पंजाबच्या लोहियां खास रेल्वे स्टेशनवर रेल्वे संचालनाच्या वादातून दोन अधिकाऱ्यांमध्ये हाणामारी
जालंधर – Jalandhar Railway Station Clash पंजाबच्या जालंधर जिल्ह्यातील लोहियां खास रेल्वे स्टेशनवर दोन बड्या रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वे चालवण्याच्या किरकोळ वादातून स्टेशन सुपरिंटेंडेंट यशवंत यांनी बीटीपीएन (पेट्रोल टँक वॅगन) रेल्वेचे मॅनेजर (गार्ड) रवी यांच्या डोक्यात काठीने हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान मॅनेजरच्या हातातील मोबाईल फोन खाली पडला आणि या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिरोजपूर रेल्वे मंडळाकडून जम्मूच्या दिशेने जाणारी मालगाडी सकाळी ११ च्या सुमारास लोहियां खास रेल्वे स्टेशनवर पोहोचली होती. रेल्वे पुढे पाठवायची की स्टेशनवरच रोखून धरायची, याबाबत कंट्रोल रूम किंवा स्टेशन मास्टरकडून कोणताही स्पष्ट संदेश मिळत नव्हता. रेल्वे व्यवस्थापक रवी हे वॉकी-टॉकीद्वारे सतत स्टेशन सुपरिंटेंडेंट यांच्याकडून मार्गदर्शनाची मागणी करत होते, मात्र तिकडून योग्य प्रतिसाद मिळत नव्हता.
त्यानंतर लोको पायलट ज्ञान प्रकाश यांनीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनाही उत्तर मिळाले नाही. अखेर पॉईंट्समनद्वारे निरोप पाठवला असता, आधी दुसऱ्या ट्रेनला मार्ग दिला जाईल असे सांगण्यात आले. सतत निर्माण होणाऱ्या संभ्रमामुळे संतप्त झालेले रेल्वे व्यवस्थापक रवी हे स्वतः स्पष्टीकरण मागण्यासाठी स्टेशन सुपरिंटेंडेंट यशवंत यांच्या केबिनमध्ये पोहोचले.
वाद अचानक विकोपाला गेला.
केबिनमध्ये चर्चा करत असताना दोघांमधील वाद अचानक विकोपाला गेला. संतापाच्या भरात स्टेशन सुपरिंटेंडेंट यशवंत यांनी काठी काढून थेट रेल्वे व्यवस्थापक रवी यांच्या डोक्यावर वार केला. काठी लागताच रवी यांच्या हातातील मोबाईल फोन खाली पडला आणि स्टेशन परिसरात गोंधळ उडाला. या वादामुळे जम्मू जाणारी रेल्वे दिवसभर लोहियां स्टेशनवरच अडकून पडली होती.
ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत फिरोजपूर रेल्वे मंडळाचे डिव्हिजनल ऑपरेशनल मॅनेजर गुरशरण पाठक यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांना तात्काळ समन्स बजावून चौकशीसाठी पाचारण केले आहे.
Read About : Firozabad Firing : पतीकडून पत्नी आणि प्रियकरावर गोळीबार; दोघे गंभीर
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.