Ad Advertisement Ad Advertisement

Manjarsumba Ghat accidents मांजरसुंबा घाटात काळाचा घाव; दोन चालकांचा मृत्यू

अवघ्या पाच तासांत दोन भीषण अपघात; अनेक तास वाहतूक ठप्प

Manjarsumba Ghat accidents बीड : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुंबा ते कोळवाडी (ता.बीड) घाटात शनिवारी (दि.३१) सकाळ व दुपारी अवघ्या चार ते पाच तासांच्या फरकाने झालेल्या दोन भीषण अपघातांमध्ये दोन चालकांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या विचित्र आणि सलग दोन अपघातांमुळे घाटातील वाहतूक सुरक्षा ऐरणीवर आली आहे.

शनिवारी सकाळी १०.३० ते ११ वाजेच्या सुमारास मांजरसुंबा घाटातून बीडकडे एक मालवाहू कंटेनर (क्र. टी.एन. ३९ बी.टी. ५७७९) जात होता. याच दरम्यान कोळवाडी नजीक असलेल्या तीव्र उतारावर पवनचक्कीचे अवजड साहित्य (पाईपसदृश्य साहित्य) घेऊन जाणारे एक अवाढव्य मालवाहू वाहन रस्त्यालगत बेकायदेशीरपणे उभे होते. स्थानिकांच्या माहितीनुसार, मागून येणारा कंटेनर व सोबतच एक टेम्पो घाटातून जात असताना, अचानक चालकाला रस्त्यालगत उभे असलेले महाकाय वाहन उभे असल्याचे दिसले.

दरम्यान, पाठीमागून आलेल्या टेम्पोने ओव्हरटेक करून पुढे निघण्याचा प्रयत्न केला, मात्र पुढे अपुरी जागा आणि तीव्र उतार असल्यामुळे भरधाव मालवाहू कंटेनर थेट रस्त्यालगत उभ्या असलेल्या पवनचक्कीचे साहित्य वाहून नेणाऱ्या वाहनावर जाऊन आदळला. अपघात इतका भीषण होता की, कंटेनरमधील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. दोघेही तामिळनाडू राज्यातील असून त्यांची नावे समजू शकली नाहीत. जखमी तरुणावर बीड जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

सकाळच्या धक्क्यातून घाट सावरत नाही तोच, शनिवारी दुपारी मांजरसुंबा घाटात दुसरी अत्यंत भीषण दुर्घटना घडली. एक मालवाहू ट्रक (क्र.आर.जे. १७ जी.बी. १३४६) पुढे धावणाऱ्या ट्रकवर आदळला अन् त्याच दरम्यान केमिकल वाहतूक करणारा कंटेनरची त्या ट्रकला धडक बसली. बीड ग्रामीण पोलिसांच्या माहितीनुसार, सकाळी ज्या वाहनांचा अपघात झाला होता, त्याच कंटेनरवर हे वाहन आदळून अपघात झाला. या विचित्र अपघातात राजस्थानमधील ट्रकचालकाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने बीडमधून रुग्णवाहिका पाठवून जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले, डॉक्टरांनी तपासणी करुन मयत घोषित केले. संबंधित मयताचे नाव समजू शकलेले नाही.

घाटाच्या तीव्र उतारावर वाहन उभे कसे?

नियम धाब्यावर बसवून पवनचक्कीचे अवजड साहित्य वाहतूक करणारे वाहन घाटाच्या तीव्र उतारावर अनधिकृतपणे कसे उभे केले गेले? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. या वाहनावर महामार्ग पोलिसांचे लक्ष का नव्हते? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. अपघातानंतर अखेर आयआरबीच्या ‘१०३३’ रुग्णवाहिकेद्वारे मृतदेह दुपारी १२:०५ वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला.

अपघातग्रस्त वाहने हटविण्यात अडचणी

विशेष म्हणजे दोन्ही अपघात घडलेली ठिकाणे बीड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील आहेत. शनिवारी दिवसभरात या ठिकाणी गंभीर अपघाताच्या घटना घडल्यानंतर मांजरसुंबा महामार्ग पोलीस बीड ग्रामीण पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पोलीस घटनास्थळी गेले. या दोन्ही अपघातांनी घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पोलिसांनी क्रेन मागवून घेत अपघातग्रस्त वाहने हटविण्याचे काम हाती घेतले असे सहाय्यक निरीक्षक बालाजी ढगारे यांनी सांगितले. मात्र सायंकाळपर्यंत अवजड असलेली मालवाहू वाहने हलविण्यात क्रेनलाही अपयश येत होते, त्यामुळे तासोन्तास घाटातील वाहतूक ठप्प झाली होती. एकेरी वाहतूक सुरु करण्यासाठी पोलिस प्रयत्न करत होते असे बीड ग्रामीण ठाणे निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी सांगितले.

वाहनचालकांचे हाल!

दोन अपघातामुळे मांजरसुंबा घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. घाटामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे आणि वाहनचालकांचे प्रचंड हाल झाले. तब्बल तीन ते चार तास अथक प्रयत्न केल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात यश आले नव्हते. दुसऱ्या अपघातातील मृताची ओळख पटलेली नसून, बीड येथील खाजगी रुग्णवाहिकेद्वारे मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस चौकीकडून देण्यात आली.

सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

एकाच दिवशी, अवघ्या चार ते पाच तासांच्या अंतराने झालेल्या या दोन भीषण अपघातांमुळे मांजरसुंबा घाट परिसरातील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. घाटात महामार्ग पोलिसांनी कायमस्वरूपी बंदोबस्त ठेवणे गरजेचे असताना पोलीस नेमके कुठे असतात? असा संतप्त सवाल सर्वसामान्यांमधून विचारला जात आहे. प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन घाटात कडेकोट सुरक्षा आणि वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Read About : Manoj Jarange audio clip controversy- जरांगेंचा ऑडिओ बॉम्ब
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.