Ad Advertisement Ad Advertisement

ECI Form 6 online voter registration – फॉर्म 6 आणि घोषणापत्र आता स्वतंत्रपणे भरावे लागणार

ऑनलाइन मतदार नोंदणी प्रक्रियेत केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा बदल

ECI Form 6 online voter registration नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार ऑनलाइन मतदार नोंदणी प्रक्रियेत एक अत्यंत महत्त्वाचा बदल केला आहे. नवीन मतदार नोंदणीसाठी वापरला जाणारा ‘फॉर्म ६’ आणि त्यासोबत जोडलेले ‘घोषणापत्र’ आता ऑनलाइन आवृत्तीमध्ये एकमेकांपासून वेगळे करण्यात आले आहे. ज्या राज्यांमध्ये सध्या मतदार याद्यांची विशेष सखोल फेरपडताळणी (एसआयआर) मोहीम सुरू आहे, तिथे हा नवीन नियम तातडीने लागू करण्यात आला आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात ज्या राज्यांमध्ये ही मोहीम पूर्ण झाली होती, तिथल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून आयोगाने हे घोषणापत्र आधीच काढून घेतले होते.

मतदार यादीत नावाचा समावेश करण्यासाठी नागरिकांना ‘फॉर्म ६’ भरावा लागतो. बिहारमधील मतदार पुनरीक्षण मोहिमेपासून निवडणूक आयोगाने या फॉर्मसोबत एक अतिरिक्त घोषणापत्र जोडले होते. ज्यामध्ये अर्जदाराला आपल्या पालकांच्या मतदार तपशिलाची माहिती देणे बंधनकारक केले होते. ऑफलाइन किंवा प्रत्यक्ष पद्धतीने फॉर्म भरताना नागरिकांना हे दोन्ही फॉर्म स्वतंत्रपणे भरावे लागत असत. मात्र, ऑनलाइन पद्धतीमध्ये हे दोन्ही दस्तऐवज एकाच ‘ओटीपी’द्वारे सबमिट केले जात होते. त्यामुळे केंद्रीय कायदा मंत्रालयाच्या मंजुरीशिवाय निवडणूक आयोगाने ‘फॉर्म ६’ मध्ये परस्पर बदल केल्याचा आक्षेप घेतला गेला होता आणि हे प्रकरण न्यायालयात पोहोचले होते.

काय आहे नवीन बदल

या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी स्पष्ट केले की, ऑनलाइन अर्ज सादर करण्याची जुनी प्रक्रिया आता पूर्णपणे सुधारण्यात आली आहे. पूर्वी अर्जदारांच्या सोयीसाठी फॉर्म ६ आणि घोषणापत्र एकाच ओटीपी आणि ई-साइनद्वारे एकत्रित सबमिट करण्याची सुविधा होती. मात्र, आता नवीन प्रक्रियेनुसार हे दोन्ही भाग स्वतंत्रपणे सबमिट करावे लागतील. म्हणजेच, फॉर्म ६ साठी एक स्वतंत्र ओटीपी आणि घोषणापत्रासाठी दुसरा स्वतंत्र ओटीपी व्हेरिफिकेशन व ई-साइन करावे लागेल. अर्जदाराची नोंदणी यशस्वी होण्यासाठी या दोन्ही पायऱ्या पूर्ण करणे अनिवार्य असेल. याशिवाय, ज्या मतदारांची नावे मसुदा यादीतून गहाळ झाली आहेत, ते देखील पुन्हा नाव समाविष्ट करण्यासाठी फॉर्म ६ भरू शकतात, अशी महत्त्वाची माहिती आयोगाने दिली आहे.

Read About : Election Commission’s SIR Decisions Supreme Court Review – एसआयआरच्या निर्णयांची वैधता सर्वोच्च न्यायालय तपासणार; आयोगाचा सर्व निर्णय एकमताने झाल्याचा दावा, फॉर्म 6 मध्ये बदल

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.