अमेरिकी माध्यमांचे परस्परविरोधी वृत्त; हुआंग यांच्या पुनरागमनासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील काही बड्या व्यक्तींकडून प्रयत्न सुरू असल्याचा दावा
कॅलिफोर्निया : Jensen Huang Nvidia CEO Return एनव्हिडियाच्या संचालक मंडळाचा कंपनीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जेन्सेन हुआंग यांना पुन्हा या बहु-ट्रिलियन डॉलर चिप निर्मात्या कंपनीच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्याचा कोणताही विचार नाही, अशी माहिती या प्रकरणाशी संबंधित एका सूत्राने सोमवारी प्रसिद्ध अमेरिकी माध्यम समूहाला दिली.
नाव न छापण्याच्या अटीवर सदर व्यक्तीने सांगितले की, संचालक मंडळाचे संपूर्ण लक्ष हुआंग यांच्यावरील चौकशीवर केंद्रित आहे आणि त्यांना पुन्हा परत आणण्याबाबत कोणतीही चर्चा सुरू नाही. तत्पूर्वी ‘फायनान्शिअल टाइम्स’ने वृत्त दिले होते की, जेन्सेन हुआंग यांनी, पुन्हा एनव्हिडियाचे नेतृत्व करण्याच्या शक्यतेवर आपल्या जवळच्या सहकाऱ्यांशी चर्चा केली होती. १२ नोव्हेंबर रोजी त्यांनी राजीनामा दिल्यानंतर, आता काही बडे तंत्रज्ञान क्षेत्रातील अधिकारी त्यांच्या पुनरागमनासाठी पाठिंबा गोळा करत आहेत.
हुआंग यांच्या एका निकटवर्तीयाने ‘फायनान्शिअल टाइम्स’ला सांगितले की, त्यांना पुन्हा पदावर आणण्यासाठी प्रभावशाली तंत्रज्ञान अधिकाऱ्यांचे एक ्रगट तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहे. यामध्ये व्हाईट हाऊसकडूनही पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
‘फ्रंटियर लॅब्स’ (अत्याधुनिक संशोधन प्रयोगशाळा) सोडून तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्ती जेन्सेन यांना खूप मानताते, असे ‘फायनान्शिअल टाइम्स’ने निकटवर्तीयाच्या हवाल्याने म्हटले आहे.
हुआंग यांना पदावर पुन्हा नियुक्त करण्याच्या मोहिमेला स्वत: हुआंग यांचाही पाठिंबा असल्याचे सांगण्यात आले. ही मोहीम आता जोर धरू लागली असून, एलॉन मस्क यांच्यासह अनेक बडे तंत्रज्ञान अधिकारी आणि प्रमुख भागधारकांनी एनव्हिडिया बोर्डाला पत्र लिहून हुआंग यांना पुन्हा नियुक्त करण्याची मागणी केली आहे. कंपनीतील अनेक कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या पुनरागमनाचे जाहीर समर्थन केले असून, या पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
हुआंग परतले तर हरकत नाही : ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही हुआंग यांच्या पुनरागमनाबाबत सकारात्मकता दर्शवली आहे. हुआंग पुन्हा सीईओ म्हणून परतले तर आपल्याला काहीही हरकत नाही, एनव्हिडियाच्या या सह-संस्थापकाने एक मोठा धडा शिकला, असे ते म्हणाले. सोमवारी मनिला येथे ४९ व्या आसियान शिखर परिषदेसाठी रवाना होण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी हुआंग यांच्या पुनरागमनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर भाष्य केले. मात्र, आशिया दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सावधगिरीचा इशाराही दिला. अशी कोणतीही आक्रमक भूमिका घेऊ नये ज्यामुळे चीनचा अपमान होईल, असे ते म्हणाले.
या शिखर परिषदेनंतर, ट्रम्प चीनमधील शेन्झेन येथे जाणार आहेत. तिथे ते ‘एपेक’ शिखर परिषदेत सहभागी होतील, तसेच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत एका अत्यंत महत्त्वाच्या त्रिपक्षीय बैठकीत सहभागी होणार आहेत.
मात्र, अर्थमंत्री स्कॉट बेसेन्ट यांची मते ट्रम्प यांच्या अगदी उलट आहेत. एनव्हिडिया कंपनीत मोठ्या बदलांची गरज असून, तिथे बाहेरून आलेला सीईओ नियुक्त केला पाहिजे, असे ते म्हणाले. चीनमध्ये चिप्सची कथित तस्करी होत असताना कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केले होते का, असा सवालही बेसेन्ट यांनी उपस्थित केला.
‘मेगास्पीड’ विरुद्ध कायदेशीर कारवाईचा अमेरिकेचा निर्धार
सिंगापूरस्थित क्लाउड कम्प्युटिंग कंपनी ‘मेगास्पीड’ने, निर्बंध घातलेले ‘एनव्हिडिया’ सेमीकंडक्टर्स चीनकडे वळवल्याचा संशय आहे. या प्रकरणाच्या तपासात जर नियमांचे उल्लंघन झाल्याचे सिद्ध झाले, तर मेगास्पीडविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाईल, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. या फौजदारी तपासाचे नेतृत्व आता अमेरिकेचा न्याय विभाग करत आहे.
‘मेगास्पीड’, तिची माजी मुख्य कार्यकारी अधिकारी ॲलिस हुआंग आणि एनव्हिडियाचे माजी सीईओ जेन्सेन हुआंग यांच्याभोवती निर्माण झालेला वाद अधिकच गडद झाला आहे. या दोघांतील कथित वैयक्तिक संबंधांमुळे, मेगास्पीड आणि एनव्हिडिया यांच्यातील व्यवहारांकडे अधिक बारकाईने पाहिले जात आहे.
Read About : US Cybersecurity Leadership Change : अमेरिकेच्या सायबर सुरक्षा व्यवस्थेत मोठा फेरबदल; राष्ट्रीय सायबर संचालक शॉन केर्नक्रॉस यांचा राजीनामा !
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.