शेवाळातील दोन जनुकांनी बदलली वैद्यकीय संशोधनाची दिशा
नवी दिल्ली : Indian scientist in optogenetics research – एका छोट्याशा शेवाळापासून सुरू झालेल्या संशोधनाने आज वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली आहे. विशेष म्हणजे या संशोधनात भारतीय वैज्ञानिक प्रा. सुनील कटेरिया यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे.
२००१ मध्ये जर्मनीत संशोधन करत असताना प्रा. कटेरिया यांनी क्लॅमिडोमोनास या सूक्ष्म शेवाळामधील प्रकाश ओळखणारी दोन महत्त्वाची जनुके शोधून काढली. पुढे याच जनुकांच्या आधारे प्रकाश-आधारित जनुकतंत्रज्ञान या आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास झाला. या संशोधनासाठी २०२६ चा वैद्यकीय नोबेल पुरस्कार कार्ल डेसरोथ, पीटर हेगेमन आणि जॉर्ज नागेल यांना प्रदान करण्यात आला. क्लॅमिडोमोनास हे अतिशय सूक्ष्म शेवाळ आहे. त्याला मेंदू किंवा डोळे नसतानाही ते प्रकाश ओळखून त्याच्या दिशेने वाहते. ही प्रक्रिया कशी घडते, याचा वैज्ञानिक अभ्यास करण्यात आला. प्रा. कटेरिया यांनी या शेवाळातील जनुकांचा अभ्यास करून प्रकाशाशी संबंधित दोन महत्त्वाची जनुके शोधली. पुढे त्यांना चॅनेलरोडॉप्सिन-१ आणि चॅनेलरोडॉप्सिन-२ अशी नावे देण्यात आली.
या जनुकांपासून तयार होणाऱ्या प्रथिनांवर प्रकाश पडला की, पेशींमध्ये विद्युत हालचाल निर्माण होते. वैज्ञानिकांनी ही जनुके मेंदूतील विशिष्ट पेशींमध्ये कार्यान्वित केली. त्यामुळे प्रकाशाच्या साहाय्याने या पेशी अतिशय कमी वेळात सक्रिय किंवा निष्क्रिय करता येऊ लागल्या. या तंत्रज्ञानाला प्रकाश-आधारित जनुकतंत्रज्ञान असे म्हणतात.
आठवणी आणि अंधत्वावरही प्रयोग
या तंत्रामुळे मेंदूतील विशिष्ट पेशी आणि आठवणी यांच्यातील संबंध समजून घेण्यास वैज्ञानिकांना मदत झाली आहे. उंदरांवरील प्रयोगांमध्ये प्रकाशाच्या साहाय्याने भीतीशी संबंधित विशिष्ट पेशी सक्रिय करण्यात आल्या. मानवांमध्येही या तंत्रज्ञानाचा प्रयोग करण्यात आला आहे. दृष्टी गमावलेल्या एका रुग्णाच्या डोळ्यांमध्ये प्रकाश-संवेदनशील जनुक पोहोचवण्यात आले. विशेष चष्म्याच्या साहाय्याने त्या रुग्णाला काही वस्तू ओळखता आल्या.
मात्र, या तंत्रज्ञानासमोर अद्याप अनेक आव्हाने आहेत. योग्य पेशींपर्यंत जनुके सुरक्षितपणे पोहोचवणे आणि मेंदूच्या आतील भागापर्यंत प्रकाश पोहोचवणे ही त्यांपैकी महत्त्वाची आव्हाने आहेत. भारतातही आयआयटी मद्रास आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) येथे या तंत्रज्ञानावर संशोधन सुरू आहे. एका छोट्याशा शेवाळाने दाखवलेला प्रकाशाचा मार्ग आज मानवी मेंदू आणि विविध आजार समजून घेण्यासाठी संशोधनाची नवी दारे उघडत आहे.
Read About : Smart Shoes Technology : पावलांच्या ऊर्जेवर चालणारे स्मार्ट शूज विकसित; पार्किन्सन्स, पडण्याचा धोका ओळखण्यास मदत
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.