पुणे विमानतळावर इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, १९२ प्रवाशांची सुखरूप सुटका
पुणे : IndiGo Emergency Landing in Pune पुणे विमानतळावरून गुवाहाटीकडे उड्डाण केलेल्या इंडिगोच्या विमानात टेकऑफनंतर तांत्रिक बिघाड झाल्याची घटना रविवारी सकाळी नऊच्या दरम्यान घडली. विमानाचे लँडिंग गिअर (चाके) उड्डाणानंतर आतमध्ये बंद न होता, बाहेरच्या स्थितीतच राहिल्याने विमान पुन्हा पुणे विमानतळावर उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. या घटनेमुळे विमानतळ प्रशासन, हवाई दल आणि आपत्कालीन यंत्रणांची धावपळ उडाली. दरम्यान, वैमानिकाच्या सतर्कतेमुळे, यंत्रणांच्या समन्वयामुळे विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात यश आले. विमानातील १९२ प्रवासी, कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली.
इंडिगोचे ६ए ०६२३ (व्हीटी-आयझेडई) हे विमान पुण्याहून गुवाहाटीकडे जाण्यासाठी रविवारी सकाळी नऊला रवाना झाले होते. विमानात प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसह एकूण १९२ जण होते. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच त्याचे लँडिंग गिअर आतमध्ये घेतले जात नसल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. विमानाची चाके बाहेरच राहिल्याने वैमानिकाने तातडीने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला (एटीसी) याबाबत माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे विमानतळ प्रशासनाने तातडीने एटीसी, इंडिगो कंपनी आणि संबंधित यंत्रणांशी समन्वय साधला. भारतीय हवाई दलाकडून विमानतळावर ‘फुल इमर्जन्सी’ घोषित करण्यात आली. त्यानंतर विमानतळावरील अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या.
कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली. विमान सुरक्षितपणे उतरवण्यापूर्वी धावपट्टीवरून विमानाने कमी उंचीवरून फेरी मारली. यावेळी विमानाच्या लँडिंग गिअरची दृश्य स्वरूपात तपासणी करण्यात आली. त्यानंतर वैमानिकाने अत्यंत काळजीपूर्वक सकाळी ९ वाजून ४ मिनिटांनी पुणे विमानतळावर विमानाचे सुरक्षित लँडिंग केले. विमानतळ प्रशासन, भारतीय हवाई दल, एटीसी, इंडिगो आणि इतर आपत्कालीन यंत्रणांच्या समन्वयामुळे मोठा अनर्थ टळला.
दुसऱ्या विमानाने प्रवासी गुवाहाटीला…
विमान उतरल्यानंतर तीन अग्निशमन बंब आणि दोन रुग्णवाहिकांच्या मदतीने विमानाला सुरक्षितपणे पार्किंग-बे क्रमांक सातपर्यंत नेण्यात आले. विमानाची स्थिती सामान्य आणि सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतर सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी एटीसीकडून ‘फुल इमर्जन्सी’ मागे घेण्यात आली. त्यानंतर विमानाला एरोब्रिज जोडून सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले. दरम्यान, गुवाहाटीकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी इंडिगो कंपनीकडून बंगळुरूहून पर्यायी विमान पुण्यात आणण्याची व्यवस्था करण्यात आली. या विमानाद्वारे प्रवाशांना पुढील प्रवासासाठी गुवाहाटीला रवाना केले.
Read About : 8000 flights cancelled in USA – अमेरिकेत हवाई वाहतूक यंत्रणा कोलमडली; 8000 उड्डाणे रद्द
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.