काळोखातील कामगार!! : नेपाळ आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात निसर्गाचा प्रकोप किती भीषण असू शकतो, हा अंगावर काटा आणणारा अनुभव जगाला पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात हिमालयाच्या कुशीत हिमनग अचानक कोसळल्यामुळे बर्फ, मोठमोठ्या खडकांचा ढिगारा आणि चिखलाचा असा काही महापूर आला की, हिरवी शाल पांघरलेली शहरे अन् गावे उद्ध्वस्त झालीत. या प्रलयात ९०० हून अधिक निष्पाप जीवांचा बळी गेला असून जवळपास पाच हजार लोक बेपत्ता आहेत. या तांडवानंतर बचावात्मक अभियान सुरू आहे. मात्र बेपत्ता माणसं जिवंत असणार काय? दुसरीकडे जमिनीखाली बोगद्यात मृत्यूशी झुंज देणाऱ्या कामगारांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रलयाचा सर्वांत मोठा फटका नेपाळच्या रसुवा आणि नुवाकोट या जिल्ह्यांना बसला, तरीही तिबेटमध्ये २३ देशांतील २६१ परदेशी नागरिक बेपत्ता आहेत. विशेषत: नेपाळमधील ११ जलविद्युत प्रकल्पांचे बोगदे चिखल आणि दगडांच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. या प्रकल्पाच्याच खोल बोगद्यांमध्ये तब्बल ९३३ कामगार अडकल्याची भीती आहे. नेपाळी लष्कर आणि आपत्कालीन यंत्रणा रात्रंदिवस या कामगारांचा शोध घेत आहेत. बोगद्यांचे मूख खडकासह चिखलांनी बंद झाले आहे. त्यामुळे ऑक्सिजनची कमतरता आणि पाण्याचा वाढता साठा हे बचावपथकांसमोर मोठे आव्हान आहे. लष्कराकडून स्फोटकांचा वापर करून मार्ग तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दोन बोगद्यांत मार्ग काढण्यात यश मिळाले, तेव्हा केवळ तीन मृतदेहच हाती लागले. त्यामुळे कामगारांचा श्वास सुरू आहे काय? हा सर्वांना पडलेला प्रश्न होता. मात्र काही बोगद्यांमधून ३५० कामगारांना जिवंत बाहेर काढण्यात यश मिळाले आहे.
जलप्रलयानंतर नेपाळ सरकारने आर्थिक मदतीशिवाय दुसरी कोणतीही मदत नाकारली होती. मात्र आंतरराष्ट्रीय दबावानंतर मदत स्वीकारणे सुरू केले. बोगद्यातील बचावकार्यासाठी भारतासह चीनच्या तज्ज्ञांच्या पथकाची मदत घेतली जात आहे. दोन्ही देशांचे तज्ज्ञ आधुनिक उपकरणांसह नेपाळला मदत करीत आहेत. एकट्या नेपाळचे २१ हजार सुरक्षा जवानांसह कर्मचारी मदतकार्यात व्यस्त आहेत. तसेच बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी ‘लाइफ-डिटेक्शन’ यंत्रे, ड्रोन आणि हेलिकॉप्टरची मदत घेतली जात आहे. चीनने मदतकार्यासाठी तब्बल २४० कोटींचा निधी मंजूर केला असून सीमेवरील दुर्गम भागात हवाई मार्गाने अन्नाची पाकिटे व औषधे पुरविली जात आहेत. अमेरिकेनेही आर्थिक मदत केली आहे. सध्या बचावकार्यात हवामान सर्वांत मोठा अडथळा ठरत आहे. सतत पडणारा पाऊस आणि डोंगर खचण्याच्या घटनांमुळे बचावकार्य थांबवावे लागत आहे. नेपाळ-चीन सीमेवर निर्माण झालेल्या कृत्रिम जलाशयामुळे भीतीही निर्माण झाली होती. हिमनग आणि डोंगर कोसळल्यामुळे नद्यांचे नैसर्गिक प्रवाह थांबले होते. हिमनग कोसळलेल्या ठिकाणी २५ लाख घनमीटर पाणी असलेले महाकाय विवर तयार झाले होते. मात्र साचलेले पाणी निघाल्याने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. हा नैसर्गिक जलाशय अचानक फुटला, तर पाण्याच्या