घरमालकाने कुलूप तोडून केली तरुणीची सुटका; कांचनबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
हैदराबाद : Myanmar Woman Assault Case हैदराबादमधील एका भाड्याच्या घरात म्यानमारच्या १८ वर्षीय तरुणीला तिच्या पतीने डांबून ठेवल्याची आणि गेल्या काही महिन्यांत पतीच्या तीन मित्रांनी तिच्यावर वारंवार सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित तरुणी, तिचा पती आणि त्याचे तिन्ही मित्र हे म्यानमारचे नागरिक असून ते शहरातील एका निर्वासित छावणीत राहत असल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तिच्या पतीने तिला एका खोलीत कुलूप लावून कोंडून ठेवले होते आणि त्यानंतर आपल्या तिन्ही मित्रांना आत पाठवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यास भाग पाडले. २३ ऑक्टोबर रोजी घराचा मालक जेव्हा भाडे गोळा करण्यासाठी तिथे गेला, तेव्हा त्याला ती तरुणी खोलीत कोंडलेल्या अवस्थेत आढळली. त्याने खोलीचे कुलूप तोडून तिची सुटका केली. त्यानंतर तरुणीने निर्वासित छावणीत राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधला आणि कांचनबाग पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रारीची नोंद केली.
तरुणीच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पती आणि त्याच्या तीन मित्रांविरुद्ध बलात्कार, बेकायदेशीरपणे डांबून ठेवणे आणि गुन्हेगारी धमकावणे या आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपीने या वर्षाच्या मे महिन्यात या तरुणीला बांगलादेशातून हैदराबाद येथे आणले होते, त्यानंतर तिच्याशी लग्न करून तिला भाड्याच्या खोलीत डांबून ठेवले होते. सध्या पोलीस या चारही आरोपींचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.
Read About : Aurangabad child abuse case विकृत बापाने पाचवीतील लेकीचे कपडे फाडून दिले सिगारेटचे चटके! 24 वर्षीय मोठ्या भावानेच तक्रार दिली
E-Paper : Punyanagari E-Paperस्पेशल फीचर


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.