Ad Advertisement Ad Advertisement

Hillside Stranglers : अँजेलो आणि केनेथ – खुनी भावंडे!

Hillside Stranglers : मागील काही दशकांत हॉरर सिनेमाच्या जॉनरमध्ये एक कथानक बऱ्याचदा दिसते; ज्यात निबिड अरण्य असलेल्या उंच सुनसान टेकड्यांवर अथवा डोंगरांच्या उंचसखल दऱ्याखोऱ्यांत एकाकी वाटसरूंचे मुडदे सापडत जातात! वरवर या सर्व गोष्टी काल्पनिक असल्या तरी याच्या मुळाशी आहे, निर्जन पर्वतराजीमधल्या भयंकर सीरियल किलिंगचा रक्तबिंदू! १९७७ च्या उत्तरार्धात लॉस एंजेलिसच्या टेकड्यांवर एकाएकी मृतदेह दिसू लागले, लोक भयभीत झाले. सुरुवातीला पोलिसांना त्यामागे एकच खुनी असावा असे वाटत राहिले. तरुण स्त्रिया अचानक गायब होत होत्या; काहींचे मृतदेह शहराच्या आसपासच्या उतारांवर, रस्त्यांच्या कडेला किंवा विरळ झाडाझुडपांत सापडत होते. अनेकांच्या शरीरावर गळा आवळल्याच्या खुणा होत्या.

काहींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे दिसत होते. पण, या हत्यांमागे एकापेक्षा जास्त हात असू शकतात, ही कल्पनाच तपासकांना सुरुवातीला पटत नव्हती. पुढे उघड झाले की या सगळ्या अंधारामागे एक नव्हे, तर दोन चुलतभाऊ होते, अँजेलो बुओनो ज्युनियर आणि केनेथ बियान्की. माध्यमांनी त्यांना ‘हिलसाइड स्ट्रँगलर्स’ हे नाव दिले होते. ऑक्टोबर १९७७ ते फेब्रुवारी १९७८ या चार महिन्यांच्या काळात लॉस एंजेलिस परिसरातील दहा मुली व तरुण स्त्रियांच्या हत्येचा संबंध या जोडीशी जोडण्यात आला. नंतर केनेथ बियान्कीने वॉशिंग्टन राज्यात आणखी दोन स्त्रियांची स्वतंत्रपणे हत्या केली.

अँजेलो बुओनोचा जन्म ५ ऑक्टोबर १९३४ रोजी न्यूयॉर्कमधील रोचेस्टर येथे झाला. इटालियन स्थलांतरित कुटुंबातून आलेल्या बुओनोचे बालपण मात्र कॅलिफोर्नियात गेले; तो पाच वर्षांचा असताना आईसोबत ग्लेंडेलला आला. शालेय जीवनात त्याचे प्रगतिपुस्तक अत्यंत कच्चे होते. सोळाव्या वर्षी त्याने शाळा सोडली. किशोरवयातच चोरी, कारचोरी आणि सुधारगृहात जाणे असा त्याचा गुन्हेगारी प्रवास सुरू झाला. पुढे त्याच्यावर बलात्कार, दलाली, हिंसा आणि मुलांचा सांभाळ न केल्यासंबंधीचे गुन्हे किंवा आरोप झाले, तो चार वेळा विवाहबद्ध झाला, आठ मुलांचा बाप झाला. पण, त्याच्या वैवाहिक आयुष्यातील नोंदी हिंसा आणि लैंगिक अत्याचाराच्या आरोपांनी भरलेल्या आहेत. तो स्वत:ला स्त्रियांच्या बाबतीत ‘लेडीज मॅन’ समजत असे, परंतु त्याच्या वैयक्तिक इतिहासाकडे पाहता, स्त्रीकडे व्यक्ती म्हणून नव्हे तर मालकी हक्काच्या वस्तू म्हणून पाहण्याची त्याची प्रवृत्ती दिसते.

