Ad Advertisement Ad Advertisement

Khushboo Patani on women safety – ‘मुलींनो, स्वत:चं रक्षण करायला शिका’ – खुशबू

जमुई घटनेनंतर खुशबूचा संताप, सामाजिक मानसिकतेवर ओढले ताशेरे

मुंबई : Khushboo Patani on women safety – मुलींनी रात्री एकटं बाहेर पडू नये, सावध राहावं, प्रसंगी स्वत:चा बचाव करता यावा…महिलांना सुरक्षित राहण्यासाठी सूचना देण्याची यादी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मात्र, महिलांनीच प्रत्येक वेळी स्वत:च्या सुरक्षेची जबाबदारी का घ्यावी? हा सवालही तितक्याच तीव्रतेने उपस्थित होत आहे. बिहारच्या जमुईमध्ये अल्पवयीन मुलगी आणि तिच्या साथीदारासोबत घडलेल्या छेडछाड व मारहाणीच्या घटनेनंतर अभिनेत्री दिशा पाटणीची बहीण खुशबू पाटणी यांनी महिला सुरक्षेवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

‘स्वत:च्या सुरक्षेसाठी सज्ज व्हा’

माजी लष्करी अधिकारी असलेल्या खुशबू पाटणी यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत मुलींना आत्मरक्षणाचे प्रशिक्षण घेण्याचे आवाहन केले. संकटाच्या प्रसंगी घाबरून न जाता स्वत:चा बचाव करण्यासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. जमुईतील घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी समाजातील महिलांच्या सुरक्षेबाबतच्या परिस्थितीवरही नाराजी व्यक्त केली.

व्हिडिओत आत्मरक्षणाचे प्रात्यक्षिक

खुशबू पाटणी यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एअर पिस्तुलच्या माध्यमातून आत्मरक्षणाशी संबंधित प्रात्यक्षिक दाखवले. मुलींनी कोणत्याही साधनाचा वापर स्वत:हून करण्याऐवजी योग्य आणि अधिकृतप्रशिक्षण केंद्रातून मार्गदर्शन घ्यावे, असा संदेश त्यांनी दिला.
त्यानी या साधनांकडे खेळणे म्हणून न पाहता त्याबाबत जबाबदारी आणि सुरक्षिततेची जाणीव ठेवण्याचे आवाहनही केले आहे.

मुलींनीच सतत सावध राहायचं?

खुशबू यांच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. आत्मरक्षणाचे प्रशिक्षण महिलांना निश्चितच आत्मविश्वास देऊ शकते. मात्र, त्यासोबतच एक मूलभूत प्रश्नही दुर्लक्षित करता येणार नाही.
महिलांनी स्वत:ला वाचवण्यासाठी सतत तयार राहायचं, की समाजाने त्यांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी आपली जबाबदारी पार पाडायची? रस्त्यावर छेडछाड होऊ नये, सार्वजनिक ठिकाणी महिलांना भीती वाटू नये आणि तक्रार केल्यानंतर तातडीने मदत मिळावी, यासाठी सामाजिक मानसिकतेपासून कायद्याच्या अंमलबजावणीपर्यंत अनेक पातळ्यांवर काम करण्याची गरज आहे.

आत्मरक्षण गरजेचं, पण सुरक्षित समाज त्याहून गरजेचा

मुलींनी आत्मरक्षण शिकणे ही चांगली बाब आहे. प्रसंगावधान, आत्मविश्वास आणि योग्य प्रशिक्षण संकटाच्या वेळी उपयोगी ठरू शकते. पण आत्मरक्षणाची गरजच पडू नये, अशी सुरक्षित व्यवस्था निर्माण करणे ही समाजाची आणि यंत्रणेची मोठी जबाबदारी आहे.
महिलांना सतत ‘काय करू नका’ सांगण्याऐवजी समाजाने ‘महिलांना सुरक्षित कसे ठेवायचे?’ यावर अधिक गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे.

जमुईच्या घटनेनंतर प्रश्न थेट समाजाला

एका घटनेनंतर काही दिवस संताप व्यक्त होतो, सोशल मीडियावर चर्चा रंगते आणि नंतर सगळं पुन्हा पूर्वपदावर येतं. मात्र, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न केवळ चर्चेपुरता मर्यादित राहता कामा नये. खुशबू पाटणींचा आत्मरक्षणाचा संदेश चर्चेत आला आहे. पण त्यातून निर्माण झालेला मोठा प्रश्न त्याहून महत्त्वाचा आहहे. मुलींना स्वत:चं रक्षण करायला शिकवणं आवश्यक आहेच; पण महिलांचा सन्मान, सुरक्षितता आणि स्वातंत्र्य जपण्याचं शिक्षण समाजाला कधी मिळणार?

Read About : China Armpit Hair Trend 2026 : काखेतील केस रंगवण्याची नवी फॅशन!
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.