घरच्या मैदानातील मक्तेदारी मोडित काढली; एकदिवसीय मालिकेवर ३-१ ने कब्जा
अर्शदीप, सिराजचा प्रभावी मारा
माऊंट मौंगानुई : India vs New Zealand ODI Series 2026 अर्शदीप सिंग (३ बळी) आणि मोहम्मद सिराज (२ बळी) या वेगवान गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यामुळे भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेतील अंतिम आणि पाचव्या लढतीमध्ये कमी धावसंख्येचा बचाव करत न्यूझीलंडचा २२ धावांनी पराभव केला. भारतीय संघाने या बळावर एकदिवसीय मालिकेचा किताब ३-१ असा आपल्या नावावर करत न्यूझीलंडची घरच्या मैदानातील मक्तेदारी मोडित काढली. कारण, २०१९ मध्ये भारताकडून ४-१ ने पराभूत झाल्यानंतर न्यूझीलंडने सात वर्षांमध्ये सलग ११ एकदिवसीय मालिका जिंकल्या होत्या. भारताकडून विजयासाठी प्राप्त २१० धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव १८७ धावांत संपुष्टात आला.
भारतीय फलंदाजांनी आपल्या चुकांमध्ये काहीही बोध घेत नसल्याचे दिसून आले. कारण, या मैदानावरील चौथ्या सामन्यात भारताचा डाव ८९ धावांमध्ये संपुष्टात आला होता. अखेरच्या लढतीमध्येही रोहित शर्मा (७) आणि विराट कोहली (५) यांनी निराशा केली. बदली सलामीवीर ऋतुराज गायकवाड (१८) मिळालेल्या संधीचा फायदा उचलू शकला नाही. ८.१ षटकांमध्ये ३ बाद ३४ धावांनंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल या जोडीने धावफलक हलता ठेवला. ३ चौकार लगावणाऱ्या श्रेयसला चांगलास सूर प्राप्त झाला होता.
मात्र, वेगवान गोलंदाज ब्लेयर टिकनरच्या जाळ्यात अडकला. २२ धावा काढणाऱ्या श्रेयसने अक्षरसोबत ५५ चेंडूंत ५२ धावांची भारतीय डावातील मोठी भागीदारी उभारली. अक्षरने त्यानंतर इशान किशनला साथीला घेत न्यूझीलंडच्या माऱ्याचा प्रतिकार केला. मात्र, अक्षरची खेळी फार काळ लांबली नाही आणि फिरकीपटू मिचेल ब्रेसवेलने त्याला क्षेत्ररक्षक विल यंगकडे झेल देण्यास भाग पाडले.
अक्षरने ५ चौकार, १ षटकारने ५५ चेंडूंत ४६ धावांची खेळी उभारली. डावखुऱ्या इशानने त्यानंतर तळाच्या फलंदाजांना सोबतीला घेत खिंड लढवली. नमन धीरने २ चौकारांनी २२ धावा काढत त्याला उत्तम साथ दिली. पण, आकिब नबी (५) आणि पदार्पण करणारा यश ठाकूर (०) यांना फार काही करता आले नाही. इशानही (४६ धावा, ३ चौकार, २ षटकार) दुर्दैवी ठरला आणि अक्षरप्रमाणे अर्धशतकाच्या वेशीवर बाद झाला. त्यानंतर मोहम्मद सिराज (नाबाद १४, १ चौकार, १ षटकार) आणि अर्शदीप सिंग (१४ धावा, २ षटकार) या तळाच्या जोडीने १० चेंडूंत २६ धावांची बहुमोल भागीदारी रचत भारताला सर्वबाद २०९ धावसंख्या उभारून दिली.
कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडचे प्रमुख फलंदाज रवाना झाल्यामुळे अंतिम अकरांत नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देण्यात आली. या परिस्थितीत आव्हान माफक असल्यामुळे यजमान संघ विजयी ठरेल, असे चित्र दिसत होते. त्यानुसार विल यंग (२२) आणि टीम सायफर्ट (१४) यांनी सुरुवात केली. पण, सलामीवीरांची जोडी तंबूत परतल्यानंतर डाव फारकाळ लांबला नाही. परिणामी, २ बाद ६४ नंतर उर्वरित फलंदाज १२३ धावांची भर घालून परतले. निक केली (२४), डीन फॉक्सक्रॉफ्ट (३१) या युवा खेळाडूंसोबत अनुभवी मिचेल ब्रेसवेल (१९) आणि कर्णधार मिचेल सँटनर (२४) यांना रोखण्यात भारतीय गोलंदाज यशस्वी ठरले. अर्शदीप-सिराजला साथ देत अक्षर पटेलने २, तर नबी, ठाकूर आणि नमनने प्रत्येकी १ बळी घेतले.
प्रशिक्षकांचा विदेशातील पहिला विजय
गौतम गंभीर यांनी प्रशिक्षक पदाची सूत्रे जुलै, २०२४ पासून स्वीकारल्यानंतर भारताने विदेशातील भूमीवर आपली पहिली एकदिवसीय मालिका जिंकली. याअगोदर श्रीलंका, ऑस्ट्रेलिया दौरा आणि घरच्या मैदानात न्यूझीलंडविरुद्ध भारताने एकदिवसीय मालिका गमावली होती.
- न्यूझीलंड भूमीवर भारताचा हा केवळ तिसरा मालिका विजय ठरला आहे. याअगोदर २००९ आणि २०२९ मध्ये भारताने एकदिवसीय मालिकांमध्ये विजय संपादन केला होता.
आव्हानात्मक परिस्थितीत गोलंदाज ठरले तारणहार – श्रेयस
गोलंदाजांनी आव्हानात्मक परिस्थितीत उत्कृष्ट कामगिरी करीत भारतीय संघाला टी-२० आणि एकदिवसीय या दोन्ही प्रकारांमध्ये विजय मिळवून दिला, अशी प्रशंसा कर्णधार श्रेयस अय्यरने केली आहे. श्रेयस पुढे म्हणाला, ‘जर तुम्ही संपूर्ण मालिका पाहिली, तर ती फलंदाजांसाठी नव्हती. गोलंदाजांनी आव्हानात्मक परिस्थितीला योग्य न्याय दिला. परिस्थिती कशीही असली तरी, ते संघाला विजय मिळवून देऊ शकतील, असा त्यांना पूर्ण विश्वास होता. तसेच बदलत्या हवामानातही टी-२० आणि एकदिवसीय मालिका जिंकल्यामुळे संघाचा आत्मविश्वास वाढला आहे.
- सामनावीर : अर्शदीप सिंग : १४ धावा, ३ बळी
- मालिकावीर : गुरनूर ब्रार : ९ बळी
Read About : India U19 Asia Cup Victory- ‘यंग ब्रिगेड’ नवव्यांदा चॅम्पियन!
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.