प्रवाहाची महाकाय लाट येण्याची शक्यता होती. ही शक्यता आता मावळली आहे; परंतु मदतकार्य सुरू असताना पुन्हा महाप्रलय तर येणार नाही, हा प्रश्न धोक्याकडे इशारा करणारा आहे. हा जलप्रलय का आला, त्याचे मूळ कारण हवामान बदलात दिसून येते. तिबेटच्या पठारावर जागतिक तापमानवाढीचे दीर्घकालीन परिणाम स्पष्टपणे दिसू लागले आहेत. हिमनद्या वितळणे आणि त्यांची रचना अस्थिर होणे यातूनच ही दुर्घटना घडल्याचे चीनकडून सांगितले जात आहे. गेल्या काही वर्षांत माणसांनी पेरलेल्या संकटामुळे हिमालयातील पर्यावरणात मोठे बदल झाले आहेत. हे बदल नेपाळलाच नव्हे, तर हिमायलीन देशांसाठी दु:खाचे सावट आहे. त्यामुळे शेजारी राष्ट्रांनी हवामान बदल, पर्यावरण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सहकार्य करणे अपेक्षित आहे; अन्यथा महाप्रलयाला कोणीही थांबवू शकणार नाही. कारण हिमनद्या वितळणे, ढगफुटी, भूस्खलन, भूकंप हे नेहमीचे झाले आहे. विकासाच्या नावावर हिमालयाच्या हृदयाला जखम करणे, जैवविविधता नष्ट करणे, पर्यटनवाढीमुळे कचरा पसरणे, तिथले वणवेही भविष्यात आव्हान देणार आहेत. हिमालयातील नैसर्गिक बदलाचा फटका नेपाळ, चीनच नव्हे, तर भारत, भूतान आणि पाकिस्तानातील जवळपास दीडशे कोटी लोकांना बसू शकतो. विशेषत: चीनकडून हिमनगांचे धोके आणि पाण्याच्या पातळीबाबत पुरेसा डेटा शेअर करण्यात आला नव्हता. नेपाळला ही माहिती वेळेवर मिळाली असती, तर अनेक मृत्यू थांबविता आले असते. हा दावा खरा नसल्याचा चीनचा दावा आहे. आता महापूर ओसरला आहे; परंतु नेपाळच्या मैदानी भागात निसर्गाच्या तांडवाच्या या खुणा डोळ्यांत केवळ दहशत पेरणाऱ्या आहेत. शेकडो मृतदेह उष्ण व दमट हवामानामुळे कुजू लागल्याने ओळख पटविणे कठीण झाले आहे. त्यामुळे मृतदेहांवर एकत्र अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. रेडक्रॉसच्या अंदाजानुसार, नेपाळच्या आपत्तीचा एक लाखाच्या जवळपास लोकांना थेट फटका बसला आहे. नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांनी या घटनेला अत्यंत ‘विनाशकारी नैसर्गिक आपत्ती’ म्हटले आहे. सततच्या धोक्यांनंतरही आम्ही आमच्या प्रत्येक नागरिकाचा जीव वाचविण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वासही व्यक्त केला आहे. मात्र निसर्गाच्या या भीषण प्रलयाने मानवाला त्याच्या मर्यादांची जाणीव करून दिली आहे. आता माणूस त्याच्या मर्यादा ओळखणार काय? ज्या भागात हा महाप्रलय आला त्या भागातील रस्ते, पूल उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे भारत-चीनच्या मदतीने रात्रंदिवस बोगद्यात फसलेल्या कामगारांचा शोध घेतला जात आहे; परंतु हे बोगदेही भोटेकोशी-त्रिशूल नदीच्या परिसरात आहेत. त्यामुळे प्रलयासोबत किती कामगार वाहून गेले असतील, हे सांगणे कठीण आहे. अर्थात संपूर्ण जगाचे लक्ष त्या काळोख्या बोगद्यांकडे लागले आहे, जिथे अंधारात अडकलेल्या शेकडो कामगारांसाठी आशेचा एक किरण शोधला जात आहे. ३५० कामगार सुरक्षित बाहेर आल्यामुळे अडकलेल्या कामगारांनाही उद्याचा सूर्य दिसावा, ही अपेक्षा करताना उद्ध्वस्त नेपाळचा धडा शेजाऱ्यांनी घेण्याची गरज आहे.
काळोखातील कामगार!!
