Ad Advertisement Ad Advertisement

Offline Admission Students – ऑफलाइन प्रवेश घेतलेल्या 2,648 विद्यार्थ्यांचा बारावी परीक्षेचा मार्ग मोकळा

शासनाचा मोठा निर्णय!

छत्रपती संभाजीनगर : Offline Admission Students – अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला डावलून ऑफलाइन पद्धतीने प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्य शासनाने अशा प्रवेशांना नियमित करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे छत्रपती संभाजीनगर विभागातील तब्बल २ हजार ६४८ विद्यार्थ्यांना बारावीची परीक्षा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

२०२५-२६ या शैक्षणिक वर्षात काही कनिष्ठ महाविद्यालयांनी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी न होता विद्यार्थ्यांना ऑफलाइन पद्धतीने अकरावीत प्रवेश दिले होते. आता हे विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला सामोरे जाणार असताना त्यांच्या परीक्षेच्या अर्जांबाबत अडचण निर्माण झाली होती. मात्र, शासनाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य मंडळाच्या बारावी परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी नोव्हेंबर अखेरपर्यंत मुदतवाढही देण्यात आली आहे.


छत्रपती संभाजीनगर विभागीय शिक्षण मंडळाकडे विभागातील २ हजार ६४८ ऑफलाइन प्रवेशांची नोंद झाली असल्याची माहिती विभागीय सचिव रवींद्र वाणी यांनी दिली. या प्रकरणी संबंधित शैक्षणिक संस्थांकडून प्रतिविद्यार्थी पाच हजार रुपयांचा दंड आकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, हा दंड विद्यार्थ्यांकडून वसूल करता येणार नाही.


संस्थांवर कारवाईची टांगती तलवार

ऑफलाइन प्रवेश देणाऱ्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांकडून शासनाने लेखी खुलासे मागवले आहेत. विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती, वर्गखोल्या, भौतिक सुविधा तसेच आरटीईच्या निकषांनुसार उपलब्ध सुविधांची पडताळणी केली जाणार आहे. प्रवेशाच्या वेळी आकारलेले शुल्क, परीक्षा घेण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि परीक्षा केंद्रांची क्षमता यांचीही चौकशी होणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांसोबतच संबंधित मुख्याध्यापक आणि प्राचार्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. दोषी आढळल्यास वेतनवाढ रोखणे, पदावनती यांसारखी कठोर कारवाई केली जाऊ शकते.

Read About : BAMU Students Examination Fee Waiver – 2 लाख 96 हजार विद्यार्थ्यांना शुल्क माफीचा लाभ
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.