१६ ते १८ नोव्हेंबर दरम्यान आंतरराष्ट्रीय शिबिर
लंडनमधील तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन
८ ते १० रुग्णांवर होणार जटिल शस्त्रक्रिया
छत्रपती संभाजीनगर : Government Cancer Hospital – शासकीय कर्करोग रुग्णालयातील डोके व मान शस्त्रक्रिया विभागाच्या वतीने १६ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आंतरराष्ट्रीय स्तरावरील दुसरे डोके व मान शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हेड अँड नेक कर्करोगाच्या रुग्णांसाठी आयोजित या शिबिरात आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि जटिल शस्त्रक्रियांचा समावेश असणार आहे. डोके व मान ऑन्कोलॉजी हे वैद्यकीय क्षेत्र वेगाने प्रगत होत असून, या क्षेत्रात सातत्यपूर्ण अध्ययन, आधुनिक शस्त्रक्रियात्मक कौशल्य आणि विविध वैद्यकीय शाखांमधील समन्वय आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय ज्ञानाची देवाणघेवाण, अनुभवांची आदानप्रदान आणि शस्त्रक्रियात्मक कौशल्ये विकसित करण्यासाठी हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या आंतरराष्ट्रीय शिबिरासाठी युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन हॉस्पिटल्स एनएचएस ट्रस्ट, यूके येथील प्राध्यापक डॉ. जोनाथन ह्यूजेस आणि रॉयल फ्री हॉस्पिटल, लंडन येथील डॉ. विजेंद्र इंगळे यांची विशेष उपस्थिती व तज्ज्ञ मार्गदर्शन लाभणार आहे. शिबिराचे उद्घाटन १६ नोव्हेंबर रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या हस्ते होणार आहे.
यानिमित्त हेड अँड नेक सर्जरी या विषयावर एकूण ११ व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. तर १७ आणि १८ नोव्हेंबर या दोन दिवसांत हेड अँड नेक कर्करोगाशी संबंधित ८ ते १० रुग्णांवर जटिल शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. हे शिबिर विभागप्रमुख डॉ. सुनील देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे आणि विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी केले आहे.
Read About : Sans Campaign Pneumonia Prevention -चिमुकल्यांचा श्वास वाचविण्यासाठी आरोग्य विभाग सरसावला – 2026
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.