आपल्या जाळ्यात ओढले. १८ सप्टेंबर रोजी त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. समोरील व्यक्तीने आपण नाशिक क्राईम ब्रँचमधून राजन भिसे बोलतोय, असे सांगत, तुमच्या मोबाईल क्रमांकावरून कॅनरा बँकेत खाते उघडले असून, त्यातून दहशतवादी कारवायांना फंडिंग झाले आहे, अशी भीती घातली. मुलांच्या अटकेची धमकी देत असल्यामुळे १२ दिवस आजी प्रचंड दहशतीत होत्या. त्यांनी पाच बँकांमधील एफडी मोडल्या.
२३ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान सायबर गुन्हेगारांनी देवगिरी, सेंट्रल बँक, एडीसीसी, एचडीएफसी आणि एसबीआय बँकांमधून तब्बल ३ कोटी ८० हजार रुपये वेगवेगळ्या खात्यांवर ट्रान्सफर करून घेतले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक गणेश ताठे करत आहेत.
मागे तिरंगा अन् पोलिसांचा झेंडा
व्हिडिओ कॉल केल्यावर खरे पोलीस असल्याचा विश्वास बसावा म्हणून सायबर गुन्हेगारांनी चक्क पोलिसांच्या गणवेशात व्हिडीओ कॉल केला. त्यांच्या पाठीमागे तिरंगा आणि पोलिसांचा झेंडा लावून हुबेहूब पोलीस स्टेशन असल्याचा बनाव रचला होता.
यूपी, झारखंडमधील खात्यांत गेली रक्कम
आजींकडून उकळलेली रक्कम पाच वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळती केली आहे. उत्तर प्रदेश आणि झारखंड राज्यातील हे खाते असून पुढे सात ते आठ लेअरपर्यंत वेगवेगळ्या खात्यांमध्ये ही रक्कम वळती करण्यात आली. तक्रार प्राप्त होताच सायबर ठाण्याचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश गिरी यांनी वेगवेगळ्या खात्यातील ३२ लाख रुपये गोठविले.
बँकेमुळे थांबली फसवणूक
सायबर गुन्हेगारांना पैसे पाठविण्यासाठी आजी बँकेत जाऊन आरटीजीएस करायच्या. प्रत्येक ठिकाणी सायबर गुन्हेगार व्हिडीओ कॉल सुरु ठेवायला लावायचे. मोठ्या रकमा आरटीजीएस करीत असल्याने बँक अधिकारी विचारपूस करायचे. एका बँकेत आजींसह त्यांच्या मुलाचेही खाते आहे. तेथे आजींनी मुलाला गुंतवणूक करण्यासाठी पैशांची गरज असल्याचे सांगितले. मात्र, त्याच बँकेत मुलाचेही खाते असल्याने अधिकाऱ्यांनी थेट मुलाला फोन करून विचारणा केल्यानंतर हा फसवणुकीचा प्रकार समोर आला आणि पुढील रकमेची होणारी फसवणूक थांबली. या
Read about https://epunyanagari.com/nashik-viral-video-road-jail-md-drugs/
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.