जर्मनीतील शास्त्रज्ञांची ‘Atmosphere-Breathing Engine’ची प्रयोगशाळेतील यशस्वी चाचणी; अवकाशातील वायूंचा वापर करून उपग्रह कक्षेत ठेवण्याचा प्रयत्न
स्टुटगार्ट : Fuel-Free Satellite Engine गाड्या हवेवर चालण्याच्या कल्पना आपण अनेकदा ऐकल्या असतील. अशा गाड्या तर काही अद्याप आलेल्या नाहीत. पण आता उपग्रह मात्र अवकाशातील हवेवर फिरू शकणार आहेत! कोणत्याही इंधनाविना केवळ अवकाशातील वायूंचा वापर करून उपग्रह कक्षेत टिकवून ठेवणाऱ्या ‘सॅटेलाइट इंजिन’ची लॅबोरेटरी चाचणी यशस्वी झाली आहे. जर्मनीतील या शोधामुळे उपग्रह तंत्रज्ञानाची संपूर्ण दिशाच बदलणार आहे.
सध्या पृथ्वीच्या जवळ (साधारण १५० ते ४०० किलोमीटर उंचीवर) फिरणाऱ्या उपग्रहांना अवकाशातील हवेचा मोठा प्रतिकार किंवा अडथळा सहन करावा लागतो. यामुळे उपग्रहाचा वेग मंदावतो आणि तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने खाली खेचला जाऊ लागतो. त्याला जागेवर टिकवून ठेवण्यासाठी उपग्रहामध्ये ‘झेनॉन’सारखे अत्यंत महागडे इंधन भरावे लागते. एकदा का हे इंधन संपले, की कोट्यवधी रुपयांचा उपग्रह निकामी होऊन पृथ्वीवर कोसळतो. हे टाळण्यासाठी शास्त्रज्ञ एका अशा तंत्रज्ञानाच्या शोधात होते ज्यामुळे उपग्रहाची इंधनाची गरज संपेल. जर्मनीतील शास्त्रज्ञांनी ‘ॲटमॉस्फिअर-ब्रीथिंग इंजिन’ हे तंत्रज्ञान विकसीत करून हा शोध पूर्णत्वास नेला.
‘ॲटमॉस्फिअर-ब्रीथिंग इंजिन’ला इंधनाची गरज नाही. ते माणसासारखाच ‘श्वास’ घेते. उपग्रह जसा अवकाशात पुढे जातो, तसे हे इंजिन समोरील भागातून तिथल्या हवेचे (नायट्रोजन आणि ऑक्सिजनचे) सूक्ष्म रेणू आत शोषून घेते. आत आलेली हवा सौर पॅनेलच्या विजेचा वापर करून प्रचंड तापवली जाते आणि तिचा ‘प्लाज्मा’ तयार केला जातो. हा प्लाज्मा इंजिनच्या मागच्या बाजूने अत्यंत वेगाने बाहेर फेकला जातो. त्यामुळे उपग्रहाला पुढे जाण्यासाठी जबरदस्त वेग आणि धक्का मिळतो. युरोपियन स्पेस एजन्सी आणि जर्मनीतील स्टुटगार्ड विद्यापीठ यांनी एकत्र येऊन हे संशोधन केले.
या शोधाचे मोठे फायदे काय?
उपग्रहाला जमिनीवरून वेगळे इंधन भरून पाठवण्याची गरज उरणार नाही. इंधन संपणारच नसल्यामुळे उपग्रह वषार्नवर्षे अवकाशात कार्यरत राहू शकतील. उपग्रह पृथ्वीच्या अधिक जवळ राहू शकणार असल्याने हवामान, शेती आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी अत्यंत सुस्पष्ट आणि एचडी फोटो मिळतील. हे तंत्रज्ञान केवळ पृथ्वीभोवतीच नाही, तर मंगळ ग्रहावरील कार्बन डायऑक्साइडचा वापर करून तिथेही उपग्रह फिरवण्यासाठी वापरता येईल. वैज्ञानिकांच्या या शोधामुळे भविष्यातील अवकाश मोहिमांचा खर्च प्रचंड प्रमाणात कमी होणार असून, उपग्रहांचे आयुष्य कैक पटींनी वाढणार आहे.
Read About : Longest Tunnels in the World : जगातील सर्वाधिक 24.5 किमी लांबीचे बोगदे
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.