तंत्रज्ञानामुळे महापूर, चक्रीवादळे, भूस्खलन, जंगलातील वणवे आणि हवामान बदलांचे संभाव्य धोके आधीच ओळखण्यास मदत होणार
कॅलिफोर्निया : Google Earth AI गुगल ने त्यांच्या गुगल अर्थ प्लॅटफॉर्मवर आधारित प्लॅनेटरी इंटेलिजन्स हे अत्यंत प्रगत एआय तंत्रज्ञान विकसित केले आहे. या अर्थ एआय तंत्रज्ञानामुळे जागतिक हवामान बदल, सार्वजनिक आरोग्याचे धोके आणि अचानक येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा वेळेपूर्वीच अंदाज लावणे शक्य होणार आहे.
काय आहे प्लॅनेटरी इंटेलिजन्स?
गुगलने गेल्या अनेक वर्षांत गोळा केलेला उपग्रहांचा डेटा, भौगोलिक नकाशे आणि हवामानाची प्रचंड माहिती एकत्र करून या एआय मॉडेलला प्रशिक्षित केले आहे. हे मॉडेल केवळ पृथ्वीवरील सद्यस्थिती दाखवत नाही, तर विज्ञानाच्या आधारे पृथ्वीच्या भौगोलिक रचनेत होणाऱ्या बदलांचे सखोल विश्लेषण करते. मानवी डोळ्यांना न दिसणारे सूक्ष्म बदल शोधून भविष्यातील धोके ओळखण्याची क्षमता या प्लॅनेटरी इंटेलिजन्स तंत्रज्ञानामध्ये आहे.
आपत्ती व्यवस्थापनात मोठी मदत
या तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा फायदा मानवी जीव वाचवण्यासाठी होणार आहे. महापूर, चक्रीवादळ, भूस्खलन किंवा जंगलातील वणवे यांसारख्या मोठया संकटांची माहिती हे एआय वेळेआधीच प्रशासनाला देऊ शकेल. यामुळे आपत्कालीन यंत्रणांना नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. तसेच, हवामान बदलांमुळे समुद्राची वाढणारी पातळी आणि वितळणाऱ्या हिमनद्यांचा मागोवा घेणे यामुळे सोपे होणार आहे.
सार्वजनिक आरोग्याचे रक्षण
या एआय तंत्रज्ञानाची व्याप्ती केवळ हवामानापुरती मर्यादित नसून, ती सार्वजनिक आरोग्याशीही जोडलेली आहे. पूर किंवा अतिवृष्टीमुळे कोणत्या भागात मलेरिया, डेंग्यू किंवा इतर संसर्गजन्य आजारांची साथ पसरू शकते, याचा भौगोलिक अंदाज हे एआय लावू शकते. यामुळे आरोग्य विभागाला आधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे शक्य होईल. जगातील विविध देशांमधील सरकारे आणि पर्यावरण संस्थांना शाश्वत विकासाचे धोरण आखण्यासाठी हे तंत्रज्ञान मार्गदर्शक ठरेल.
Read About: Japan MMX Mission : मंगळाच्या चंद्रावरून माती आणणार जपान; 2031 मध्ये नमुने पृथ्वीवर
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.