३३ चित्रपटांमधून मराठी सिनेमाची निवड, २०२७ च्या ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका
मुंबई : Gondhal Marathi movie : मराठी मातीतली एक कथा आता थेट ऑस्करच्या दिशेने निघाली आहे. ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची २०२७ च्या ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे. भारतीय फिल्म फेडरेशनने शुक्रवारी ही घोषणा केली. तब्बल ३३ चित्रपटांमधून ‘गोंधळ’ची निवड झाल्याने मराठी चित्रपटसृष्टीत आनंदाचे वातावरण आहे.
ग्रामीण महाराष्ट्राची कथा
‘गोंधळ’चे लेखन आणि दिग्दर्शन संतोष डावखर यांनी केले आहे. ग्रामीण महाराष्ट्राची पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट एका नवविवाहित जोडप्याच्या आयुष्यातील एका खास रात्रीची कथा सांगतो. या रात्री पारंपरिक ‘गोंधळ’ विधी आयोजित केला जातो. मात्र, हा केवळ धार्मिक किंवा पारंपरिक सोहळा राहत नाही. त्यातून प्रेम, नातेसंबंध, कुटुंबातील संघर्ष आणि मानवी भावनांचे वेगवेगळे पैलू समोर येतात.
प्रेमात आला कुटुंबाचा अडथळा
- चित्रपटाची कथा सुमन आणि सर्जेराव यांच्या प्रेमापासून सुरू होते. दोघेही एकमेकांवर प्रेम करतात. मात्र, त्यांच्या प्रेमाच्या आड कुटुंबातील निर्णय येतो.
- सर्जेरावच्या वडिलांकडून हुंड्याची मागणी केली जाते. त्यामुळे सुमनला परिस्थितीपुढे झुकावे लागते. तिचे लग्न साध्या आणि भोळ्या आनंदरावसोबत होते.
- लग्नानंतर सुमन आणि आनंदराव यांच्या आयुष्यातील एका रात्री ‘गोंधळ’चा सोहळा आयोजित केला जातो. याच रात्रीपासून चित्रपटाची कथा वेगळे वळण घेते.
एका रात्रीत बदलते सगळे
ढोलाचा आवाज, मंत्रोच्चार, मशालींचा प्रकाश आणि जमलेले गावकरी…अशा वातावरणात ‘गोंधळ’चा सोहळा सुरू होतो.
मात्र, सर्जेराव सुमनला विसरलेला नसतो. तो तिला पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करतो. दुसरीकडे सुमनही या परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करते. हळूहळू हा पारंपरिक सोहळा एका वेगळ्याच संघर्षात बदलतो. प्रेम, इच्छा, फसवणूक आणि नियंत्रण यांचा खेळ सुरू होतो. त्यामुळे चित्रपटाला थ्रिलरची किनार मिळते.
दिग्दर्शकाला याआधीही मोठा सन्मान
‘गोंधळ’चे दिग्दर्शक संतोष डावखर यांच्यासाठी ही निवड महत्त्वाची आहे. २०२५ मध्ये झालेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा सिल्व्हर पीकॉक पुरस्कार मिळाला होता.
आता ‘गोंधळ’ची ऑस्करसाठी निवड झाल्याने डावखर यांच्या कामाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
इशिता देशमुख मुख्य भूमिकेत
चित्रपटात इशिता देशमुख मुख्य भूमिकेत आहे. तिच्यासोबत किशोर कदम, योगेश सोहनी, निषाद भोईर, अनुज प्रभू आणि ध्रुव ठोके हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. चित्रपटाचे संगीत ज्येष्ठ संगीतकार इलैयाराजा यांनी दिले आहे.
ऑस्करसाठी निवड होणारा चौथा मराठी चित्रपट
‘गोंधळ’ हा ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झालेला चौथा मराठी चित्रपट ठरला आहे.यापूर्वी ‘श्वास’ (२००५), ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ (२००९) आणि ‘कोर्ट’ (२०१५) या मराठी चित्रपटांची भारताकडून ऑस्करसाठी निवड झाली होती. आता या यादीत ‘गोंधळ’ची भर पडली आहे.
ऑस्करचा प्रवास आता सुरू
- भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाल्याने ‘गोंधळ’चा ऑस्करचा प्रवास आता पुढे सुरू होणार आहे. मात्र, भारताची अधिकृत प्रवेशिका ठरणे म्हणजे चित्रपटाला ऑस्करचे अंतिम नामांकन मिळाले आहे, असा अर्थ होत नाही. पुढील प्रक्रियेनंतर अंतिम नामांकने निश्चित केली जातील. ९९ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा १४ मार्च २०२७ रोजी होणार आहे. त्यामुळे आता ‘गोंधळ’ पुढच्या टप्प्यात कशी कामगिरी करतो, याकडे मराठी चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.
- महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली कथा आता आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचली आहे. ऑस्करच्या शर्यतीत ‘गोंधळ’चा प्रवास किती पुढे जातो, हे आगामी काळात स्पष्ट होईल. मात्र, मराठी संस्कृती, ग्रामीण जीवन आणि स्थानिक परंपरेची गोष्ट जगाच्या मोठ्या व्यासपीठावर पोहोचणे, हीच मराठी चित्रपटसृष्टीसाठी मोठी बाब ठरली आहे.
Read About : Zombie Reddy 2 NXT LVL : ‘झॉम्बी रेड्डी २’चा फर्स्ट लूक प्रदर्शित, ‘हे काय पाहतोय?’
E-Paper: Punyanagari E-Paper

You need an account to post comments.