मुख्यमंत्र्यांची उबाठाच्या आंदोलनावर टिका, तर मुख्यमंत्र्यांच्या घोषणांवरून दानवे, जलील आक्रमक
छत्रपती संभाजीनगर : Marathwada Liberation War Day : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त गुरुवारी १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र यांच्याहस्ते ध्वजारोहण केल्यानंतर हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यात आले. मुक्तीसंग्राम दिनानिमित्तच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठवाड्याच्या विविध प्रश्नांसंदर्भात विकास तुमसे ना हो पायगा हे आंदोलन करण्यात आले. यावेळी नेत्यांनी एकमेकांवर सडकून टिका केल्याने नेत्यांचा कलगीतुरा चांगलाच रंगल्याचे दिसून आले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आंदोलनासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे नाकर्त्यांचे आंदोलन आहे. ज्यांनी आपल्या जीवनात काहीच केले नाही, अशांचे आंदोलन आहे. संधी मिळूनही त्यांना काही करता आले नाही. आम्ही यापूर्वीही केले आहे, आताही करून दाखवू. आम्ही मराठवाड्याला शब्द दिलेला आहे. पूर्वी पुराचे पाणी गोदावरी खोऱ्यात आणू असे म्हटल्यानंतर आमला मुर्खात काढले जात होते. परंतु आम्ही ते करून दाखविले. आम्ही त्याचे टेंडर काढले असून जागतिक बँकेकडून त्यासाठी कर्जही मिळाले आहे. कोकणातील पाणी मराठवाड्यात आणण्याच्या योजनेचा डीपीआर तयार झालेला आहे. लवकरच या कामालाही सुरुवात होईल. छत्रपती संभाजीनगर हे देशातील ईव्ही हब म्हणून तयार होत आहे. डीएमआयसी कोणी आणली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्र्यांची फेकाफेक-आ.दानवे
मुख्यमंत्री यांनी केलेल्या भाषणावर माजी विरोधी पक्ष नेते आ. अंबादास दानवे यांनी टिका केली की, त्यांचे संपूर्ण भाषण हे फेकाफेक आहे. ही खोटारडेपणाची हद्द आहे. दोन वेळा सत्तेत असताना त्यांनी केलेल्या घोषणा खोट्या आहेत. उजणीचे ३० टीएमसी पाणी आणले जात असल्याचे सांगितले. परंतु ते केवळ २३ टीएमसी पाणी आहे. त्यापैकी ७ टीएमसी पाण्याचे काम सुरू असून त्यालाही तीन वर्षे लागणार आहे. लातूरला उजणीचे पाणी जाणार नाही. कारण लातूर गोदावरी खोऱ्यात आहे. औद्योगिकीकरणाच्या घोषणाही फोल आहेत. गुजरातमधील ढोलेराव सिटीचा विकास करताना विमानतळ, रेल्वे, रस्ते झाले. तसे छत्रपती संभाजीनगरात झालेले नाही. उलट शेंद्रा येथील कॉरेडोरचा रस्ता रद्द करण्यात आला आहे. शहराच्या पाणी पुरवठा योजनेबाबत खोटी माहिती दिली. सध्याही नऊ दिवसानंतर शहराला पाणी मिळत आहे. धाराशीव येथील वैद्यकीय महाविद्यालयात साधे एमआयआर काढले जात नाही. तेथील कंत्राटदाराला मागील तीन वर्षांपासून एमआयआरचा एक रुपयाही मिळालेला नाही. नद्याजोड प्रकल्पाची घोषणा होऊन १० वर्षांचा कालावधी लोटला. अद्याप डीपीआर तयार नाही. यावरून हे सरकार नाकर्तेच नाही तर नामर्द आहे, असे आ. दानवे यांनी म्हटले.
मुख्यमंत्र्यांनी वाजविली जुनी केसेट-जलील
मुख्यमंत्र्यांच्या भाषणाबाबत प्रतिक्रिया देताना माजी खासदार तथा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तीयाज जलील म्हणाले की, यावेळीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुनीच कॅसेट वाजविल्याचे सांगितले. फडणवीस यांचे मागील वर्षीचे भाषण, दोन वर्षांपूर्वीच्या घोषणा त्याच आहेत. जेव्हा जेव्हा ते शहरात येतात तेच ते आश्वासन देतात. यापूर्वी मराठवाड्याच्या विकासासाठी केलेल्या घोषणांपैकी किती पूर्ण झाल्या याचा हिशोब द्यावा, अशी मागणी जलील यांनी केली. मराठवाड्याच्या दुष्काळाबाबत मदत करण्याची घोषणा केली. परंतु मागील सहा महिन्यांत मराठवाड्यात तब्बल ४६५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दुष्काळी परिस्थिती पाहून शेतकऱ्यांसाठी काही घोषणा करतील, असे वाटत होते. परंतु केवळ ५ ऑक्टोबरपासून पंचनामे करण्यात येतील, एवढे सांगून वेळ मारून नेली. शहराला अद्यापही नऊ दिवसानंतरच पाणी मिळत आहे. ऑक्टोबर महिन्यात मराठवाड्यात मंत्रीमंडळाची बैठक घेऊन मागील मंत्रीमंडळ बैठकीत केलेल्या घोषणांचे काय झाले याची माहिती द्यावी. त्यानंतरच पुढील घोषणा कराव्यात, अशी मागणी जलील यांनी केली.
Read About : 70 TMC river linking project छत्रपती संभाजीनगरात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
E-Paper: Punyanagari E-Paper

You need an account to post comments.