दरवर्षी दीड लाख खून होणाऱ्या भारतात अहिंसा नांदणार कशी?
Mahatma Gandhi : दि.२ ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधी जयंती. दरवर्षी आपण हा दिवस बापूंची जयंती म्हणून साजरा करतो, गांधीजींच्या फोटोंना हार घालतो आणि सोशल मीडियावर त्यांचे सुविचार स्टेटस म्हणून ठेवतो. पण कधी विचार केलाय का, की गोल चष्मा आणि हातात काठी घेतलेल्या या माणसाचे विचार आज २०२६ मध्ये, आपल्या दैनंदिन आयुष्यात किती महत्त्वाचे आहेत?आज आपला समाज सोशल मीडियावरील छोट्या कमेंटवरून भांडतोय, रस्त्यावर गाडी घासली तरी लोक एकमेकांचा जीव घ्यायला उठतात.
अशा या हिंस्र झालेल्या, संयम संपलेल्या समाजात गांधीजींचा अहिंसेचा संदेश फक्त पुस्तकात ठेवण्याचा विचार आहे की आपल्या जगण्याचा भाग? आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की, गांधीजींचे विचार रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींतून कसे आचरणात आणू शकतो.
मित्रांनो, जगात आजच्या भारताची ओळख काय? जगात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था, डिजिटल क्रांती करणारा भारत, मेक इन इंडिया मोहिमेतून आत्मनिर्भर होणारा भारत, अंतराळ, खेळ, विज्ञान, तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व निर्माण करणारा भारत. ही भारताच्या प्रगतीची, विकासाची पहिली बाजू .आता दुसरी बाजू पाहूया.. नॅशनल क्राइम ब्युरोच्या आकडेवारीनुसार दरवर्षी देशातील नागरिक एकमेकांच्या जीवावर उठल्याने 27 ते 29 हजार खून होत आहेत.किरकोळ कारणावरून होणाऱ्या हाणामाऱ्या, खुनी हल्ल्याच्या घटना तर एका वर्षात तब्बल चार ते सहा लाखापर्यंत पोहोचल्या आहेत.
Read About: Children Bank Fake Notes : ‘चिल्ड्रन बँक’च्या बनावट नोटांचा बाजारपेठेत धुमाकूळ
नैराश्य,तणावातून प्रतिवर्षी सव्वा ते दीड लाख लोक जगण्यापेक्षा मृत्यूला जवळ करून आत्महत्या करत आहे. हे कोणत्या भारतात घडते. हे कोणत्या भूमीत घडतय. भारत म्हणजे महात्मा गांधीजींची भूमी.. भारत म्हणजे जगाला अहिंसेचा संदेश देणाऱ्या बापूंची भूमी. त्या भारतातील लोक इतके हिंस्र, संयम संपलेले, मनशांती हरवलेले का झाले आहेत. कारण महात्मा गांधीजींच्या विचारांचा जागर आपण फक्त 2 ऑक्टोबरला करतो. उरलेले 364 दिवस ना आपल्याला महात्मा गांधी आठवतात. ना त्यांचा विचार.
मग समाजात हिंसा, दंगली, आत्महत्या या पलीकडे दुसरे काय घडणार?आज आपण आजूबाजूला पाहिलं, तर आपल्या लक्षात येईल की समाजात अधीरता आणि राग खूप वाढला आहे. न्यूज चॅनेल्स असो, घराबाहेरचे रस्ते असो की सोशल मीडियाचे कमेंट सेक्शन, प्रत्येक ठिकाणी एक प्रकारची मानसिक हिंसा आपल्याला पाहायला मिळते. कोणाचे विचार पटले नाहीत की लगेच ट्रोल करणे, शिवीगाळ करणे हा जणू ट्रेंड झाला आहे.
अशा वेळी गांधीजींचा ‘अहिंसा’हा विचार महत्त्वाचा ठरतो. गांधीजी म्हणायचे, “अहिंसा हे केवळ शस्त्रांचा वापर न करणे नाही, तर मनात कोणाबद्दलही आकस किंवा द्वेष न बाळगणे म्हणजे अहिंसा.” आज आपल्याला शारीरिक हिंसेपेक्षा या ‘मानसिक हिंसेपासून’ स्वतःला वाचवायचे आहे. जर कोणी आपल्यावर रागवला, तर त्याला उलट उत्तर न देता शांत राहणे, हा गांधीजींच्या अहिंसेचा पहिला धडा आहे. समोरच्याच्या रागाला शांततेने उत्तर देणे, हीच आजच्या काळातील सर्वात मोठी अहिंसा आहे. मनात हिंसा निर्माण झाली नाही तर कृतीत होणार नाही. ही महात्मा गांधींजीची आयडालॉजी होती.
गांधीजींचे विचार हेच आजच्या सर्व सामाजिक प्रश्नांची उत्तरे आहेत. विशेष म्हणजे ते आचरणात आणणे फार सोपे आहे.गांधीजींचे विचार आचरणात आणण्यासाठी आपल्याला काही देशाच्या सीमेवर जायची किंवा मोठे आंदोलन करण्याची गरज नाही.