केनेथ बियान्कीचा जन्म २२ मे १९५१ रोजी रोचेस्टर, न्यूयॉर्क येथे झाला. त्याची जन्मदात्री तेव्हा केवळ सतरा वर्षांची होती. जन्मानंतर काही महिन्यांतच त्याला दत्तक देण्यात आले. निकोलस आणि फ्रान्सिस बियान्की यांनी त्याला दत्तक घेतले. त्याला लहानपणापासूनच खोटे बोलण्याची सवय, अस्थिर वर्तन, रागाचे झटके यांनी ग्रासले होते. त्याच्या शालेय जीवनातही अडचणीच होत्या. बालवयात त्याच्यावर मानसोपचार झाले. तत्कालीन वैद्यकीय भाषेत त्याला ‘पॅसिव्ह-ॲग्रेसिव्ह पर्सनॅलिटी डिसऑर्डर’चे निदान झाल्याची नोंद आहे; खरेतर त्याला पोलीस व्हायचे होते. पोलीस दलात प्रवेश मिळवण्यासाठी त्याने प्रयत्न केले, पण त्याला नोकरी मिळाली नाही. त्याने सुरक्षा रक्षक म्हणून काम केले; विविध ठिकाणी नोकऱ्या केल्या, खोटी शैक्षणिक प्रमाणपत्रे वापरली आणि काही काळ स्वत:ला मानसशास्त्रज्ञ म्हणूनही सादर करण्याचा प्रयत्न केला. १९७६ मध्ये तो लॉस एंजेलिसला आला आणि अँजेलो बुओनोच्या घरी राहू लागला. बुओनो वयाने मोठा, अधिक अनुभवसंपन्न आणि गुन्हेगारी जगात आधीपासून रुजलेला होता; बियान्की तुलनेने लहान, बाहेरून सभ्य, गोड बोलणारा आणि स्वत:ची वेगवेगळी रूपे उभी करून इतरांना फसवण्यात तरबेज होता. दोघांच्या नात्यात बुओनोचे वर्चस्व होते.

लॉस एंजेलसमधील त्यांच्या गुन्हेगारी भागीदारीची सुरुवात थेट खुनांनी झाली नाही. दोघांनी काही तरुण स्त्रियांना वेश्याव्यवसायात ढकलण्याचा व्यवसाय उभा करण्याचा प्रयत्न केला. दोन तरुणी त्यांच्या तावडीतून निसटल्या, परिणामी गणित बिघडले. त्यांच्या वर्तनात आधीपासूनच शोषण, हिंसा, फसवणूक आणि स्त्रियांवर नियंत्रण प्रस्थापित करण्याची प्रवृत्ती दिसत होती. त्यांची मोडस ओपरेंडी भयावह होती. ते दोघे स्वत:ला साध्या वेशातील पोलीस अधिकारी म्हणून सादर करत. खोटे बॅज दाखवले जात, तरुण स्त्रीला सांगितले जाई की, ती पोलिसांच्या ताब्यात आहे किंवा चौकशीसाठी जावे लागेल, न्यायिक अधिकाराची भीती तिच्या स्वाभाविक प्रतिकारावर मात करीत असे. अपहृत मुलीला बुओनोच्या ग्लेंडेलमधील घराशेजारील ऑटो-अपहोल्स्टरीच्या दुकानात नेले जाई. त्या ठिकाणी आधी लैंगिक अत्याचार करून, भयानक छळ केल्यानंतर शेवटी गळा आवळून हत्या केली जाई. त्यानंतर मृतदेह धुऊन, नीटनेटका करून, कपडे काढून, लॉस एंजेलसच्या आसपासच्या टेकड्यांवर किंवा रस्त्यांच्या कडेला टाकला जाई. विटंबना झालेल्या कलेवरांची ही पद्धत पोलिसांच्या तपासाला आव्हान देणारी तसेच समाजात भीती निर्माण करणारी होती.
हत्यांचा वेग वाढत असताना लॉस एंजेलस एका मानसिक वेढ्यात अडकले.

मुलींना रात्री बाहेर पडण्याची भीती वाटू लागली. काही स्त्रियांनी घराबाहेर जाणे कमी केले, काही स्वसंरक्षण वर्गांकडे वळल्या, काहींनी शस्त्रे घेतली. एका टप्प्यावर संशय इतका वाढला की खुनी कदाचित पोलीसच असावा, अशी भीती पोलीस खात्यातही पसरली, त्यामुळे अधिकाऱ्यांना महिलांना पकडताना सावध राहण्याचे आदेश देण्यात आले. कदाचित एखादी स्त्री समोरच्या माणसाला हिलसाइड स्ट्रँगलर समजून पळत असेल. ‘हिलसाइड स्ट्रँगलर’ हे नावही त्या भीतीच्या वातावरणात रूढ झाले. या तपासात पोलिसांकडून झालेल्या चुकाही नंतर या केसच्या महत्त्वाच्या अध्यायाचा भाग बनल्या. बियान्कीचे नाव तपासाच्या परिघात आधीच कुठेतरी आले होते. पुढे तर तो लॉस एंजेलस पोलीस दलात नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत असताना, हिलसाइड स्ट्रँगलरचा शोध घेणाऱ्या पोलिसांसोबत राइड-अलाँगवरही गेला अशी नोंद आहे. गुन्हेगाराच्या चेहऱ्यावर सामान्यपणाचा मुखवटा किती प्रभावी असू शकतो, याचे हे धक्कादायक उदाहरण ठरले.

