पालम तालुक्यातील धानोरा काळे येथील घटना; एनडीआरएफच्या शोधमोहिमेनंतर शनिवारी दोघांचेही मृतदेह आढळले
पालम : Godavari River Accident : गणेश विसर्जनासाठी गोदावरी नदीपात्रात गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. २५) पालम तालुक्यातील धानोरा काळे येथे घडली. मुंजाजी आश्रुबा घोरपडे (२०) आणि गजानन रामदास घोरपडे (२१) अशी मृतांची नावे आहेत. शनिवारी (दि. २६) दुपारी एनडीआरएफच्या पथकाने शोधमोहीम राबवून दोघांचेही मृतदेह बाहेर काढले.
विसर्जनावेळी पाण्याचा अंदाज चुकला
पालम शहरातील घोरपडे गल्ली येथील जय मल्हार गणेश मंडळाच्या गणपती विसर्जनासाठी मुंजाजी आणि गजानन हे शुक्रवारी सायंकाळी सुमारे पाच वाजता धानोरा काळे येथील गोदावरी नदीपात्रात गेले होते. मूर्तीचे विसर्जन करताना पाण्याच्या खोलीचा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने दोघेही खोल पाण्यात ओढले गेले.
दोन्ही तरुण पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी आरडाओरडा केला. मात्र, तोपर्यंत दोघेही पाण्यात बुडाले होते.
एनडीआरएफची शोधमोहीम
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि एनडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अंधार आणि नदीच्या प्रवाहामुळे शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवूनही दोघांचा शोध लागला नाही.
शनिवारी सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. एनडीआरएफच्या पथकाच्या प्रयत्नांनंतर दुपारी सुमारे तीन वाजता दोन्ही तरुणांचे मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. पंचनामा केल्यानंतर मृतदेह पालम ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.
या घटनेमुळे पालम शहरात शोककळा पसरली आहे.
Read About : Samruddhi Expressway Accident : कंटेनरला कारची जोरदार धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.