जगभरातील शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा, पृथ्वीचे भविष्य धोक्यात
अंताल्या : IPCC Climate Report Delay – एकीकडे जगभरात तापमानवाढीचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे, तर दुसरीकडे हवामान बदलासंदर्भातील महत्त्वपूर्ण वैज्ञानिक अहवालालाच विलंब करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे संपूर्ण जगाची हवामान संकटाविरोधातील लढाई कमकुवत होऊ शकते, असा इशारा प्रसिद्ध हवामान शास्त्रज्ञ जोहान रॉकस्ट्रॉम यांनी दिला आहे. अखेर या अहवालाला विरोध का होत आहे आणि त्याचा जगावर काय परिणाम होणार?
अहवाल २०२९ पर्यंत लांबणीवर टाकण्याची मागणी
संयुक्त राष्ट्रांची आंतरसरकारी हवामान बदल समिती जगातील हवामान बदलाचा अभ्यास करून महत्त्वाचे अहवाल प्रसिद्ध करते. सध्या या समितीचा सातवा मूल्यांकन अहवाल तयार केला जात आहे. हा अहवाल २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
मात्र, रशिया, भारत आणि सौदी अरेबियासह काही अरब देशांनी हा अहवाल २०२९ पर्यंत पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. विकसनशील देशांना अहवाल तयार करण्याच्या प्रक्रियेत पुरेसे प्रतिनिधित्व मिळत नसल्याचा त्यांचा आक्षेप आहे. अहवालातील काही शिफारशी विकसित देशांच्या बाजूने झुकलेल्या असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.
पृथ्वीचे तापमान २.८ अंशांनी वाढण्याची भीती
पॉट्सडॅम इन्स्टट्यिूूटचे संचालक जोहान रॉकस्ट्रॉम यांनी अहवालाला विलंब करण्याच्या प्रयत्नांवर चिंता व्यक्त केली आहे. हवामान बदलाबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी आयपीसीसीचे वैज्ञानिक निष्कर्ष अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे वैज्ञानिक कामात राजकीय मतभेद आणू नयेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार, सध्याची परिस्थिती कायम राहिल्यास जगाचे तापमान सुमारे २.८ अंश सेल्सिअसने वाढू शकते. त्यामुळे हिमनद्या वितळणे, समुद्राची पातळी वाढणे, दुष्काळ, पूर आणि उष्णतेच्या लाटांचा धोका अधिक गंभीर होऊ शकतो.
६६४ वैज्ञानिकांमध्ये ५१ टक्के विकसनशील देशांचे प्रतिनिधी
आयपीसीसीच्या नव्या अहवालासाठी ६६४ वैज्ञानिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यापैकी ५१ टक्के वैज्ञानिक विकसनशील देश आणि संक्रमणशील अर्थव्यवस्थांमधील आहेत. विकसनशील देशांचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी समितीने विशेष प्रयत्न केल्याचेही स्पष्ट केले आहे. २०२८ मध्ये पॅरिस हवामान कराराच्या उद्दिष्टांचा जागतिक आढावा घेतला जाणार आहे. त्याआधी हा अहवाल पूर्ण होणे महत्त्वाचे मानले जात आहे.
राजकारण बाजूला ठेवून पृथ्वी वाचवणार का?
हवामान बदलाचे संकट कोणत्याही एका देशापुरते मर्यादित नाही. त्याचा परिणाम संपूर्ण जगाला भोगावा लागत आहे. त्यामुळे वैज्ञानिक अहवाल, जागतिक सहकार्य आणि वेळेत घेतलेले निर्णय अत्यंत महत्त्वाचे आहेत. अहवालाला विलंब झाल्यास तापमानवाढ रोखण्याच्या प्रयत्नांनाही खीळ बसू शकते. देशांमधील मतभेद मोठे की पृथ्वीचे भविष्य? हा प्रश्न आता जगातील नेत्यांसमोर उभा आहे.
Read About: Tamil Nadu Heavy Rain Alert : तामिळनाडूतील 10 जिल्ह्यांत सोमवारी मुसळधार पाऊस, IMD चा इशारा
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.