Also Read: Holiday Reasons: भारतीयांच्या सुट्टीच्या भन्नाट ( Incredible) कारणांचा सर्व्हे, वाचून व्हाल थक्क
आपण आपल्या दैनंदिन जीवनातून याची सुरुवात करू शकतो:
बोलण्यावर नियंत्रण: दिवसातून अनेकदा आपण चिडतो. ऑफिसमध्ये, घरात किंवा मित्रांमध्ये वाद होतात. अशा वेळी बोलण्यापूर्वी फक्त ५ सेकंद थांबा. गांधीजींचे ‘बुरा मत बोलो’ हे तत्त्व इथे लागू करा. तुमचे शब्द कोणाला दुखावणार नाहीत याची काळजी घ्या.
सत्य आणि प्रामाणिकपणा: गांधीजींचा दुसरा मोठा खांब होता ‘सत्य’. आपण रोजच्या आयुष्यात कितीतरी लहान-मोठे खोटे बोलतो. स्वतःशी आणि इतरांशी प्रामाणिक राहणे, ही गांधीजींना दिलेली खरी आदरांजली असेल.
स्वच्छता: गांधीजींसाठी स्वच्छता हा भक्तीचा भाग होता. आपण फक्त आपले घर स्वच्छ ठेवतो आणि कचरा रस्त्यावर फेकतो. आपल्या घराबाहेरचा परिसर, आपला कट्टा, आपले शहर स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. ‘स्वच्छ भारत’ ही केवळ घोषणा नसून ती आपली सवय बनली पाहिजे.
‘स्वदेशी’ आणि ‘साधी राहणी’
आज आपण अशा युगात जगत आहोत जिथे ‘दिखावा’ खूप वाढला आहे. नको असलेल्या गोष्टी विकत घेणे, ब्रँड्सच्या मागे धावणे आणि कर्जबाजारी होणे हे आजचे वास्तव आहे. गांधीजींनी आपल्याला ‘स्वदेशी’ आणि ‘साधी राहणी’ शिकवली.
सोप्या भाषेत सांगायचे म्हणजेच गरजेपुरत्याच गोष्टी वापरणे आणि निसर्गाचा आदर करणे होय. गांधीजी म्हणायचे, “या पृथ्वीवर प्रत्येकाच्या गरजेसाठी सर्वकाही आहे, पण कोणाचाही हव्यास पूर्ण करण्यासाठी नाही.”
Also Read: Kashmiri Ghungroo Watch – साडी आणि लहेंग्यावर उठून दिसेल लेटेस्ट काश्मिरी घुंगरू वॉच
आपण जेव्हा स्थानिक दुकानदारांकडून वस्तू खरेदी करतो, जेव्हा पाण्याचा आणि विजेचा अपव्यय टाळतो, तेव्हा आपण नकळत गांधीजींचाच विचार पुढे नेतो. आपल्या स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देणे हीच आजच्या काळातील स्वदेशी चळवळ आहे.
बदलाची सुरुवात स्वतःपासून:
गांधीजींचे एक अतिशय प्रसिद्ध वाक्य आहे: “तुम्हाला समाजात जो बदल घडवायचा आहे, तो आधी स्वतःमध्ये घडवा.”
आपण नेहमी सिस्टीम खराब आहे, लोक खराब आहेत, सरकार चुकीचे आहे म्हणून रडत बसतो. पण आपण स्वतः वाहतुकीचे नियम पाळतो का? आपण कोणाकडून लाच न घेता किंवा न देता काम करतो का? आपण जात-पात, धर्म या पलीकडे जाऊन माणसाचा आदर करतो का?
जोपर्यंत आपण स्वतः बदलत नाही, तोपर्यंत समाज बदलणार नाही. गांधीजींचा विचार हा कुठलाही वाद किंवा पंथ नाही, तर ती एक जीवनशैली आहे. ती स्वतःमध्ये उतरवणे हेच आपले आजचे कर्तव्य आहे.तर मित्रांनो, या गांधी जयंतीला फक्त स्टेटस ठेवून थांबू नका. आजच्या या हिंस्र आणि अशांत युगात शांतता, संयम, प्रेम आणि अहिंसा हेच आपले सर्वात मोठे शस्त्र आहेत. चला, आज एक छोटासा संकल्प करूया.. आज कोणावरही न चिडण्याचा, कोणाचेही मन न दुखावण्याचा आणि आपल्या परिसराची काळजी घेण्याचा.
आज अमेरिकेपासून रशियापर्यंत आणि रशियापासून मलेशियापर्यंत अनेक देशात परदेशातील गांधी प्रेमींनी महात्मा गांधीजींचे पुतळे उभारले आहेत.परंतु ज्या देशात गांधीजी जन्मले, ज्या भूमीत त्यांनी अहिंसेचा विचार दिला त्या भूमीत अर्थात भारतात,आपल्या देशात प्रत्येक भारतीय जोपर्यंत स्वतःच्या हृदयात विचाररूपाने महात्मा गांधीजींचा पुतळा उभारणार नाही. तोपर्यंत या देशातील हिंसा संपणार नाही.
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.