फेब्रुवारी १९७८ नंतर लॉस एंजेलस हत्यांची मालिका अचानक थांबली. बियान्की आणि बुओनोचे नातेही तेवढेच तणावपूर्ण झाले होते. मे १९७८ च्या सुमारास बियान्की लॉस एंजेलस सोडून बेलिंगहॅम, वॉशिंग्टन येथे गेला. त्याची मैत्रीण केली बॉयड आणि त्यांचा मुलगा तिथे होते. बियान्कीने सुरक्षा रक्षकाची नोकरी मिळवली, पुढे शॉपिंग सेंटरमध्ये सुरक्षा कार्यालयात काम केले आणि पोलीस दलात काम मिळण्यासाठीही प्रयत्न केले. पण, हत्या थांबल्या नव्हत्या. जानेवारी १९७९ मध्ये दोन तरुणी बियान्कीच्या संपर्कात आल्या. त्याने घरी पहारा देण्याच्या कामाचे आमिष दाखवून त्यांना एका घरात बोलावले. गळा आवळून त्यांचे खून केले. घटनास्थळी बियान्कीविरुद्ध अनेक पुरावे सापडले. त्यापैकी पीडितांच्या वस्तू, कपड्यांवरील तंतू, केसांचे नमुने, त्याच्या विरोधात जाणारे सुरक्षा नोकरीशी संबंधित पुरावे होते. १९७९ मध्ये त्याला ताब्यात घेण्यात आले. पुढील तपासात लॉस एंजेलसमधील हत्यांचा धागा जोडला गेला.

याच टप्प्यावर बियान्कीने आपल्या बचावासाठी एक विचित्र खेळी केली. त्याने दावा केला की त्याच्यात ‘स्टीव्ह वॉकर’ नावाचे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व अस्तित्वात आहे आणि हत्यांची कृत्ये त्याने केलेली नसून दुसऱ्या व्यक्तिमत्त्वाने केली आहेत. पण, सरकारी तज्ज्ञांनी त्याच्या कथेत विसंगती शोधल्या. आणखी महत्त्वाचे म्हणजे ‘स्टीव्ह वॉकर’ हे नाव त्याने एका वास्तविक मानसशास्त्रज्ञाची ओळख चोरून वापरले असल्याचे तपासात उघड झाले. बियान्कीच्या कबुलीजबाबामुळे अँजेलो बुओनोविरुद्धचा खटला सुरू झाला. ऑक्टोबर १९७९ मध्ये त्याला त्याच्या ग्लेंडेलमधील ऑटो-अपहोल्स्टरीच्या दुकानातून अटक झाली. त्याच्यावर दहा खुनांसह इतर अनेक गंभीर आरोप ठेवण्यात आले. सुरुवातीला तो हे सगळे नाकारत राहिला. या दोघांनाही सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली, मात्र हे दोघेही अतिशय चलाख होते. त्यांनी संमोहनापासून ते डबल आयडेन्टिटीपर्यंतचे अनेक फंडे अजमावले. अनेकदा याचिका केल्या, स्वत:ला निर्दोषच म्हणत राहिले; मात्र दरवेळेस त्यांचा मुखवटा फाडला गेला. अखेरीस २००२ मध्ये अँजेलो बुओनो कैदेतच मरण पावला. वयाची पंच्याहत्तरी पार केलेला बियान्की मरण यावे म्हणून आजही कारागृहात प्रार्थना करत रोजचा दिवस ढकलतोय, त्या निरपराध मुलींच्या किंकाळ्या त्याला मरेपर्यंत ऐकू आल्या पाहिजेत!

समीर गायकवाड

Read About : Pune First Marriage Mystery : कोर्टात सिद्ध न झालेल्या पहिल्या लग्नाचे गूढ!

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.