Karl Jager : सर्वसाधारणपणे कलाकार हे हळव्या मनाचे आणि भावनाप्रधान असतात असा आपला समज असतो. पण, वेळ आली तर एखाद्या विषारी जुलुमी विचारसरणीने भारावून गेलेला कलाकारसुद्धा किती क्रूर बनू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘कार्ल जॅगर’ असे म्हणता येईल. ऑर्केस्ट्रासाठी सुरांचा जाणकार म्हणून मशीन बनवणारा कार्ल दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरला नापसंत असलेल्या ज्यू आणि अन्य लोकांशी किती क्रूरपणे वागला हे बघण्यासारखे आहे.
18८८ साली स्वित्झर्लंड या जर्मनीच्या दक्षिणेला असलेल्या देशात कार्लचा जन्म झाला. तो तीन वर्षांचा असताना त्याचे कुटुंब जर्मनीत गेले. १९१४ ते १९१८ या वर्षात मुख्यत: युरोपात पहिले महायुद्ध झाले. २६ वर्षीय कार्ल या युद्धात जर्मनीच्या बाजूने लढला. त्याच्या शौर्यामुळे त्याला आयर्न क्रॉस हे पदक युद्धानंतर मिळाले. या युद्धात जर्मनीचा पराभव झाला तरी आपल्या आर्यन वंशाचा दुराभिमान बाळगणाऱ्या फॅसिस्ट मनोवृत्तीच्या हिटलरसारख्या नेत्याना तो मनातून खुपत होता. उत्तम वक्ता असलेल्या हिटलरने नाझी पक्षाची स्थापना करून राजकारणात प्रभाव पाडायला सुरुवात केली. १९२३ साली कार्लने नाझी पक्षात प्रवेश केला.
लोक त्याला तो राहत असलेल्या भागाचा म्हणजे ‘वाल्डकर्चचा हिटलर’ म्हणू लागले. त्या प्रवेशाचा त्याला तत्काळ फायदा झाला नाही तरी पुढे जाऊन फायदा होणार होता. १९१८ नंतर कार्ल ज्या वेबर नावाच्या कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होता, तिची परिस्थिती बिघडत जाऊन १९३१ साली तिचे दिवाळे वाजले. तत्कालीन जर्मनीतील वायमार सरकार अश्या प्रकारे बेकार झालेल्या लोकांना निर्वाह भत्ता देत होते. पण, मानी कार्लने ती मदत नाकारली. आपली बचत खर्च करत १९३४ सालापर्यंत तो पूर्णपणे कंगाल होत गेला. गरिबीमुळे एम्मा ही बायको त्याला सोडून गेली. दरम्यान, झालेल्या निवडणुकात हिटलर मोठ्या प्रमाणावर डोके वर काढत होता. त्याचा सहकारी रुडॉल्फ हेस याने पत्रक काढले की, ‘अल्टे कँफर’ म्हणजे जुन्या लढवय्यांना मोठ्या पगाराच्या नोकऱ्या दिल्या जातील. १९३२ साली कार्ल एस. एस. या कट्टर नाझींच्या गटात सामील झाला होता आणि त्याने शंभरावर सभासद नोंदवले होते. त्याच्या या कृत्यामुळे हिटलरचा उजवा हात हेनरिच हिमलर प्रभावित झाला आणि त्याला आधी लुडविगबर्ग आणि नंतर रेव्हेन्सबर्ग येथील प्रमुख बनवण्यात आले. १९३८ साली त्याला बर्लिन येथे बोलावून खास प्रशिक्षण देण्यात आले आणि मुन्सटर ऑफिसचा प्रमुख नेमण्यात आले.
१९४० साली दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने नेदरलँडवर स्वारी करून ते ताब्यात घेतले तेव्हा त्यात सामील कार्लला सुरुवातीला कमांडर आणि वर्षअखेरीस जर्मन सैन्यातील कर्नल दर्जाचे पद देण्यात आले. जुलै १९४१ ते सप्टेंबर १९४३ दरम्यान त्याला लिथुआनिया या जर्मनीने जिंकलेल्या देशात तेथील ज्यू, पोलिश, रोमानी आणि कम्युनिस्ट माणसांच्या हत्येसाठी नेमण्यात आले. सामील झालेल्या स्थानिक लोकांसह त्याच्याकडे या कामासाठी अंदाजे ३००० माणसे उपलब्ध होती. त्याने हत्या एवढ्या बेछूटपणे केल्या की ते कांड ‘नाईन्थ फोर्ट मसॅकर’ नावाने ओळखले गेले. कार्ल जॅगर या दैनंदिन हत्यांची माहिती व्यवस्थितपणे वरिष्ठांकडे पाठवत असे. युद्धसमाप्तीनंतर यातले काही अहवाल दोस्त फौजांच्या हाती लागले आणि ते ‘जॅगर रिपोर्टस्’ म्हणून प्रसिद्ध झाले. उदा. ‘२५ नोव्हेंबरला १,१५९ पुरुष, १,६०० स्त्रिया, १७५ मुले मारली गेली; तर २९ नोव्हेंबरला ६९३ पुरुष, १,१५५ स्त्रिया, १५२ मुले मारली गेली’ असे रकाने भरून पाठवण्यात येत असे. त्यातील ज्यू, कम्युनिस्ट आदींचे वर्गीकरणही केलेले असे. लिथुआनियात या अहवालांप्रमाणे कार्लने एकूण १,३७,३४६ हत्या केल्या. अन्य बऱ्याच ठिकाणांप्रमाणे गॅस चेंबरचा उपयोग न करता या हत्या बंदुका चालवून होत होत्या. १९४३ सालाच्या अखेरीस या मोठ्या कत्तलींमुळे त्याला नैराश्याचा झटका आला. परिणामी तो शक्तीहीन – दुबळा मानला जाऊन वरच्या पदाच्या बढतीसाठी अपात्र ठरला.
१९४५ साली हिटलरच्या जर्मन फौजांचा पराभव झाला. स्वत: हिटलरने आत्महत्या केली. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स वगैरेंच्या दोस्त फौजांनी जर्मनीचा ताबा घेतला. युद्धादरम्यान केलेल्या अमानवी कृत्यांमुळे जर्मन सैनिक तसेच त्यांना सामील अन्य देशांतील सैनिक आणि अधिकाऱ्यांवर खटले भरले जाणार हे उघड झाले. संभाव्य कठोर शिक्षांना घाबरून शक्य असलेले जर्मन अधिकारी दक्षिण अमेरिका आणि अन्य अनुकूल परिस्थिती असलेल्या ठिकाणी पलायन करू लागले. पण, कार्ल जॅगर मात्र सामान्य जनतेत सामील होऊन शेतकरी बनून जर्मनीमध्येच राहिला. पण, जस जसे ‘जॅगर रिपोर्टस्’ समोर येऊ लागले तशी खळबळ उडून त्याचा शोध जोराने सुरू झाला. अखेर माग काढणाऱ्यांनी मार्च १९५९ साली त्याचा शोध लावला. त्याला अटक झाली आणि त्याने केलेल्या असंख्य कत्तलींचे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले. पण, खटल्याला सामोरे न जाता २२ मे १९५९ रोजी होहेनस्पर्ग येथील तुरुंगात रेडिओ वायरच्या साहाय्याने गळफास लावून घेत त्याने आत्महत्या केली.
श्रीराम बापट
संपर्क : ९८१९९७८१३९
Read About : Pune First Marriage Mystery : कोर्टात सिद्ध न झालेल्या पहिल्या लग्नाचे गूढ!
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.